Tuesday 19 November 2013

!!! निर्व्याज जगण्याचा प्रवास !!!

अनेकदा माणसं वेड्यासारखी धावतच राहतात, यंत्रवत. कशाचेच भान राहत नाही इतकेच काय तर यंत्र बनवता बनवता स्वतःला कधी यंत्रामध्ये बदलून टाकले याचे देखील भान राहत नाही. रात्री झोपण्याआधी उद्याचीच चिंता मग येणारी झोप देखील पाठ दाखवून मस्तपैकी थंड हवेत, चांदण्यांच्या उजेडात निवांत फिरायला बाहेर पडते. चालू वर्तमानकाळ काय असतो अनेकदा विसरूनच जातात, आस आणि ओढ असतेती फक्त भविष्यकाळाची, जीच्या पोटात दडलेले असते ऐषोआरामात जगण्याचे स्वप्न. आजचेच भान नसल्यावर भविष्यतरी कसे काय उज्वल असणार याचे सोप्पे गणित देखील कोणी सोडवायला तयार नसतात. कारण जवळचे पहायचे सोडून लांबचं दिसणारा चष्मा डोळ्यावर चढवलेला असतो.      
       
मग अशातच कधीतरी जोरात धावत असताना धडपडतात, ठेच लागते आणि मग भानावर येतात. क्षणभर काहीच समजत नसल्यामुळे कोमात गेल्यासारखे वाटतात. कारण सर्व काहीच थांबून जाते रोजचे धावणे, वेळेत पोहचण्याचा अट्टाहास,भुकेचे भान नसणे, भुकेल्या पोटी गोड गरम पाण्याचे  विष पोटात एकसारखे ढकलत राहणे, हे काहीच उरत नाही. उरतो तो फक्त न जाणारा वेळ. मनगटात असून देखील कधी वेळ पाहण्याचे भान नसलेल्यांना एकसारखे मनगटावरचे, भिंतीवरचे, मोबाईलवरचे,लेप्टोपवरचे घड्याळ दर सेकंदालाआहे तिथेच असल्यासारखे दिसते. मग यातून निर्माण होते ती फक्त चिडचिड. जी स्वतःला आणखीनच आतमधून पोखरत जाते. अश्यावेळी आपण कोण? काय आपले इप्सित? आत्तापर्यंत शेवटचे मनापासून कधी हसलोय आणि कधी मनापासून एखादा क्षण जगलोय? हे स्वतःला विचारण्याचे भान देखील राहत नाही. अशातच एखाद्याला त्याची जाणीव होते, थोडासा स्वतःला आपणच आहोत याची खात्री देण्यासाठी आरश्यामध्ये न्ह्याळतो, स्वतः असल्याची खात्री पटते कारण नेहमी आरश्यासमोर पावडर लावलेला चेहरा असतो आणि आजचा जाणीव झाल्यानंतरचा. खरं तर चेहऱ्यामध्ये काहीच फरक झालेला नसतो,फरक झालेला असतो तो पाहण्याच्या दृष्टीकोनात.

आणि सुरु होतो खरा जगण्याचाप्रवास, ज्याच्यासाठी आपला जन्म झालेला असतो, ज्यासाठी मानवी शरीर आपल्याला बहाल झालेलं असत ते खरं माणूसपणाचे आणि माणुसकीचे जगणं. खोटे जगण्याचे, आणि जगणाऱ्यांचे चेहरे आणि मुखवटे लगेच समजून यायला लागतात. कारण मुळातच एकूण पाहण्याच्या दृष्टीकोनात बदल झालेला असतो. मग रस्त्यावर एखाद्या नडलेल्या मदत होते, एखाद्या जुन्या फक्त चेहेरा ओळखीचाअसलेल्या माणसाला रस्त्यावरून जाताना मुद्दामून भेटले जाते आणि आस्थेने चौकशी केली जाते भलेही तो आपल्यापेक्षा कमी शिकलेला किवां कमी दर्जाची नोकरी करणारा असला तरीही, अशातच फक्त लांबचे दिसणाऱ्या चष्माची फ्रेम कधी गळून पडते आणि जवळची आपली माणसं कधी दिसू लागतात हे देखील समजत नाही. आणि मग त्यानंतर उरतो तो फक्त निर्व्याज जगण्याचा प्रवास.  

- सुरेश सायकर