Tuesday, 23 May 2017

आमरस आणि बाप्पू...



शाळेला उन्हाळ्याची सुटी आणि मामाचे गाव, हे आयुष्यातलं खरंच डेडली कॉम्बिनेशन आहे. ज्यांनी अनुभवले आहे, ती आठवणींची शिदोरी त्यांच्या आयुष्यातून कधीच संपणार नाही. मला आयुष्यात खूप चांगलं शिकवणारी, अगदी बोटावर मोजावी एवढीच लोकं भेटली. त्यात खूप वरचा नंबर लागेल, तो म्हणजे माझ्या आजोबांचा, बाप्पूंचा, म्हणजेच माझ्या आईच्या वडिलांचा.

बाप्पू म्हणजे खूप भारी रसायन होतं. ‘रसायन’ हा शब्द आणि तोही वयोवृद्द माणसासाठी अश्यासाठी कि, त्यांच्यात कणखरपणा जितका होता तितकाच अवखळपणा देखील होता, असा समप्रमाणात गुण असणाऱ्या व्यक्ती फारच कमी आढळतात. कणखरपणा यासाठी कि, त्यांच्या तरुणपणी बारामतीमधल्या, माळेगाव इथे बामणाच्या मळ्यावर सालगडी म्हणून काम करण्याआधी, लहानपणी ते त्यांच्या सख्ख्या मामाच्या घरी सालगडी म्हणून काम करत होते. आता मामा म्हंटल्यावर, कामामध्ये थोडीफार सूट मिळेल, अशी आशा वाटणे देखील स्वप्नवत. अश्या परिस्थितीमध्ये काम केल्यावर कणखरपणा माणसामध्ये येणार हे नक्कीच. पण तो येत असताना, त्यांनी आपल्यातले लहान मुल आणि अवखळपणा, कधीच मरू दिला नाही. त्यांच्या बोलण्यामध्ये विलक्षण मिश्कीलपणा आढळायचा. कोणाची टर उडवताना, डोळे बारीक करून, बोळक्या गालात असे काही हसत कि, ते बघणेबल (नवीन शब्द शोधलाय...वापरत आणायला कोणतेही राईटस नाहीत.असो.) असायचे.
तर सालाबादप्रमाणे, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, आंब्यांच्या सिझनमध्ये आमचा मुक्काम तिकडेच असायचा. पाड  लागला कि, आंब्यांच्या झाडावरून आंबे उतरवल्यावर, घरामध्ये एका कोपऱ्यात, आंबे पिकवण्यासाठी ‘आडी’ घातली जायची. ‘आडी’ म्हणजे सगळ्यात आधी गवत पसरवून ठेवायचे, मग त्यावर कच्चे आंबे ठेवले जायचे आणि मग त्यावर पुन्हा गवत पसरविले जायचे. हे काम बाप्पू स्वतः करायचे, कधी गरज पडली तर मला आणि मामाच्या मुलाला हाताखाली घ्यायचे. एकदा का, ‘आडी’ घातली कि, पाड लागलेल्या त्या कैऱ्यांचा प्रवास सुरु व्हयाचा, कच्च्यापासून तो पिकण्यापर्यंतचा आणि त्याला साक्षीदार असायचो, मी.

मी अश्यासाठी कि, रोज सकाळी झोपेतून उठलो कि, आधी ‘आडी’पाशी जावून आंबे पिकलेत का? याचा वास घ्यायचो. बापूंनी सांगितले होते, कि जेव्हा आंबे पिकायला सुरुवात होईल तेव्हा घरभर घमघमाट सुटेल. मग मी नजर चुकवून, गवत न सरकवता, ‘आडी’मध्ये हात घालून, एखादा आंबा पिकलाय का दाबून बघायचो. आणि एखादा हाताला लागलाच कि, चेहऱ्यावर असले भारी भाव उमटायचे कि, हात जेव्हा ‘आडी’मधून बाहेर यायचा तेव्हा हातात तो अर्धवट पिकलेला आंबा असायचा. मग मी तो आंबा खिशात टाकून, कोणाचे लक्ष नाहीये याची काळजी घेत बाहेर पडायचो आणि मग घोलपाच्या आमराईमध्ये जावून, अर्धवट पिकलेल्या आंब्याला दोन्ही हातात ‘शंख’ पकडतात असा पकडायचो. मग दोन्ही हातांच्या अंगठ्यांनी हळुवार दाबत जाग्यावर गोलगोल फिरवायचो. तो अश्यासाठी कि,  आंबा जिथे थोडाफार कच्चा राहिलेला असायचा, तो देखील कडक न राहता रसाने भरून जायचा. मग आंब्याच्या वरचे तोंड, नखाने हळुवार उडवायचे, आणि चीकासोबत थोडा रस बाहेर काढून तो झटकायचा. कारण तो चिक   तोंडाला लागल्यावर ‘जर’ उमटायचा आणि चोरी उघडी पडण्याची शक्यता असायची. मग तो आंबा स्वर्गीय सुखाने खायचो. हे सगळे उपद्व्याप बापूंची नजर चुकवून यासाठी म्हंटले कारण, असे आंबे, पिकण्याआधी दाबून बघितले तर खराब होण्याची शक्यता असते, असे बापूंनी सांगितले होते. तरीही मी बधत नाहीये आणि अधूनमधून आंब्यांची संख्या कमी होतीये, हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मला समोरासमोर काहीही न बोलता, सकाळचा चहा प्यायला बसल्यावर इनडायरेक्ट ऐकवले. ते असे, कि काय आहे, उन्हाळ्यात लांबड्याना खूप गरम होते ना, मग ते गारव्यासाठी, अगदी इथे आडीतल्या गवतात देखील येवून बसतात. हे ऐकल्यावर कोणाच्या बापाची बिशाद पुन्हा ‘आडी’ मध्ये हात घालायची. कारण बापूंना माहित होते कि, मला लांबड्याची (म्हणजे सापाची) खूप भीती वाटायची.  हि मात्रा अगदी बरोबर लागू पडायची. मग मी रोज सकाळी, ‘आडी’पाशी उभा राहून, ‘आडी’तल्या अर्धवट पिकलेल्या आंब्यांच्या फक्त वासावरच भागवायचो. हे बापूंच्या अनेक मिश्किल स्वभावातल्या किश्यांपैकी एक छोटासा किस्सा.

मग तो सोन्याचा सुदिन दिवस उजाडायचा, पिकलेले आंबे बाप्पू ‘आडी’ मधून बाहेर काढायचे आणि मग संध्याकाळी आमरसाचा बेत फिक्स. बाप्पू मोठ्या पितळेच्या परातीमध्ये आंबे धुवून ठेवायचे आणि स्वतः समोर एक पितळी पातेल्यात त्याचा रस काढायचे. बाप्पू आंबा हातात असा काही गोल फिरवून, आपल्या एका डाव्या हाताच्या अंगठ्याने पिळायचे, कि ते बघायला भारी वाटायचे. कारण त्यांच्या उजव्या हाताला अंगठा नव्हता. तरुणपणी घोड्याला चारा खायला घालत असताना, घोड्याने त्यांच्या अंगठा तोडला होता. 

खरी मजा तर पुढे यायची, म्हणजे संख्येने आंबे जास्त असल्याने, आंबे  जास्त न पिळता, फक्त गर काढून घ्यायचे आणि मग कोय आणि साल याला चिटकून राहिलेला केशरी गर, अधाश्यासारखे बसून असलेल्या, मला आणि मामाच्या लहान मुलाला, म्हणजे नानाला मिळायचा. इथे बाप्पू खरी गंमत करायचे. आंबा पिळून घेण्याआधी आम्हा दोघांना विचारायचे, हा बोला, कोय कोणाला? आणि साल कोणाला? नाना म्हणायचा, मला कोय.. मग बाप्पू नानाला कोय देताना खूप सारा गर तसाच ठेवायचे आणि साल मात्र पिळवटून, अगदी कोरडी करून मला खायला दयायचे. मग मी आपलं तोंड वाकडं करून, अगदी म्हणायला थोडाफार गर असलेली ती साल खायचो. इकडे बाप्पू गालातल्या गालात मिश्किलपणे हसत असायचे. तो आंबा पिळून झाला आणि दुसरा आंबा घेतला कि, पुन्हा विचारायचे,हा आता बोला, कोय कोणाला? आणि साल कोणाला?यावेळी मी म्हणायचो, कोय मला पाहिजे... मग बाप्पू आंबा थोडासा पिळून, कोय बाहेर काढायचे आणि साल नानाला खायला दयायचे, ज्यामधून गर अगदी नावापुरताच काढलेला असायचा. मग गालातल्या गालात हसत, स्वतःच्या हातात कोय पकडून, त्याचा अगदी सगळा गर काढू घ्यायचे आणि नावापुरता राहिलेला गर असलेली कोय, म्हणजे अगदी पांढरे  केसं पिंजारलेली म्हातारी दिसावी, अशी कोय ते माझ्यापुढे धरायचे. मी हात पुढे करून ती कोय घ्यायचो आणि तोंड वेडावाकडं करीत गर शोधत कोय खायचो. इकडे नाना मात्र मिटक्या मारत गर असलेली सालं, कोय खात असायचा. आणि माझ्या वाट्याला फक्त म्हणायला पांढरी झालेली कोय आणि कोरडी सालं यायची. 

