Thursday, 22 February 2018

अवकाळी...

तू असाच हायेस फसवा
न सांगता येनारा
हाताशी आलेलं पोर
आन हाताशी आलेलं पीक येकसारखंच असतंय
कवा धोका देत्याल पत्त्याच नाय
पन त्याला कारणीभूत असतीया संगट
आन बुरी वावटळ
जी तू घिवून येतुस कवा बी
ढगांच्या संगटीनं
आन उधळून लावतुस समदा डाव
सुखाच्या भाकरीचा
मग फिराया लागतंय वनवन करत
हातात सात बारा घिवून दारोदार
कोरा कराया
पन त्यो हुत नसतु सहज
त्याला लागतीया
शाई
लाल रगताची....


- सुरेश सायकर