माझं एक गाव आहे, म्हणजे स्वतःच आहे
असंच म्हणावं लागल ?
कारण मी अगदीच वर्षातून एखाद-दुसऱ्यांदा
जातो,
कारणं अनेक असू शकतील परंतू महत्वाचे
म्हणजे पोट आहे,
तसं गावात राहणाऱ्यांना पण असतं,
पण आमची भूक काही वेगळीच आहे, आमचे पोट
कधीच भरत नाही,
नेहमी त्यात काहीतरी टाकावंच लागतं....
गाडीतून जाताना स्वतःच्या रानात
उगवलेली बाभळीची झाडं पहिली,
शहरातल्या माणसाला ती पेरणी करून अन
निगा राखून जगवलेली वाटावी,
इतकी दाट आणि पूर्ण रानात पसरलेली
होती,
वाटलं गाडीतून उतरावं आणि सरळ
कुऱ्हाडीचे घाव घालून तोडून टाकावीत,
कुऱ्हाडीला धार होती पण घाव घालण्याचे
बळ कोठून आणणार,
ते बळ तर शहरात राहून बीळबिळीत झालं
होतं.....
वडील म्हणायचे शेवटचे दिवस सुखात
घालवणार स्वतःच्या रानात राबत-राबत,
पण शहरातून त्यांची सुटका झाली पण ती
जीव गेल्यावरच,
स्वतःच्या रानात फक्त सरणावर देह जळत
होता ज्याला स्वतःच असं काहीच माहित नव्हतं,
स्वतःच्या रानात जळण्याचे सुख
देखील....
माझी पण इच्छा आहे, शेवटचे दिवस सुखात
स्वतःच्या रानात कष्ट करून व्यतीत करायची,
दंडात फक्त दिसणाऱ्या बेट्कुल्यांची परीक्षा
घ्यायची,
बहुतेक ती देखील पूर्ण होईल, पण
शहरातून सुटका झाल्यावरच....वडिलांसारखी
-सुरेश सायकर
No comments:
Post a Comment