हि गोष्ट मात्र आजीच्या नजरेतून सुटायची नाही. पण आजी, जिला आम्ही आक्का म्हणायचो, ती काहीही न बोलता फक्त डोळे मोठे करून रागाने बापूंकडे बघायची आणि बाप्पू मात्र जणू काही घडलेच नाही अश्या अविर्भावात गालातल्या गालात हसायचे. मी चिडून त्यांना म्हणायचो, तुम्ही मुद्दाम असं करताय... यावर बाप्पू म्हणायचे, मुद्दाम कशाला...अरे, कितीही केलं तरी तू माझ्या लेकीचा, मुलगा आहेस. तेव्हा तुझा इथे काहीच अधिकार नाहीये. याउलट नाना माझ्या लेकाचा, मुलगा आहे. तेव्हा इथल्या सगळ्या गोष्टींवर त्याचाच हक्क आहे. त्यामुळे त्यालाच जास्त खायला घालणार ना. तुम्ही म्हणजे फक्त पाव्हणे...असं म्हंटलं कि, माझ्या रागाचा पारा चढायचा, कानशिलं गरम व्हायची, समोर जे दिसेल ते फेकून द्यायचो आणि तिथून आमराईमध्ये, जांभळाच्या झाडाखाली किंवा आंब्याच्या झाडावर, फांदीवर जावून बसायचो. 

थोड्यावेळाने जेवणाची वेळ व्हयाची, आमरस तयार झाला असेल या आठवणीनेच पोटात आग पडायला लागायची. फांद्यावरून खाली उतरायचो आणि सरळ घरी जायचो. मला बघितल्यावर आक्का, स्टीलचे ताट काठोकाठ  भरून आमरस वाढायची, आणि तो हि अनलिमिटेड. सोबत गव्हाची चपाती. आक्का, चुलीवर चपाती एवढी खरपूस भाजायची कि, चपाती कोरडी जरी खाल्ली तरी मन आणि पोट भरायचे नाही. मग जेवत असताना मान वर न करताच जेवायचो. त्याला कारण हि तसेच असायचे. परंतु मान खूपच दुखायला लागली कि, नाईलाजाने वर बघावे लागायचे, तर समोर जेवायला बसलेले असायचे, बाप्पू. डोळे बारीक करीत मिश्किलपणे माझ्याकडे बघत, गालातल्या गालात हसत असायचे. बापूंचे गालातल्या गालात हसणे, ज्याने कोणी अनुभवले किंवा ज्याला उमगले असेल त्याला त्यांचा मिश्किल स्वभाव नक्कीच कळला असणार. बापूंचे ते हसणे अगदी त्यांना शेवटची अंघोळ घालताना देखील मी अनुभवले होते. ते आयुष्यात कधीही माझ्या स्मृतीपटलावरून पुसले जाणार नाही. 

बापूंकडून मी अनेक चागंल्या गोष्टी घेतल्या, त्यातल्या तीन आजही भारी वाटतात. पहिली, त्यांचा मिश्कीलपणा, दुसरी,लहान मुलांसोबत, लहान होवून खेळकरपणे खेळणे आणि तिसरी, खूप महत्वाची म्हणजे, त्यांचे चहाची आवड (याला काही लोकं, व्यसन, असं म्हणतात, उगीचच...). या तिन्ही गोष्टी त्यांच्याप्रमाणेच शेवटपर्यंत माझ्यासोबत राहोत, हि प्रार्थना.

- सुरेश तु. सायकर                       

Wednesday, 4 January 2017

बंडूमामा...

थंडीचे दिवस आले कि, दरवर्षी तीव्रतेने आठवण येते ती, बंडूमामाची. हा मामा आईचा मावसभाऊ, अहमदनगरमध्ये राहणारा. पांढरा शुभ्र नेहरू शर्ट, पायजमा, खांद्याला शबनमची पिशवी अडकवलेला, त्यामध्ये वर्तमानपत्र, आणि एखाद दुसरं वैचारिक पुस्तक, आणि काहीबाही ठेवलेलं असायचं. जनरल नॉलेजमध्ये कोणीच हात धरू शकणार नाही. राजकारण, समाजकारण, अश्या एक ना अनेक प्रांतात मुशाफिरी करणारा. रंगाने अगदी सावळा, कुरळे केस, सदा हसमुख, तंबाकू खावून थोडेसे पिवळे झालेले खालचे दात, पण वरचे पांढरे शुभ्र, अगदी छन्नी हातोडीने कोरीव काम केल्यासारखे, हसताना डोळे मिचकावून, अगदी मोठ्ठा ‘आ’ वासून हसणारा आणि सोबत पहाडी आवाज. समोरच्याची बोलता-बोलता कधी फिरकी घ्यायचा, ते समोरच्याला देखील समजायचे नाही. समोरचा बकरा बनला हे बंडूमामाच्या लक्षात आलं कि, त्याला होणारा आनंद आणि सोबत त्याचा तो अगदी टिपिकल हास्याचा विस्फोट. मामाच्या गावी गेल्यावर प्रत्येक कार्यामध्ये सगळ्यात पुढं असायचा. तो असला कि, सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडेच जायचे. मी लहान असून देखील मला त्याचे विलक्षण वेगळेपण जाणवायचे. त्यात माझी  निरीक्षणाची सवय अगदीच लहानपणापासून असल्याने, मी सगळ्यांच्या खाणाखुणा, बोलण्याच्या लकबी आणि त्यांचे वेगळेपण बरोबर लक्षात ठेवायचो. बंडूमामाच्या अंगात नाना कळा, कधीही एका ठिकाणी फार काळ न टिकणारा अगदी स्वतःच्या घरात देखील. मिळेल ते उद्योगधंदे करणारा, समोरच्याला शब्दांमध्ये गुंग करून आपले ईप्सित साध्य करून घ्यायचे, काम झाले कि, मग गडी गुलाट.

