Tuesday 26 June 2018

जान तेरे नाम....

कॉलेजला जायला लागल्यावर, नाही म्हंटलं तरी वेगळीच नशा चढते. एकतर पूर्ण वेळ शाळेमधून सुटका होऊन काही तासांच्या कॉलेजरूपी एका  वेगळ्याच जगात तुमचे आगमन झालेले असते. मग अश्यावेळी बराच वेळ हाताशी असतो. मग तो सत्कारणी लावायचा की, घरच्यांच्या स्वप्नांना हरताळ फासायचा, हे ज्याच्या त्याच्या हातात असते. त्यातल्यात त्यात जर तुम्हाला व्यसन असेल तर मग विचारूच नका. मग ते आणखीनच उफाळून येते. काही व्यसनं चांगली असतात, पैकी मला लागलेलं कमी पैश्यात भागवता येणारे व्यसन म्हणजे वाचन आणि चित्रपट.

पण "खिशात चिल्लर आणि स्वारी समजतीये स्वतःला उद्योगपती भुल्लर," अशी अवस्था. पण त्यालाही पर्याय होता, मॉर्निंग शोज, आणि परवडणारे थिएटर म्हणजे, विजय टॉकीज, डेक्कन टॉकीज, अलका टॉकीज. अशातच एकदा डेक्कन टॉकीजला कॉलेज लाईफवर एक चांगला रोमँटिक 'पिच्चर' लागलाय, असं मित्राकडून समजलं (ज्याला मैत्रीण होती आणि त्याने तिच्यासोबत पिक्चर (त्याच्या भाषेत 'पिच्चर' ) पाहिलेला होता ....एकदा नव्हे... दोनदा नव्हे...तीन वेळेला....असो.). मग चिल्लरची जमवाजमव झाली आणि स्वारी (अर्थात एकटाच...स्वतःचेच पैसे जमवता-जमवता नाकी ९ यायचे) दुसऱ्याच दिवशी सरळ मॉर्निंग शो साठी डेक्कन टॉकीजवर. साधारण ९ किंवा १० रुपये तिकीट असावे (मॉर्निंग शो ला रेट कमी आणि आमची उडी फक्त स्टॉल पर्यंतच...पडद्याच्या अगदी समोर.... पुन्हा असो).

बाहेर पोस्टर पहिले, हिरो अनोळखी, हिरॉईन अनोळखी आणि पिक्चरचे नाव होते "जान तेरे नाम". डेक्कन टॉकीजला पार्किंगसाठी जागा मोठी होती. तिथे जास्त सायकली आणि अगदी बोटावर मोजाव्यात एवढ्या दुचाकी असायच्या. चारचाकी एखाद दुसरी असायची ती देखील जर फॅमिली साठी एखादा चांगला पिक्चर लागलेला असेल तर. लोखंडी गेट मधून आत प्रवेश केला कि, आवारातून जाताना डाव्या बाजूला सायकल स्टॅन्ड, जर पिक्चर हाउसफुल असेल तर उजव्या बाजूने पाठीमागे सायकली लावायला जागा असायची. डाव्या बाजूला तिकीट खिडकी, आणि तिच्या समोर एक आडवा, कमरेच्या थोडा वर असलेला लोखंडी बार. जेणेकरून कितीही गर्दी असली तरी तिकीट खिडकीपाशी पब्लिक लाइनीमध्येच येऊ शकेल. स्टॉलचे तिकिट, म्हणजे वेगळा रंग बऱ्याचदा पांढरा असायचा (तिकिटाचे दर आधीच कमी असल्याने, लो कॉस्ट), ड्रेस सर्कल अन बाल्कनीच्या तिकिटांचा रंग वेगवेगळा. साधारणपणे, पहिल्या ४ ते ५ रांगा स्टॉलसाठी असायच्या. गर्दी असेल तर तिकिटावर दिलेल्या नंबरच्या, पहिल्या, दुसऱ्या सीट वरच बसावं लागायचं पण जर गर्दी कमी असेल तर मग मज्जा, ४थ्या किंवा ५व्या सीट वर आरामात सरकायचे. जर गर्दीच नसेल तर मग हळूच, स्टॉल ओलांडून अप्पर कडे सरकायचे. असो.

पिक्चर कॉलेज लाईफवर आधारित, त्यातल्या त्यात लव्ह स्टोरी आणि कळस म्हणजे गुणगुणावी वाटावीत अशी ९०ची मस्त गाणी. त्यात अस्मादिक, कॉलेजकुमार, मग रिलेट व्हायला किती वेळ लागतोय. स्टोरी म्हणजे आधी भांडणं, मग प्रेम, बाप व्हिलन, मग दुरावा, मग दोघांची  ताटातूट आणि हिरो सरळ हिरोईनच्या घरी, "तेरेसे मॅरेज करनेको मैं बम्बई से गोवा आया....पर मेरे को तेरे डॅडने रेड सिग्नल दिखलाया....फादर से क्या मुझे लेना तेरे, मैं चाहू तुझको तू चाहे मुझे....ये अक्ख्खा इंडिया जानता हैं, हम तुम पे मरता हैं...दिल क्या चीज हैं जानम अपनी जान तेरे नाम करता हैं..." (गुगल्ड नाही केलं....बरीचशी गाणी अजून तोंडपाठ आहेत... असो.) पिक्चरची पूर्ण स्टोरी इथे देणार नाहीये...तेव्हा मस्त पावसामध्ये...गरमागरम भजी खात, घरीच ऑनलाईन जर पाहिलात, तर नक्कीच आवडेल, याची गॅरंटी देतो.  नेहमीप्रमाणे पिक्चरचा शेवट...गोड.

