Wednesday, 5 November 2014

पतंग....

तसं लहानपणापासूनच आकर्षण होतं आणि वेडही,
मोकळ्या निरभ्र आकाशाचं,
कितीही तास एकटक पाहत बसलो तरीही ओढ काही कमी होत नव्हती,
अशातच एक पतंग दिसला, मस्त गिरक्या घेत फिरणारा,
मांज्याची ढील देत उंच उंच आकाशात उडणारा....

बस्स..पतंग व्हयाच ठरवलं, आकाशात मनसोक्त उडायचं,
उंच उंच जायचं आणि उंचावरून इतरांना आपलं वेगळपण दाखवायचं,
ढगांना टिचक्या मारून गरज तिथे पाऊस पाडायचा,
लाही लाही होणाऱ्या जीवांसाठी ढगांना एकत्र करून सावलीचा आसरा दयायचा,
मस्त धुंदीत होतो, एवढ्यात एक दुसरा पतंग सोबत आला,
मित्र वाटला, गोडीगुलाबीने तो जवळ आला आणि क्षणात...
त्याच्या धारदार काच मिश्रित मांज्याने माझ्या मांज्याला काट मारला,
मी हेलपडत हवेत वेड्यावाकड्या गिरक्या घेत होतो, आसारी पासून आसरा तुटला होता,
आता सोबत होती ती फक्त हवेची आणि सोबत बांधलेल्या कन्नीतल्या उरलेल्या मांज्याची,
वाटलं आता योग्य हातात विसावेल, पुन्हा नव्याने आकाशात उंच उडण्यासाठी पण......

मांजा एका इमारतीच्या अडगळीच्या पाईप मध्ये अडकला आणि मी त्याच्या सोबत,
भिंतीला घासून आणि आपटून दोन्ही बाजूला भोकं पडलेल्या अवस्थेत मी अधांतरी,
निष्प्रभ आणि निष्क्रिय.....

गळून गेलेल्या नजरेने एकवार वरती पाहिलं, आकाश तेच होतं, निरभ्र आणि शांत,
पण तिथे उडणारा पतंग आता दुसराच होता.....

-सुरेश सायकर   

 

No comments:

Post a Comment