तर असाच एके दिवशी, भर थंडीच्या संध्याकाळी, कधी नव्हे ती स्वारी आमच्या घरी अवतरली. बंडूमामा याआधी कधी घरी आलेला मला आठवत नव्हते. हो, माझे वडील होते तेव्हा एकदा येवून गेलेला अंधुकसे आठवत होते आणि त्यानंतर वडील गेल्यानंतर साधारण दोन-तीन वर्षांनी तो आलेला. आमची घर चारही बाजूने लोखंडी पत्र्याने वेढलेले असल्याने थंडीच्या दिवसांमध्ये जरा लवकर आणि जास्तच गार पडायचे. त्यामुळे घरात वावरताना, दातांचे अगदी तुणतुणे वाजायचे. जिथे घालायलाच चांगल्या कपड्यांची मारामार असायची, तिथे स्वेटर सारख्या तद्दन गोष्टींचे फालतू लाड कोणाला परवडणार. आई कामावरून प्रचंड दमून यायची. तिच्या कामाचा भार हलका व्हावा म्हणून, ती येईपर्यंत मी निम्मे काम उरकून ठेवायचो. ती आल्यावर शिरस्त्याप्रमाणे, पहिले हात पाय स्वच्छ धुवून मगच पुढचे काम हाती घ्यायची. आणि मी देखील शिरस्त्याप्रमाणे गरमागरम चहा बनवून तिच्या हाती द्यायचो. मग ती एकदम खुश व्हायची, छान हसायची, दिवसभराचा शिनभाग एका झटक्यात हलका व्हायचा तिचा. मग चहा झाल्यावर, आई स्वयंपाक  बनवायला घ्यायची. त्यादिवशी तिचा चहा पिऊन होतो ना होतो तोच, बंडूमामा अचानक आणि अनपेक्षितपणे दारात अवतरला. त्याला बघितल्यावर आईला आश्चर्य वाटलं, कारण, बंडूमामा कधीही अगदी सहज कोणाच्या घरी जाणारा नव्हता. पण त्याच्या नेहमीप्रमाणे हसण्याच्या स्टाईलने तिची चिंता थोडी कमी झाली. कारण मामाला पाहिल्यावर, काहीतरी अघटीत घडले कि काय? असेच काहीसे तिच्या मनात आले. आईने मामासाठी चहा बनवला. मामा फुरके मारत मारत गप्पा मारायला लागला. जसजसा उशीर व्हायला लागला तसतसा माझा राग वाढायला लागला. मी आपला अभ्यास करीत मामाकडे रागाने बघत, आईला नजरेने खुणावून, मामा कधी जाणार हे विचारत होतो. आईने माझ्याकडे थोडे दुर्लक्षच केले. कारण बऱ्याच दिवसांनंतर माहेरचे कोणी आलेले पाहून, ती खुश झालेली होती. माझ्या रागाचे कारण म्हणजे, मी माणूसघाना असल्याचा नव्हता, तर अश्या प्रचंड थंडीमध्ये मामा इथे कशाला तडफडला याचा होता. कारण माझ्या डोक्यात फक्त एकच विचार चालू होता. तो म्हणजे, पांघरायला फक्त मोजून दोनच गोधड्या, एक आईसाठी आणि दुसरी माझ्यासाठी आणि मोठ्या भावासाठी, बरं ती पण चार ठिकाणी ठिगळं लावलेली. आता आमच्या वाट्याची गोधडी बंडूमामला दयावी लागणार आणि भर थंडीमध्ये कुडकुडत आम्हा दोघांना भावांना, साडी अंगावर पांघरून रात्र जागायला लागणार. नाहीतर आई, आपल्या भावासाठी, तिची गोधडी बंडूमामला देणार आणि ती थंडीमध्ये कुडकुडत जागी राहणार. एकतर आई आमची गोधडी देवू देणार नव्हती, म्हणजे ती स्वतःची गोधडी मामाला देणार आणि दिवसभर प्रचंड कष्ट करून आलेली बिचारी रात्रभर कुडकुडणार. मला या विचारानेच बंडूमामाचा मनस्वी राग यायला लागला होता. पण मामाच्या ते गावीदेखील नव्हतं. त्याचं नेहमीप्रमाणे जोरजोरात हसत गप्पा मारणे चालू होते. आई आज्जीची खुशाली विचारात होती, आणि कधी नव्हते तो मामा त्यांच्या लहानपणीच्या आठवणींच्या गप्पांमध्ये रमून गेला होता. एवढ्यात मोठा भाऊ देखील कामावरून आला. मग आम्ही सगळ्यांनी सोबत जेवण केले. जेवणावर प्रचंड प्रेम असलेला, मागचा पुढचा विचार न करता तुटून पडणारा, पण त्यादिवशी मामाने अगदी कमीच जेवण केले. गप्पांमध्ये तो एवढा रमून गेला होता कि, ताटामध्ये काय काय वाढलंय, याचे देखील त्याला भान नव्हते. बंडूमामाची जेवण झाल्यावर चूळ भरण्याची एक वेगळीच खासियत होती. जेवण झाल्यावर तोंडात थोडं पाणी ठेवून तोंडात बोट घालून दातांवर खसाखसा घासायचा आणि पाणी पिऊन टाकायचा, मला तर तो प्रकार फारच किळसवाना वाटायचा. पण मामाला कधीच कोणाची फिकीर नसायची, अगदी कोणाचीच. जेवण आटपल्यावर आईने भांडी घासायला घेतली आणि मी झाडून घेवून अंथरूण टाकायला. तरी देखील मामाच्या तोंडाचा पट्टा अखंड चालूच होता. लहानपणी त्या सगळ्या भावंडानी मिळून खेळलेले खेळ, त्यांच्या चुलत्याच्या, चुलतीच्या, पुतण्याच्या, पुतणीच्या, एक ना अनेक आठवणींच्या गप्पांचे कोठारच जणू मामा रिता करीत होता. झोपायची तयारी झाली, आणि माझे लक्ष आता कोणाला गोधडीचे बलिदान दयावे लागतय? याकडेच होते. शेवटी आईने स्वतःची गोधडी मामाला दिली आणि ती साडी पांघरून घेवू लागली, तसा मामा गप्पांमधून भानावर आला, आणि म्हणाला, आरं....येडी काय काय तू तायडे...हे बघ आतमधून स्वेटर घातलाय म्या, अन वरून शर्ट...मला दी साडी... आरं...लेकरासाठी, आईची माया आन भावासाठी बहिणीची छाया अस्ती बग...लय ऊब अस्ती मायेमदी... इतका वेळ मामाबद्दल मनामध्ये दाबून ठेवलेला राग झटक्यात विरघळून गेला. आई आग्रह करीत असताना देखील, मामाने गोधडी घेतली नाही, आणि मामा गप्पा मारताच राहिला. त्याच्या त्या पहाडी हसण्याने, आणि मध्येच आईचा डोळा लागतोय कि, काय असं वाटल्यावर, व्हय रं तायडे.. असं म्हणत मामाने आम्हा दोघा भावांसोबत आईला देखील रात्रभर जागं ठेवलं. नाना पेठेमध्ये सकाळी सात वाजता आईला कामावर हजर राहण्यासाठी, साडेसहाला घर सोडायला लागायचे. त्यामुळे आई पहाटे लवकर उठून स्वयंपाक आवरायची. दुसरा दिवस उजाडला तरी मामाच्या गप्पा काही संपतच नव्हत्या. आईने सगळं आवरलं आणि मामाला म्हणाली, “ कामावरून सुट्टी घ्यायची असेल तर आधीच सांगावं लागतं, नाहीतर काम करून देखील दोन दिवसांचा पगार कट करतात. मी कामावरून लवकर येईन संध्याकाळी मामा म्हणाला आरं तायडे...एवढा येळ नाहीये...आता आलोयच पुण्यात तर बाकीच्यांना पन भेटून घेतु कि....” आईने खूप आग्रह केला, पण मामाने अजिबात ऐकलं नाही. आईला म्हणाला “तुज्या हातचा पेशल चहा दे करून” फुरके मारत-मारत, बशीमध्ये खोलवर बघत, मामानं चहा संपवला. तेही अजिबात न बोलता. खालच्या नजरेने बघत, मामा आईला म्हणालं “दाजी गेल्यावर, तू ज्या कष्टानं पोरांसाठी करतीयास ते बगून खरंच लय भारी वाटतंय...अशीच गुनान रहा...माग पुड पोरं मोठी झाल्यावर तुला म्हातारपणात लय चांगली सांभाळतील...” रात्रभर हसून बोलणारा बंडूमामा अगदी गहिवरून बोलत होता. माझ्याकडे बघून म्हणाला,” बाबा रं...म्हातारीला इसरू नगा...गड्यावानी तुमच्यासाठी कष्ट करतीया...लांड्या-लबाड्या, शिंदळकी करू नगा...मानुस म्हणून जगा” आईला इकडं कामाला उशीर होत होता. मामा असं बोलल्यावर तिचा पायच निघत नव्हता. पण परत मामा आपल्या पहाडी हास्यानं म्हणाला, “आता जातू...अजून लय कामं शिल्लक हायेत” आई आग्रह करीत राहिली पण मामा आंघोळ न करता, आहे तसाच, शबनमची पिशवी खांद्याला अडकवून बाहेर पडला. आई आणि मी दारात उभे राहून मामाला बघत होतो. बंडूमामा ताडताड चालत बाहेर पडला. आम्ही दारात उभे राहून त्याला निरोप देतोय हे माहित असून देखील, त्यानं एकदा पण माघारी वळून पाहिलं नाही. कोपऱ्यावरच्या घराच्या बाजूने मामा नजरेआड झाला. का कुनास ठावून, आई त्यादिवशी कामावर जायला मागे पुढे करीत होती. तिचे कामावर जाण्यासाठी मन होतच नव्हते, शेवटी ती कामावर गेली. मी देखील शाळेत जाण्याची तयारी करण्यासाठी घरात आलो.

थोड्या दिवसांनतर समजले, बंडूमामा गेला, ब्लड कॅन्सरने. डॉक्टरांनी मामाला सांगितले होते, पण त्याने कोणालाच कळून दिले नव्हते, अगदी घरी आजीला आणि मामीला देखील. त्याची एक इच्छा होती, आपल्या सगळ्या भाऊ, बहिणींना, जवळच्या नातेवाईकांना भेटायचे, अगदी शेवटचे. आम्हाला भेटून गेल्यावर तो आणखीन कोणा-कोणाला भेटायला गेला होता, हे देखील आम्हाला माहित नाही. तशी कोणी एकमेकांकडे विचारणा देखील केली असली तरी, ती माझ्यापर्यंत पोहोचली नव्हते. पोहचले होते ते फक्त, बंडूमामाचे ते समोरच्याची फिरकी घेवून होणारे गडगडाटी हास्य आणि महत्वाचे म्हणजे, माणूस म्हणून जगण्याची कला. बंडूमामाला खरंच कधीच कोणाची फिकीर नसायची, कोणाचीच, अगदी त्या तुच्छ मरणाची देखील.

आज घरामध्ये भरपूर अंथरायला, पांघरायला गोधड्या, ब्लान्केट, घालायला स्वेटर, झालंच तर जर्किन, कानटोपी, असे बरेच काही आहे. तरी देखील भर थंडीमध्ये जेव्हा जेव्हा अगदी सहज जरी कुडकुडायला होते,  तेव्हा आपसूक दाराकडे लक्ष जातं. असं वाटतं कि, दारात उभा राहून बंडूमामा माझ्याकडे बघून हसतोय.


