Saturday 25 October 2014

नवनिर्माण.....

सध्या स्वारगेटच्या चौकातून जायचे म्हंटल्यावर एकतर तुमच्याकडे उच्च प्रतीची सहनशीलता हवी नाही तर वेडीवाकडी वळणे घेत माणूस नावाच्या प्राण्याच्या अखंड पिढीचा उद्धार करीत तोंडाचा दांडपट्टा चालवत गाडी चालवण्याचे कसब.

उड्डाणपूल बांधण्याचे काम चालू असल्यामुळे हा सगळा त्रास सहन करावा लागतोय म्हंटल्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया म्हणजे, कशाला पाहिजे उड्डाणपूल वगैरे, आधी दिवे नीट लावा आता प्रतिक्रियेतून शोधणे अवघड आहे की, नक्की दिवे कोणते, रस्त्यावरचे कि उड्डाणपूल बांधण्याचा घाट घातलेल्याचे.असो.

मी हि असाच प्रचंड सहनशीलतेचा माणूस (उद्धार करणाऱ्यातला नाही (तसा...आधी होतो.....पण...असो.) रात्री उशिरा घरी परतण्याच्या वेधाने गाडीवरून जात होतो. तर काही कामगार उड्डाण पुलाच्या खांबाचे बांधकाम करण्यासाठी लागणाऱ्या मोठ्या लांबलचक सळया खांदयावर वाहून नेत होते आणि खांबाच्या गोल स्ट्रक्चरवर त्या सळया उभ्या करीत होते आणि तेही एकट्याने. गाडी थांबवली, पाहिलं तर त्यातला कोणीही हिंदकेसरीच्या मापाचा वाटत नव्हता अगदीच म्हणजे अगदीच किरकोळ शरीरयष्टी. तरीही न थकता काम चालले होते. त्यांना माहित नव्हते कि ते काय निर्माण करतायेत, त्यांना फक्त त्यांची रोजीरोटी चालू आहे याचेच समाधान. त्यांच्या पैकी कोणीही मराठी किवां अगदीच हिंदी बोलणारा नव्हता बहुतेक बंगालमधील असावेत. रापलेले चेहेरे, डोळ्यावर झापड येवू नये म्हणून तोंडात काहीतर चघळत काम करणारे, एखाद दूसरा अचानक मध्ये येवून समोरच्याची तारांबळ करून हसणारा आणि तारांबळ उडालेला पण त्याच्या हास्यात सामील होणारा. बाजूच्या चहाच्या टपरी मध्ये बसून काहीजण चहा सोबत क्रीमरोल खात होते बहुतेक जेवण करीत असावेत. पानाच्या टपरी मधून काहीजण विड्या ओढत पुन्हा ताजेतवाने होवून कामावर परतत होते. एकमेकांच्या खेचाखेचीत, एकमेकांना टाळ्या देत कामाचा उत्साह पहाटे पर्यंत कायम राहावा म्हणून प्रयत्न करीत होते.

हे काम पूर्ण होईल...सहा महिने, एक वर्ष किवां त्याहून जास्त काळात, मग हेच कामगार पुढच्या कोणत्यातरी मोठ्या कामासाठी जातील थोडक्यात एक नवनिर्माण करून आणखीन एक नवनिर्माण करण्यासाठी (आमच्या पण नावात आहे की.....नवनिर्माण...आं...मग.....असो.).

मग त्यापुढचा एक नयनरम्य, डोळ्याची पारणे फिटेल असा दैदीप्मय सोहळा (थोडक्यात तमाशा)...उदघाटनाचा.

उड्डाणपुलासाठी पाठपुरावा करणारे उदघाटनाचा मान मिळवण्याचा प्रयत्न करतील आणि समजा नवीन सरकार आलेच तर शासकीय नियमाप्रमाणे मुख्यमंत्री. मग एकाच उड्डाणपुलाचे उदघाटन दोनदा होईल, एक लक्ष्मीनारायणच्या टोकाकडून आणि दुसरे स्वारगेट चौकाच्या दुसऱ्या टोकाकडून. हि गंमत (तमाशा) तर नंतर अनुभवायला मिळेलच, पण त्याआधी ज्या उदघाटनासाठी हा तमाशा होईल त्याचा पाया रचणाऱ्या कष्टकऱ्यांच्या पाठीवर थाप मारायची संधी मिळाली तर नक्कीच सोडू नका. खूपच घाईत असाल तर थोडा वेळ काढा काही क्षणासाठी थांबा (फक्त प्रचंड सहनशीलता असलेल्या लोकांनी) त्यांना जवळून पहा आणि जमल्यास चांगले काम करतायेत म्हणून एखादे छानसे स्माईल द्या.

विशेष सूचना सहनशील लोकांनी थांबा यासाठी म्हंटल कारण, एवढं करीत असताना पाठीमागून आपल्या पिढीचा उद्धार ऐकू आल्यास आम्ही जबाबदार नाही.असो.


-सुरेश सायकर