बास्स....ना यार....अजून काय पायजे.....पब्लिक, म्हणजे आम्हीच...जाम खुश. आता नक्की आकडा  लक्षात नाही पण पिक्चर बऱ्याच वेळा पहिला. करियर, स्ट्रगल या गोष्टी जश्या समजायला लागल्या आणि नंतरच्या काळात रोनित रॉयला मिळालेल्या कमी संधी पाहता, एका गोष्टीचं खूप वाईट वाटलं, फिल्म इंडस्ट्रीमध्ये फक्त चांगला अभिनेता असणं, चांगला लूक असणं, फक्त एवढंच महत्वाचं नाहीये....... लक मंगताय ना भाय....


- सुरेश तु. सायकर   

Saturday 23 June 2018

शब्द...

शब्दांत मांडलेले,
शब्दांत गुंतलेले,
शब्दांचा भासे जणू हा खेळ नवा
मांडलेले, गुंतलेले
शब्द शोधिती खाणाखुणा....


शब्द, मित्र कधी
तर कधी शत्रू भासतो,
शब्दांची मोहमाया
अलंकारीत भंडारा उधळून
सहज फसवतो....





शब्दांत व्यक्त होणे
शब्दांत गुज करणे
शब्दांचा तर हा खेळ जुना
पाहुनी दुःख
शोधिती व्यक्त होण्या
शब्द, शब्दांची आर्त भावना.....


- सुरेश सायकर    
    

Thursday 21 June 2018

नात्यांच कपाट...

कपाट भरलेलं होतं पूर्ण
उपयोगी, निरुपयोगी
सगळंच अस्ताव्यस्त
पसरलेलं
माझ्यासारखंच.....


शेवटी मनाचा हिय्या केला
एके दिवशी उघडलंच
प्रत्येक कप्पा
आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्या
सोबत जोडलेला होता...
काही जोडलेल्या होत्या
गोड आठवणी
तर काही न आठवाव्यात अश्या,
काहींना येत होता वास
नव्याचा
तर काहींना जुन्याचा......

एका क्षणी
सगळेच असावेत असं वाटू लागलं
टाकावं की जपावं
यात द्वंद झालं
शेवटी स्वतःच, स्वतः सोबत
पुन्हा एकदा हरायचं ठरवलं......

नात्यांच कपाट
कधीतरी आवरण्यासाठी
पुन्हा एकदा बंद केलं....

-सुरेश सायकर

Monday 4 June 2018

पहिला पाऊस...

इजा कडकडायला लागल्या
तशी माय गोधडी बाजूला सारून
बाहेर आली
दोन चार महिन्यांपूर्वी कधीतरी 
चिपाडाच्या लिपलेल्या
पोपडे उडालेल्या भिंतीचा आधार घेऊन
उभी राहिली
एकटक बघत आकाशकडं
आबा सारखी...

आबा बघायचे तेव्हा
आग ओकत होता
सगळंच करपवून टाकत होता
खिश्यासोबत 
जिंदगानीलापण...

आबा हरलं
घशाला कोरड येईपर्यंत विनवणी करत
थकलं
पण सावकाराला पाझर कसला फुटणार
त्याच्या लालसेची विहीर 
हजार परोस खोल
त्याच्यात कितीबी पाणी ओता
ते कायम तळाशीच राहणार
मुद्दल सारखं... 

मायनं लांबूनच बघितलं आबाला 
झाडाच्या फांदीवर दोर टाकताना
तशी पळत सुटली
वाऱ्यागत
आवाज दिला पण तो पण
बेईमान झाला त्यादिवशी
पोहचतच नव्हता कारण
वारं उलटीकडं वाहत होतं
नशीबासारखं...

वाळलेल्या फांदीला
लटकलेलं आबा
पार फाट्यावरून दिसत होतं
कारण जिकडं बघावं तिकडं 
सगळंच करपलेलं
पार उजाड झालेलं माळरान...

सगळी वस्ती जमा झाली
माय नुसतीच बघत होती
फांदीकडं
कारण तिचा संसार मोडला होता
पण फांदी मोडलेली नव्हती 
एवढी वाळलेली असूनही...

दिवस पार पडले
पण मायची इच्छाच
आटून गेलेली
आबा गेल्यापासून तिनं धरलेलं अंथरूण
आज सुटलं...

ओट्यावर उभी राहून ती 
ढगांकडे एकटक बघत होती
दोघांमध्ये निशब्द संवाद चालू होता
तो गडगडत होता
की, उशीरा आल्याचे प्रायश्चित करत होता
कुणास ठाऊक..

सकाळ पासून सुरू झालेला 
दोन दिवसानंतर थांबला
अचानक हत्तीचं बळ माय मध्ये संचारलं
कायम डोक्यावर असणारा पदर
खांद्यावरून खाली घेत
कमरेला खोचून
कुदळ हातात घेऊन उभी राहिली
त्याच झाडासमोर
एकटक फांदीकडं बघत...

फांदीवर कोवळीशी 
पालवी फुटलेली होती
संसार जरी मोडला होता
पण माय मोडलेली नव्हती 
कुंकवाचा धनी गमावल्यावर ही
कारण तिच्या जगण्याला
आता नवीन
पालवी फुटलेली होती
लढण्याची....

@सुरेश तुळशीराम सायकर