- सुरेश तु. सायकर  

Thursday, 15 December 2016

शहिदांची नेमकी व्याख्या कोणती ?

सीमेवर शत्रूसोबत दोन हात करीत लढताना वीरमरण आल्यावर सैनिक शहीद होतो. त्याला सरकारदरबाराकडून शहीदाचा दर्जा प्रदान केला जातो. हे अगदी योग्यच आहे, त्यांचे बलिदान नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. कारण तो देशातील अंतर्गत नागरिकांचे रक्षण करण्याच्या महान उद्देश्याने सीमेवर लढतो. सैनिक म्हणून हे त्याचे सर्वप्रथम कर्तव्य, आणि तो त्या कर्तव्याला पुर्णपणे जागतो आणि मरतो देखील.

पण जेव्हा देशाच्या अंतर्गत भागामध्ये काही आणीबाणीचे प्रसंग उद्भवतात जे नैसर्गिक नसतात. ज्याची पूर्णतः जबाबदारी लोकशाही पद्धतीने निवडून दिलेल्या सरकारवर असते. अश्यावेळी ती जबाबदारी सरकारने स्वीकारून, त्यावर ताबोडतोब प्रभावी उपाययोजना राबवल्या पाहिजेत. देशाचा नागरिक म्हणून, देशहितासाठी  त्रास सहन करण्याची नागरिकांची तयारी असावी, अशी सर्वसाधारण धारणा असते. काही प्रमाणात ती योग्यदेखील आहे. देशहितासाठी घेतला जाणारा, एखादा निर्णय दूरगामी परिणाम करणारा असतो आणि त्याचा येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी फारच उपयोगाचा असतो. पण देशामध्ये प्रत्येक वर्ग वेगवेगळा असतो आणि तो वेगवेगळा स्तरावर मोजला जातो, कनिष्ठवर्ग,मध्यमवर्ग,उच्चवर्ग. प्रत्येकाच्या दैनंदिन आणि मुलभूत गरजा देखील वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. कनिष्ठवर्ग पूर्णतः आणि मध्यमवर्गातील काही सुरुवातीचे घटक, हाती येणाऱ्या रोजच्या मिळकतीवर त्यांच्या दैनंदिन गरजा भागवत असतात. परंतु अश्यावेळी त्यांच्या दैनंदिन गरजांवर घाला घालणे, मानवनिर्मित उदभवलेल्या परिस्थितीवर वेळीच ठोस उपाययोजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे न करणे. ससेहोलपट होत असताना, दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यासाठी, हाती निराशा लागणाऱ्या रांगांमध्ये उभे राहावे लागले, तरीही जनता हा त्रास सहन करीत कितीही काळ उभी राहते. अश्यावेळी त्यापैकी एखाद्याने जरी  बंडखोरीची भाषा वापरली तर त्याला शांत करण्यासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांची उदाहरणे दिली जातात. निस्पृह सेवेसाठी कटीबद्ध असणारे, देशासाठी आपले प्राण न्योछावर करणारे आपले वीर सैनिक, ज्यांना गोळीच्या बदल्यात गोळी मिळते, पण तुम्हाला तर इथे पैसे मिळणार आहेत. मग कांगावा कशाला ??? प्रत्येक देशाचा  नागरिक, प्रचंड मातृप्रेमी असतो आणि तितकाच मातृभूमी प्रेमी देखील. जितकी श्रद्धा त्याची जन्मदात्या आईवर असते तितकीच आईचा दर्जा असलेल्या आपल्या मातृभूमीवर देखील असते. मग तो देश क्षेत्रफळाने प्रचंड प्रमाणात विस्तारलेला असेल किंवा अगदी बेटांच्या स्वरुपात तुकड्यांमध्ये विखुरलेला असेल. रांगांमध्ये उभे राहणाऱ्या नागरिकांना, सीमेवर लढणाऱ्या वीर सैनिकांचे उदाहरण देवून, एकाच पट्टीमध्ये मोजले जाते. पण मग जेव्हा रांगामध्ये उभे राहणारे सामान्य नागरिक जीवानिशी मरतात, तेव्हा त्यांच्या मरणाची अहवेलना का ??? त्यांचे मरण मोजताना ती पट्टी अचानक कुठे गायब होवून जाते ???

जिथे नक्षलवाद्यांसोबत दोन हात करीत असताना, वीरमरण आलेल्या पोलिसांना शहीदाचा दर्जा प्राप्त होत नाही, तिथे सर्वसामान्यांची काय टाप.

- सुरेश तु. सायकर   

Sunday, 4 December 2016

...शेवटी सुधाकररावच

शेवटी सुधाकररावानां प्रोमोशन मिळून खुर्ची मिळालीच. इतके वर्ष ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो ‘सोनियाचा’ दिन त्यांनी छिनके, हिकमतीने मिळवून आपल्या आयुष्यात आणलाच. खुर्चीमध्ये स्थानपन्न झाल्यावर, त्यांनी खुर्चीवर विश्रांती न घेता दौऱ्याचा धडाका सुरु केला. पूर्वीच्या काळी जसे राजे-महाराजे सूत्रे हाती घेतल्यावर आपल्या राज्याचा दौरा करून सगळी परिस्थिती पहायचे. अगदी तसेच सुधाकररावांनी दौरे सुरु केले. जसे प्रत्येक ऑफिसमध्ये/दुकानामध्ये/कारखान्यांमध्ये अगदी मित्रांमध्ये दोन गट असतात, अगदी तसेच इथे देखील होते. सुधाकररावांना त्यांच्या ऑफिसमधल्या दुसऱ्या गटाच्या इतर सभासदांनी विरोध सुरु केला. असे राज्यभर उंडगायचा (पक्षी-दौरे) खर्च ऑफिसला पेलवणारा नाही, असं सूर सगळ्यांनी काढला. तरीही सुधाकरराव त्यांना बधले नाही. त्यांनी सगळे राज्य पायाखालून (पक्षी- विमानाखालून) घालवले. प्रत्येक ठिकाणी आपल्या नावाचा डंका जोरजोरात वाजवला. अगदी तिथल्या स्थानिक रहिवाश्यांनी सुद्धा आश्चर्याने त्यांच्या पुढे मान झुकवली (खरं तर ती त्यांची, पाहुण्याचे स्वागत करण्याची पद्धत आहे.) असा चारही दिशांना आपल्या नावाचा गवगवा झाल्यावर, सुधाकरराव मनोमन सुखावले. अगदी त्यांच्या स्थानिक वर्तमानपत्रात देखील मानाचे फ्रंट पेजवरचे स्थान सुधाकररावांनी मिळवले होते. पण इकडे ऑफिसमधल्या विरोधकांची घालमेल जास्तच वाढू लागली. ‘ऑफिस म्हणजे फक्त सुधाकरराव’ (पक्षी- भारत म्हणजेच....श्री._ _ _ बस्स का राव...हे पण आम्हीच सांगायचे का..???) अशी समीकरणे जिथे-तिथे उमटू लागली. आपले स्थान आणि आपल्या नावाचे रुपयासारखे घटत जाणारे अवमूल्यन विरोधकांना असह्य होवू लागले. त्या सर्वांनी मिळून सुधाकररावांच्या दौऱ्याची यथेच्छ टवाळकी सुरु केली, एवढ्यावरच न थांबता त्यांना ऑफिसमधून मेमो दयायचा घाट घातला. सुधाकारारावांना त्यांच्या विरोधात होत असलेली हालचाल जाणवली आणि सरतेशेवटी सुधाकारारावांनी आपले दौरे एकदाचे थांबवले.

