Thursday, 3 October 2013

चित्रपट : ऱ्हास आणि श्वास

जुन्या काळातील चित्रपटांमध्ये सर्वसामान्य माणसाला केंद्रित ठेवून चित्रपटांची निर्मिती केली जायची. ज्यामध्ये नायक  अगदी गरीब घरातील, ज्याला रोजच्या जगण्यासाठी कष्ट पडावे अशी 
परिस्थिती परंतु त्यातून काही अदभुत आणि  नाट्यमय वळणं घेत त्याच्या आयुष्यात चांगले दिवस यायचे. चारचाकी गाड्यांमधून फिरणाऱ्या श्रीमंत घरातील मुली सोबत त्याचे प्रेमप्रकरण व्हायचे त्यातून समाजाशी आणि तिच्या श्रीमंत बापाशी लढून शेवटी गरीब घरातील नायकाचा विजय व्हायचा. जशी आजही गरिबी आहे तशीच ती तेव्हाही होती. पण चित्रपटांच्या एका फुंकरने सर्वसामान्य प्रेक्षकांच्या आयुष्यात नेहमीच तजेला यायचा, आपल्यादेखील आयुष्यात सोनेरी सकाळ उगवेल याच आशेमध्ये प्रत्येकजण जगायचा. येणाऱ्या संकटाना धीरपणे चित्रपटातील नायकासारखे तोंड देण्याची ताकद खरी तर चित्रपटांमुळेच यायची. यातून अनेकांच्या जीवनात खरंच रंग भरले, चुकीच्या मार्गाने गेल्यास परिणीती काय होते याची जाणीव देखील चित्रपटांमधून दिसत असल्याने कोणीही तो मार्ग पत्करायला धजावयाचे नाही. आपल्यादेखील आयुष्यात कोणीतरी येईल आणि तीच्यावर आपण देखील नायकाप्रमाणे भरभरून प्रेम करू अशी चित्र रंगवली जायची. यामध्ये कोणत्याही  किळसवाणा वाटावा असा प्रकार जात दाखवला नव्हता. शारिरीक सुखाऐवजी फक्त प्रेम या संकल्पनेवरच संपूर्ण जीवन न्योझावर केलं जायचं.

काळ बदलला, तसे चित्रपटांचे स्वरूप देखील बदलून गेले. आता सर्वसामान्य प्रेक्षकांना समोर ठेवून कोणत्याच चित्रपटांची निर्मिती केली जात नाही.जिथे फक्त एका गाण्यासाठी विदेशी लोकेशनवर चित्रीकरण केले जात आहे तिथे सर्वसामान्याच काय तर एखादा उच्च मध्यमवर्गीय सुद्धा येत नाही. सध्या चित्रपटांची निर्मिती फक्त आणि फक्त पैसा याच एका संकल्पनेवर आधारित होती. पूर्वीसुद्धा ती होती, मान्यच आहे, मात्र  मुल्यांची आणि संस्काराची कास  न सोडता. आताशा काहीसे विकृतीकडे झुकणाऱ्या चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. नितीमूल्यांचा ऱ्हास सर्रास होताना दिसत असून त्याकडे कानाडोळा आपण करूच शकत नाही. कारण तुम्ही कितीही नाही म्हंटला तरीही त्याचा थेट संबंध जरी तुमच्या सोबत  नाही आला तरी तो तुमच्या घरच्या एखाद्या सदस्याशी तरी नक्कीच येतो. मग अश्यावेळेस माझं  नाही ना काही वाकडं होत  अशी पुळचट भूमिका घेणे शक्य तरी आहे का?

 मल्हार...

No comments:

Post a Comment