इकडे विरोधकांनी आपण कसे विजयी झालो आणि सुधाकारारावांची कशी जिरवली याचा आनंद ढोल बडवून, एकमेकांना शुभेच्छा, आलिंगन देत साजरा करू लागले. पण.....सावजाला बेसावध ठेवून त्याची शिकार करण्याचे कमालीचे कसब सुधाकारारावांनी आत्मसात केलेले होते. एखाद्या तेल लावलेल्या पैलवानासारखे ते तयार गडी होते. आपल्या विरोधात असणाऱ्यांवर त्यांनी प्रभावी अस्त्र उगारले (बी.आर.चोप्रांच्या टी.व्ही.वरच्या ‘महाभारता’चे सुधाकारारावांनी अगदी पारायण केलेले आहे. म्हणजे, इकडून शत्रूने भात्यामधून बाण बाहेर काढून अर्जुनावर डागला कि तिकडून अर्जुन आपल्या भात्यामधून बाण बाहेर काढून धनुष्यामध्ये अडकवून त्या बाणाला नमस्कार करीत काहीतरी पुटपुटत असे आणि ’ये लो मेरा ब्रम्हास्त्र’’ असे म्हणत शत्रूवर डागत असे.मग शत्रूकडून येणारा बाण आणि अर्जुनाकडून येणारा बाण एक विशिष्ट संगीत ‘ढिंग.ढिंग.ढिंग..टव्यांक... टव्यांक... टव्यांक ’ असं वाजवत येवून एकमेकांवर आदळत असे, (कृपया प्रत्येकाच्या आवाजाच्या बाबतीतचे ज्ञान अगदी अल्प असे शकते. तेव्हा वाचकांनी आपल्या स्वतःच्या स्मरणशक्तीवर भार देवून आणि शक्य न झाल्यास यू-ट्यूब या आधुनिक ‘संजय’ची मदत घेवून ऐकू शकता/पाहू शकता...) आणि मग त्यातून शत्रूचा बाण एखाद्या फुसक्या चायनीज फटाक्यासारखा फुस्स्स...होऊन गायब होत असे. (अहो राजे....विषयांतर होतंय...भूतकाळातून, चालू-वर्तमानाकाळात या...अजून भविष्यात काय वाढून ठेवलंय ते सुधाकारारावांनाच ठावूक....) तर असा खेळ पुरेपूर पाठ असलेल्या सुधाकारारावांनी एका बेसावध क्षणी ते ब्रम्हास्त्र (पक्षी-क्षेपणास्त्र) आपल्या शत्रूवर (पक्षी-विरोधकांवर) डागले. त्यांनी एका रात्रीत बेसावध रात्री शत्रूला खिंडीत पकडून, आदेश काढला.

टेबलाखालून येणाऱ्या ‘माया’वर त्यांनी बंदी घातली. कोणीही कितीही ‘ममते’ने अगदी काहीही दिले तरी त्याच्यावर कडक कारवाईचे आदेश दिले. कोणीही ‘लालू’च दाखवली तर त्याला भुलू नये. इतके दिवस ‘मुलायम’ वाटणारे खुर्चीचे आसन ऑफिसमधल्या विरोधकांच्या आता बुडाला टोचू लागले. ‘सोनियाचे’दिन जावून भिक्षेचे पात्र हाती आले. के’जरी’वालले (पक्षी-केस जरी वाळले...थोडे ओठांचा चंबू करून या आडनावाचा उल्लेख करावा...किंवा एखाद्या बोबडे बोल बोलणाऱ्याला हे आडनाव उच्चारायला लावावे....म्हणजे लक्षात येईल...आणि यातला ‘स’ हा सायलेंट आहे...(अरे किती फेकायचे....) तर... असो ) तरीही खोकल्याची उबळ अजिबात कमी होणार नाही, याची पुरेपूर काळजी सुधाकारारावांनी घेतली. मग काय विचारता....ऑफिसातल्या सगळ्या विरोधकांचे धाबे दणाणून गेले. जो-तो सुधाकारारावांना आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध करू लागला, परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही. आपली कामे करून घेण्यासाठी ऑफिसमध्ये येणाऱ्या पिचलेल्या सर्वसामान्यांना कसे छळले जात होते, हे सर्वश्रुत होतेच. मग सर्वसामान्यांनी देखील आम्हाला त्रास झाला तरी चालेल, परंतु हि बुरशी,कीड,वाळवी प्रभावी पेस्ट कंट्रोल करून एकदाची मुळासकट उपटून टाकाच, असं म्हणत पाठींबा दिला. विरोधकांनी मग ‘एक दिवस ऑफिसचे काम बंद’ची हाक दिली, मग सुधाकारारावांनी नेहमीप्रमाणे सर्वसामान्यांना भावनिक आवाहन केले. आणि मग त्यांच्या आवाहनाला तळागाळातून भरभरून पाठींबा मिळाला. इकडे ऑफिसमधल्या विरोधकांच्या आरोपांची हवाच निघून गेली. (ऑफिसमधल्या अज्ञानी विरोधकांच्या बऱ्याच उशिरा लक्षात आले कि, त्यांनी बंद साठी निवडलेल्या तारखेला वार हा ‘रविवार’ होता..आणि असं हि...रविवारच्या दिवशी फक्त, टमरेल घेवून सार्वजनिकला आणि दुपारी मटण/चिकन/मासेवाल्याशिवाय पब्लिक कोठेही लाइनीला उभे राहत नाही. तिथे बंदसाठी विरोधकांच्या काय पाठी उभे राहणार.)      
  
इकडे विरोधकांमध्ये मात्र तिसरे महायुद्ध भडकले आहे. जो-तो दांडके (पुरुषांचे हत्यार) आणि लाटणे (स्त्रियांचे हत्यार) हातात घेवून फिरत आहेत. आणि दिसेल त्याला एकमेकांची गचांडी (पुरुष-पुरुषांची) आणि पदर (स्त्रिया-स्त्रियांचे) पकडून दरडावून विचारात आहेत....आयचा घो....आरं कुनी त्या सुधाकारारावांना दौरे करून नगा म्हणून सांगितलं हुतं....त्यो भायर हुता तेच बरं हुतं....त्ये हापिसात येऊन बसाय लागलं...अन आपल्या बुडाखाली आग लावलीया.... (एक कळकळीची विनंती... कृपया, वरील डायलॉग प्रत्येकाने आपापल्या भाषेमध्ये अनुवादित करून घ्यावा....किशोरदा/बच्चनसाहेबांच्या कृपेने आम्हाला फक्त ‘आमी तुमाके भालो बाशि’ एवढंच येतंय.....शेवटी कमी बुकं शिकलेली अडाणीच आम्ही...बरोबर ना....असो...)

- सुरेश तु. सायकर                                       

Sunday, 16 October 2016

...तथास्तु

( स्थळ : पुण्यातला प्रचंड रहदारीच्या, अगदी बाजीराव रस्त्याकाठच्या, सदाशिव पेठेतील पाच मजली इमारत, नाव-कल्पवृक्ष, टेरेसवर जमलेली सोसायटीची सभासद मंडळी )

सोसायटीच्या अजेंड्यावर कधी नव्हे तो खूप मोठा आणि अतिमहत्वाचा विषय आला होता.

लिफ्टचा दरवाजा उघडा राहू नये आणि जर चुकून राहिलाच तर तो लक्षात यावं म्हणून, सोसायटीच्या सर्व सभासदांनी (कोकणस्थ आणि देशस्थ याचे पहिल्यांदा एकमत झालेले दुर्मिळातले दुर्मिळ उदाहरण.असो.)   असे ठरवले कि, जोरात वाजणाऱ्या एखाद्या संगीताची धून लावावी. (बरं, इथे शीला कि जवानी, मुन्नी बदनाम हुई, असले थर्ड क्लास संगीत कानाखाली फुकटात वाजवले जाते. त्यामुळे त्याचा विचार देखील कोणाच्या मनात येणे देखील दुर्लभ) कोणी तरी सुचवले कि, पंडितजींच्या आवाजातील भैरवी लावावी. पण समजा रात्रीच्या वेळी जर कोणी घाईघाईमध्ये दरवाजा लावायचा ठार विसरला तर...? आख्खी सोसायटी पहाट झाली समजून जागी व्हायची. तेव्हा तेही बारगळले. अगदी संगीत नाटकाचे पद ते समुधुर संगीत यावर देखील चर्चा झाली. शेवटी एकमताने निवड झाली ती, ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे याची. सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि चहा पाण्याचा कार्यक्रम करायचा ठरला...आपापल्या घरी.

मी मात्र जाम वैतागली होती, सगळ्यांवरच, अगदी आयुष्यावर देखील. इंग्लिश मिडीयम शाळेमध्ये टीचर म्हणून काम करणे सोप्पे नव्हे. त्यातल्या त्यात, लहान मुलांना शिकवायचे म्हणजे तुमच्यामध्ये, फक्त असीम नव्हे तर जीव गेला तरी शांत राहून हसरा चेहरा ठेवण्यासाठीचे, पेशन्स असणे खूप गरजेचे. सरकारचा नवीन नियम, लहान मुलांवर हात उगारायचा नाही, त्यांना शारीरिक शिक्षा देखील करायची नाही. तर शिक्षा म्हणून त्यांना वर्गाच्या बाहेर उभे करायचे. त्यातल्या त्यात काही टारगट मुलं तर ठरवून दंगा करतात आणि शिक्षा म्हणून बाहेर उभे राहण्याची शिक्षा आनंदाने स्वीकारतात. त्यातल्या त्यात शिक्षा जर कारंज्यापाशी झाली तर अगदी मान ताठ करून जातात, कारण समोरच रहदारीचा वाहता रस्ता असल्याने, मुलांना मस्त आनंद वाटायचा. तिथली शिक्षा अगदी रंगवून इतर मुलांना सांगायचे. जणू काय पिकनिक पॉइंटच तो. अशातच घरी येवून थोडा वेळ शांततेत राहावे तर ब्लॉक नेमका लिफ्टच्या बाजूलाच असल्याने नेहमी लिफ्टचा दरवाजा उघडा राहायचा. मग कोणीतरी पाचव्या मजल्यावर येवू पाहणारे, तळमजल्यावरून दरवाजा उघडा ठेवणाऱ्याच्या नावाचा उद्धार करायचे. मग न राहून शेवटी आवाज यायचा तो यायचाच, बाळ इंदू, अगं जागीच असशील, तर जरा त्या लिफ्टचा दरवाजा (पण खरं तर तो उच्चार...थोबाड असाच असायचा) व्यवस्थित लाव बरं. मग दरवाजा न लावणाऱ्याचा आणि तळमजल्यावरून अगदी पाचव्या मजल्यापर्यंत उंच स्वरात दरवाजा लाव म्हणून ऑर्डर सोडणाऱ्याच्या नावाचा उद्धार करीत, मी लिफ्टचा उघडा दरवाजा व्यवस्थित लावत असे. तसा सगळ्यांना माहित होता, माझा जमदग्नीचा अवतार. पण इथे दारात उभ्या राहिलेल्या सेल्समनला कोणी दार उघडून बघत नाही, तिथे माझा जमदग्नीचा अवतार पाहायला, कोण पाचव्या मजल्यावर येणार.    

लिफ्टमन म्हणून काम करणारा महादू, वय झाल्यामुळे काम सोडून गेला होता. त्या बिचाऱ्याने इमानीतबारे पुरे चाळीस वर्षे नोकरी केली होती. तसा त्यालाही दुसरा कोणताच पर्याय नव्हता. आधी जसे, कारकुनी नोकरी करणारे आयुष्यभर एकाच जागी चिटकून अगदी, पी.एफ. ग्राजुईटी घेवून निवृत व्हायचे. अगदी तसेच महादूचे होते. जाताना त्याला अगदी उचलून, रिक्षात घालून त्याच्या मुलांनी नेला होता. त्याला पी.एफ. ग्राजुईटी मिळाली नाही, हि गोष्ट अलहिदा. तर तो गेल्यानंतर, इथे कोणीच लिफ्टमन म्हणून काम करायला तयार होत नव्हता. त्याला कारण फक्त अशक्त, कमकुवत पगार नव्हता. तर त्याला असणारे कारणच खूप विचित्र होतं, तळमजल्यावरच्या जोशींकाकूंना दुधाच्या पिशव्या आणून देण्यापासून ते पाचव्या मजल्यावरच्या दामले आजींची औषधे आणून देण्याची कामे त्या एकाच पगारामध्ये त्याला करावी लागत असे. मधल्या मजल्यावरच्या मंडळींची मग बातच नको. अनेकदा तर, दुसरे कामाला लावतात, तर मग आपणा का नको? अशी ईर्ष्या वाटून, कुलकर्ण्यांनी तर एकदा कहरच केला. त्याला अगदी ठरवून पाच वेळा वर्तमानपत्र बदलून आणायला पाठवले होते. प्रत्येक वेळी वेगवेगळे समूहाचे वर्तमानपत्र बदलून आणायला नव्हे, तर, आधी काय म्हणे तर वर्तमानपत्राचा छोटासा कोपराच फाटलेला,  तर दुसऱ्यांदा आतल्या पानाची घडी व्यवस्थित नसल्याने नेमकी त्यांना वाचायच्या बातमीवर रेघ पडली होती म्हणून. असल्या छळाला वैतागून, तो बिचारा लिफ्टमन फक्त पळून गेला म्हणून नशीब. नाहीतर बिचाऱ्याने पाचव्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला असता, तो हि नेमका जोशींच्या, कुलकर्ण्यांच्या,दामलेंच्या डोक्यावर. तसेही हे सगळे एका जागीवर सापडणे दुर्मिळच, बहुतेक त्याला याची जाणीव झाल्याने, तो बापडा पळून गेला.

कमीला भर म्हणून कि काय, माझ्या शेजारच्या ब्लॉकमध्ये कानाने एकदमच ब्लॉक झालेल्या दामले आजी राहत होत्या. नेमक्या त्याच नेहमी लिफ्टचा दरवाजा उघडा ठेवून निघून जात असत. तश्या त्या एकट्याच राहत होत्या, मुलगा अमेरिकेला आणि मुलगी लग्न होवून मुंबईला. दामले आजींना जिथे मुंबईच वर्ज्य तिथे अमेरिकेची बातच नको. त्यामुळे त्या एकट्याच राहायच्या, जसे जमेल तसे स्वतःसाठी बनवून खायच्या. त्यांचा वेळ घरापेक्षा, राम मंदिरामध्येच जास्त व्यतीत व्हायचा. त्यांना ऐकू अजिबातच यायचे नाही, तरीपण भजन, कीर्तन यामध्ये अगदी तल्लीन होवून जायच्या. मला नेहमी वाटायचे, सोसायटीच्या सभासदांना सांगून लिफ्टच्या दरवाजास भजन, कीर्तनाची ट्यून लावावी. कमीकमी त्यामुळे तरी त्यांना ऐकू जाईल. कावळा बसायला अन फांदी तुटायला एकच वेळ म्हणतात. तसं घडलं, मला जेव्हा समजले कि, लिफ्टसाठी ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे ची ट्यून लावणार आहेत. त्यावेळेस साखरेचे अगदी चार दाणे, सोसायटीतल्या सगळ्या लोकांच्या हातावर ठेवावेत असे मनात आले. पण दुसऱ्याच क्षणी, एखाद्याचे एफ.बी.वरचे अपडेट केलेले स्टेटस चांगले असून देखील लाईक करायचा विचार झटकावा, तसे ते झटकून टाकले. शाळेतून आल्यावर, तळमजल्यावरून लिफ्टने डायरेक्ट पाचव्या मजल्यावर येणारी मी, मधल्या मजल्यांवर कोण राहते याची साधी चौकशी पण कधी केली नव्हती आयुष्यात. त्यातल्या त्यात बेशिस्त लोकं जवळपास म्हंटली कि, माझ्या डोक्यात प्रचंड तिडीकच जाते. शाळेतील मुलं कमी पडतात म्हणून कि काय, सोसायटीमधली मुलं काही कमी नव्हती. पण त्यांना माझा नेहमीच धाक असायचा. मी फक्त डोळे रोखून जरी त्यांच्याकडे पहिले, तरी ती मुले मुकाट तोंड खाली पाडून निघून जात. अश्यातच, ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे ची ट्यून लावणार म्हंटल्यावर, आता आपली, लिफ्टचा दरवाजा लावण्यापासून सुटका होणार, याचा खूपच आनंद झाला.

त्या दिवशी शाळेमधून आल्यावर नेहमीप्रमाणे प्रचंड चिडचिड झालेली. वर्गामध्ये एका मुलींला होमवर्क का केले नाही म्हणून विचारले तर, डान्स इंडिया डान्सचा प्रोग्रॅम टीव्हीवर लागलेला होता, तो बघताना झोपी गेले. आता सौम्य शिक्षा ती काय करावी...? या विचाराने डोक्याची नस फुटून जायची वेळ आली होती. वर्गाबाहेर जावून उभी रहा असं सांगितलं तर, अगदी निर्लज्जपणे, मिस, कारंज्यापाशी का..? असं विचारले. मनात आलं, कि दोन, चार.... पण विचार मनातच गाडून टाकला. डोकं प्रचंड दुखत होते, म्हणून घरी आल्यावर आलं, सुंठ टाकून चहा बनवायला घेतला. पातेल्यात चहा उकळत होता आणि   माझं रक्त देखील. इतक्यात ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे ची ट्यून वाजली. मनात म्हंटल, चला, आजी मंदिरातून आल्या असतील, आता त्या ट्यून ऐकून लिफ्टचा दरवाजा बंद करतील. पण दरवाजा काही बंद झाला नाही, म्हणून मी लागोलाग बाहेर जावून पाहिलं तर, लिफ्टचा दरवाजा थोडा उघडाच होता. आणि इकडे दामलेआजी जणू काय भजन चालू आहे, अश्या अविर्भावात टाळ्या वाजवत दरवाजा उघडून आपल्या ब्लॉकमध्ये जात होत्या. मी एकदम किंचाळूनच जोरात ओरडले, आजी त्या दरवाजाचे थोबाड आधी बंद करा. भजनामध्ये रंगत यावी, म्हणून बुवा जसे मध्येच उच्च स्वरात हुंकार भरतात. बहूतेक त्यांना तसेच वाटले कि काय, म्हणून त्यांनी टाळ्या वाजवता वाजवता, एकदम दोन्ही हात उंचावले, आणि ब्लॉकचा दरवाजा बंद करून आतमध्ये गेल्या. आता मात्र माझी प्रचंड चिडचिड झाली, मी शक्य तितक्या जोरात ओरडून, सगळ्यांचा उद्धार करीत होते. शाळेमध्ये शिस्त म्हणून मी अजिबात ओरडू शकत नव्हते. त्याचा सगळं कसूर मी इथे भरून काढत होते. पण जणू काही घडतच नाहीये, अश्या अविर्भावात सगळे सभासद आपापल्या ब्लॉकमध्ये, ब्लॉक झाले होते. तिकडे उकळलेला चहा पूर्ण आटून गेला, आणि इकडे माझा आवाज, ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे च्या ट्यूनमध्ये.

दुसऱ्या दिवशी शनिवार, म्हणजे शाळेला अर्धा दिवस सुट्टी. त्यातल्या त्यात सोसायटीचे बरेच सभासद जाग्यावरच सापडणार होते. त्यामुळे त्या सगळ्यांना अगदी धारेवरच धरायचे, याच विचारात मी रात्रभर झोपूच शकले नाही. संपूर्ण रात्रभर, ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे ची ट्यून एकसारखी माझ्या कानात वाजत होती. एक दोन वेळा मी मध्यरात्री उठून, लिफ्टचा दरवाजा कोणी उघडा ठेवलाय कि काय..? हे पाहून पण आले. शाळेत इतकी कठोर शिस्तीने वावरणारी मी, इथे मात्र माझी अगदीच शेळी झाली होती. पण काहीही झाले तरी उद्या, दामले आजींचा निकाल लावायचा म्हणजे लावायचाच असा चंग मनाशी बांधला.
दिवसभराच्या दगदगीमुळे जरा डोळा लागला आणि काही वेळाने पुनश्च, ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे ची ट्यून. दरवाजा उघडा ठेवणाऱ्याची आता काही खैर नाही. या जोशमध्ये मी डोळे उघडले तर सगळीकडे धूरच धूर, अरे बापरे चहाचे भांडे अजून गैस वर चुकून राहिले कि काय...? अशी शंका मनामध्ये आली. पण हे प्रकरण जरा वेगळेच होते. ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे ची ट्यून अजूनही वाजतच होती. मग तर डोके सटकलेच, जोरात किंचाळून ओरडलेच. अरे...त्या लिफ्टच्या दरवाज्याचे थोबाड कोणी तरी बंद करा रे. वैताग आलाय त्या ट्यूनचा...एकसारखी वाजतीये मघापासून... दरवाजा तर बंद नाहीच झाला पण प्रत्युतरादाखल काही सफेद वस्त्र परिधान केलेली, मधाळ हास्य चेहऱ्यावर घेवून फिरणारी, डोक्यावर कसल्याश्या टोप्या कि मुकुट घातलेली, इकडून तिकडे फिरणारी माणसं, मला तोंडावर बोट ठेवून, शूउउउउ, असं म्हणत फिरत होती. डोकं एकदम कामातूनच गेलं. चार दिवसांवर गणपती आलेत, आणि दरवर्षीप्रमाणे सोसायटीची मंडळी कसली तरी नाटिका सादर करणार आहेत. अरे पण मग इतक्या पहाटे, हि काय वेळ आहे का, तालीम करायची. पण एकही थोबाड ओळखीचे दिसत नव्हते. तसेही, सोसायटीची मोजकीच मंडळी चेहऱ्याने ओळखीची होती. पण त्यापैकी इथे कोणीही दिसत नव्हते. डोकं आणखीनच दुखायला लागलं आणि त्यात भर म्हणजे, ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे ची ट्यून चालूच.

मी (एकाच्या हाताला पकडून, त्याला म्हंटल,) - अरे कोणाला तरी सांग रे...हि ट्यून बंद करायला...

तो – “ हे नाम अखंड चालूच असते...ते बंद करू शकत नाही...”

मी – “ अरे...कसं काय बंद नाही करू शकत....दरवाज्याचे थोबाड व्यवस्थित लावले कि होईल ते बंद...पण मला त्या दरवाज्याचे थोबाड इथे कुठेच दिसत नाहीये...”

तो – “ इथल्या पुण्याभूमीवर असले अपशब्द वापरणे पाप आहे “

मी – “पाप...अरे माझ्या झोपेचे खोबरे झाले....त्याचे काहीच नाही....म्हणे पुणे भूमी...”

तो – “पुणे भूमी नाही... पुण्याभूमी आहे ही....स्वर्ग म्हणतात याला...”

मी – “ स्वर्ग....अरे बाजीराव रोडची कल्पवृक्ष सोसायटी हि....माझ्यासाठी तर नरकच....म्हणे स्वर्ग....”
इतक्यात थोड्या उंचावर, खुर्चीवर बसलेला एकजण, खुर्ची कसली तर लग्नात असते ना तसली. तर  खुर्चीवरून बसून म्हणाला, “कोण गोंधळ घालतोय रे तिकडे...?”

मी – “ गोंधळ मी नाही याने घातलाय....ती ट्यून तेवढी बंद कर म्हणाले तर, मला म्हणतोय, इथे अपशब्द वापरायचे नाहीत...”

खुर्चीवाला – “अगदी सत्य आहे...स्वर्गामध्ये अपशब्द वर्ज्य आहेत....”

मी – “आता बासचं हा...तो म्हणे स्वर्ग, तू म्हणतोय स्वर्ग.....मला झोपेत चालायची अजिबातच सवय नाहीये...आणि एखाद्याला जरी असली तरी, पाचव्या मजल्यावरून लिफ्टमधून खाली येवून, एखाद्या दुसऱ्या सोसायटीमध्ये जाणे शक्य आहे का...? आपलं उगीचच काहीही....”

खुर्चीवाला – “बहुतेक तुला अजून समजलं नाहीये....हे स्वर्ग आहे...देवलोक...”

मी – “काय्य्य....? देवलोक....म्हणजे तुम्ही मला पृथ्वीवरून.....इथे.....स्वर्गात...”

खुर्चीवाला – “ आता तुला समजलं....तुझा पृथ्वीवरचा कार्यकाळ संपलेला आहे आणि म्हणून तू स्वर्गामध्ये आलेली आहेस...?

मी – “काय.... वेडबीड लागलं नाहीये ना....हि कसली पद्धत, ना काही अलर्ट, ना मेसेज, ना कसली नोटीस, विदाऊट नोटीस इथे तुम्ही मला आणलेच कसे....? मी कोर्टात खेचेन तुम्हाला.....माझी एकदा देखील परवानगी घेतली नाही....आणि मी असं काय पाप केलंय.....दामले आजीना ओरडून बोलले म्हणून डायरेक्ट स्वर्ग.....असला नोन्सेंसपणा मी अजिबात खवपून घेणार नाहीये...समजलं.... ”

खुर्चीवाला – “ऑफिसमधला शिपाई नाही.....अरे देव आहे मी...देव”

मी – “देव असताल, पण ते तुमच्या घरी....आमच्या घरीपण आहेत ना देव....”

खुर्चीवाला – “अरे....माझाच अवतार आहेत ते...”

मी – “ मग तुमच्यापेक्षा ते बरे....गप गुमान देव्हाऱ्यात बसलेले असतात....रोज सकाळी आई त्यांना अंघोळ घालते....टिळा लावते.... मग छान वासाची उदबत्ती ओवाळून त्यांच्या बाजूलाच लावते....मग दोघांच्या मध्ये मिळून एक, असे फूल वाहते....आणि त्या उपर, सगळ्या देवांसाठी, चिमुटभर साखर नैवद्य म्हणून ठेवते....बिचारे घेतात, दोन-चार दाणे आपापसात वाटून....हू नाही कि चू नाही.....आणि तुम्ही म्हणे देव...देव असे असतात का, पोलीस देखील एखादया स्त्रीला असं अपरात्री तिच्याच घरातून, तिची परवानगी न घेता...पोलीस चौकीमध्ये नेत नाहीत....आणि तुम्ही तर डायरेक्ट स्वर्गात घेवून आलात.....तुमच्यापेक्षा आमच्या देव्हाऱ्यातले देवच बरे....”

खुर्चीवाला – “अरे चित्रगुप्त, कोणाला आणलंय तुम्ही....आणि कोठून....”

चित्रगुप्त कि काय ते – “देवा....हि पुणे शहरातील, बाजीराव रोड इथे, कल्पवृक्ष सोसायटीमध्ये, ब्लॉक नंबर २०३ राहणारी, ७२ वर्षीय इंदुमती आहे.”

मी – “ शी...७२ वर्षीय....आणि मी....वेडबिड लागलंय कि काय तुम्हाला....”

चित्रगुप्त कि काय ते – “देवा...हिला...बाकीचे मुद्दे महत्वाचे वाटत नाही...पण ७२ वय म्हंटला कि, लगेच...ई ई ई ई....सुरु झाले आहे...या स्त्रियांचे खरं तर जरा अवघडच आहे.....”

मी – “अवघड माझे नाही आता तुमचे होणार आहे....एकतर मी इंदुमती नाही तर इंदिरा आहे....दुसरे म्हणजे मी जरी कल्पवृक्ष सोसायटीमध्ये राहणारी असले तरी, माझा ब्लॉक नंबर २०३ नाही तर २०२ आहे.... आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, माझे वय ७२ नव्हे तर २७ आहे....”

खुर्चीवाला – “चित्रगुप्त...हि काय म्हणतीये.....तुम्ही तुमची नोंदवही व्यवस्थित पाहून घ्या....”

चित्रगुप्त कि काय ते – “देवा....नक्कीच काहीतरी मोठा घोळ झालेला दिसतोय...म्हणजे पृथ्वीसारखाच कारकुनी प्रकार इथे घडलेला दिसतोय.....माझ्या हाताखालील एखाद्या कनिष्ठ कारकुनाने आकडेवारीमध्ये चुकीची नोंद केली....पुढचे मागे आणि मागचे पुढे असं काहीसं झालंय बहुतेक.....आणि मी देखील विश्वास ठेवून, न वाचताच, सरळ सही ठोकून दिली....”

खुर्चीवाला – “मोठ्ठा... खूपच मोठ्ठा गोंधळ करून ठेवलाय तुम्ही....ताबडतोब तुमची नोंदवही बारकाईने पाहून घ्या बरं....”       

मी – “ पाहून वगैरे ते काय आहे ते तुमचं तुम्ही नंतर घ्या....आधी मला माझ्या घरी पाठवा....एकतर माझी आई काळजीत असेल....दिवसा न सांगता जाणारी कार्टी, अशी अचानक पहाटे कुठे गेली....आणि दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे....माझा स्कूल टायमिंग....सकाळचा शार्प... शार्प ७ वाजताचा आहे...मला अर्धा सेकंद जरी इकडचा तिकडे झाला तरी अजिबात चालत नाही...तेव्हा तुम्ही मला आत्ताच्या आत्त्ता लगेचच घरी पाठवा...समजलं”

खुर्चीवाला – “चित्रगुप्त, तुम्हाला हजारदा बजावून झालंय...पुण्यामधून आणि त्यातल्या त्यात पेठांमधून कोणाला जर उचलायचे असेल तर ते फक्त आणि फक्त सत्तरी ओलांडलेल्यानाच....कारण एकतर त्यांची भांडण्याची ताकद कमी झालेली असते....त्यामुळे ते अजिबात वादविवादात पडत नाहीत....आणि त्यामुळे आपल्या प्रोसिजरला अजिबातच वेळ लागत नाही....”

चित्रगुप्त कि काय ते – “ देवा, माफी असावी....”

मी – “ ओ....चित्रगुप्त कि काय ते....माफी त्यांची काय मागता...माफी माझी मागायची...समजलं...एकतर माझ्या परवानगीशिवाय तुम्ही मला इथे आणलंय...आणि त्यातल्या त्यात, त्या दामले आजींना आणायचं सोडून भलत्यालाच आणलंय...तेव्हा माफी माझी मागायची....इतकं पण समजत नाहीये तुम्हाला.....कसे काय स्वतःला देव म्हणवता तुम्ही....अवघड आहे बाबा तुमचं...”

खुर्चीवाला – “ अरे किती बोलते हि बाई....”

मी (किंचाळून) – “बाईई...ईईईई.....बाई म्हणता मला....इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिकवते मी....मिस, मैडम वगैरे असं काही म्हणायचे सोडून....बाईई....शी...”
एवढं ऐकल्यावर खुर्चीवाल्याने, साष्टांग दंडवतच घातला, म्हणाला, “चूक झाली हो....पुन्हा अशी चूक  कध्धीच नाही होणार....माफ करा....आणि तुमच्या इतकं वादविवादाचं प्रचंड बळ....आम्हाला देखील मिळू दया....”

मी – “खरंतर...अजिबातच वेळ नाहीये.....मला स्कूलला जायला उशीर होतोय....तरीपण...तथास्तु..”


- सुरेश तु. सायकर
985060-1353 / 955257-1353

Tuesday, 2 August 2016

पाऊस आणि रोमांटिक...

पाऊस आणि रोमांटिक अनुभव याचा दूरान्वये सबंध नाही असं म्हणणारा सजीव या पृथ्वीतलावर क्वचितच आढळेल. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणती ना कोणती घटना पावसासंबंधीत घडलेली असतेच. काही जणांसाठी आनंददायी, सुखदायक असते तर काही जणांसाठी त्रासदायक.
आनंददायी, सुखदायक यासाठी कि , ज्याच्यासोबत, ज्याच्यासाठी हा पाऊस अनुभवलेला असतो तो तुमच्या सोबत अजूनही कायम असतो. तुम्हाला जेव्हा एखादी व्यक्ती आवडायला लागते. तेव्हा त्याच्या चांगल्या वाईट वर्तवणुकीचा विचार अजिबात न करता आपण त्याच्या प्रेमात पडतो. मग हळूहळू त्याच्या मध्ये इतके गुंतत जातो कि, त्याच्या वाईट गोष्टी आपोआप नजरेआड होतात. कधीतरी जेव्हा आपण नकळत दुखावले जातो तेव्हा ती ठसठसणारी जखम वेळेच धुवून टाकणे महत्वाचे. कारण एकमेकांमध्ये असणाऱ्या वाईट गोष्टी योग्यवेळी वाहून जाणे म्हणजे एकमेकांसोबत जास्त काळ व्यतीत करणे. त्या धुवून जातात, जेव्हा तुम्हाला आवडणारा पाऊस त्याला किंवा तिला देखील आवडत असतो. मग अशातच पावसाची पहिली सर येते, अन दोघांच्या डोळ्यात पालवी फुटते. दुरावलेल्या, दुखावलेल्या मनांना हलकीच फुंकर घालते. दोघांच्या मनात त्याला अनुभवण्याची ओढ निर्माण होते. पण तो अनुभवण्यासाठी गरज असते सोबतीची. तो अनुभव आणखीन द्विगुणीत होतो जेव्हा आपल्या सोबत असते आपल्याच पहिल्या प्रेमाची. बाल्कनीतून बाहेर कोसळणारा पाऊस पाहून आठवतो, तो तिला फक्त पाहण्यासाठीचा अट्टाहास. कारण प्रेम व्यक्त करण्याआधी बऱ्याचदा आपण तिच्या कळत किंवा नकळत फक्त तिला पाहण्यासाठी धडपड करत असतो. कधी तिच्या क्लास बाहेर, कधी तिच्या नेहमीच्या येण्या-जाण्याच्या रस्त्यावर, कधी तीच्या घराबाहेर तर कधी अगदी भाजीमंडई पर्यन्त. अश्यावेळी तिथपर्यंत पोहचण्याची धडपड जरी आठवली तरी आत्ता ती किंवा तो सोबत असल्याची किंमत आपल्याला सहज कळेल. त्या धो-धो कोसळणाऱ्या पावसात अनेकदा चालत, कधीकधी धावपळत कधीतरी मित्राच्या सायकलवर फक्त तिला पाहण्यासाठी केलेली मरमर जर आठवली तर आपल्याला स्वतःचेच हसू येईल. तिने जेव्हा पहिल्यांदा प्रेमाला होकार दिला तेव्हा साक्षीला फक्त हाच पाऊस होता, धो-धो कोसळणारा. पण तो तेव्हा किती रोमांटिक वाटला, इतके दिवस त्याच्या वेडसर कोसळण्याने तिची एक छबी पाहू शकत नव्हतो म्हणून किती कोसले होते. आणि जेव्हा तिने पहिल्यांदा आपल्याला होकार दिला. तेव्हा साक्षीला फक्त हाच होता. म्हणजे नक्कीच कोणते तरी अतूट नाते याच्यासोबत असणार. मग जेव्हा जेव्हा हा कोसळायला लागतो तेव्हा तेव्हा आठवण येते त्या सुगंधित क्षणांची. पहिला पाऊस पडल्यावर मातीचा जो सुगंध येतो तो त्या मातीचा नसून त्या प्रेमाच्या पहिल्या अंकुरापासून फुललेल्या फुलांचा असतो. तो फक्त जरी आठवला....तर आयुष्य सुसह्य.
त्रासदायक यासाठी कि, ज्याच्यासोबत, ज्याच्यासाठी हा पाऊस अनुभवलेला असतो तो किंवा ती आज आपल्या सोबत नसते. जेव्हा हाच पाऊस नकोसा वाटायला लागतो तेव्हा समजायचे कि, आपल्या नात्याची सुरुवात होताना असलेला साक्षीदार आता तिच्या किंवा त्याच्या दृष्टीने फितूर झालाय. अशातच काहींनी मध्येच साथ सोडलेली असते तर काहींची सुटलेली असते....आयुष्याच्या शेवटाला.....वयोपरत्वे.
-सुरेश तु. सायकर