Friday 25 September 2015

गणपतीबाप्पा मोरया...


झोपेचे आणि माझे आधीपासूनच वाकडे आणि त्यात जागायची संधी मिळाली कि मग विचारताच सोय नाही. तशी संधी चालून यायची ती गणपतीच्या दिवसांमध्ये, दिवस काय आणि रात्र काय काहीच पत्ता लागायचा नाही. आमच्या इथे दोन वेगळी गणपती मंडळं होती, एक वडारी समाजाची मुलं असलेली आणि एक इतर समाजाची मिळून राहणाऱ्या लोकांची म्हणजे आमचे ‘अष्टविनायक मित्र मंडळ’. वडारी समाजाची मुलं आमच्या वाडीमध्ये येवून लोकांना वर्गणी मागायची पण आमच्या इथली मुलं त्यांच्या एरियामध्ये कधीच जायची नाही आणि त्यामुळे वारंवार दोन्ही मंडळांमध्ये खटके उडायचे. एखाद दुसऱ्याला गचांडी पकडून जाब विचारायचे पण तुंबळ अशी हाणामारी व्हायची नाही. बऱ्याचदा फक्त खोलवर रोखून पाहणारी नजर काम करून जायची. तर अश्या वातावरणात राहत असल्याने आपोआप अंगात थोडीफार रग यायची. पण आईला समजले तर, फक्त या एका विचाराने ती रग जागच्या जागी मिटायची. 
 
आमच्या अष्टविनायक मंडळाचा मंडप जो होता तो मी राहत असलेल्या घराच्या समोर होता. दहा दिवस आधीच लोखंडी पहारीने खड्डे खोदून खांब रोवण्याचे काम चालू व्हायचे म्हणजे खांब रोवून फक्त सांगाडा उभा केला जायचा. पण त्या खोदलेल्या खड्ड्यांचा कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेवूनच काम सुरु व्हायचे. मंडळामध्ये असणारी मोठी मुलं आम्हाला फक्त ऑर्डर न सोडता स्वतः कामं करायला मदत करायची. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आमची नवीन पिढी तयार होत होती. काथ्या बादलीत भिजायला ठेवून आडव्या फळ्या टाकायच्या आणि मग भिजेल्या काथ्याने फळ्या करकचून बांधायच्या. डोकोरेशन साठी केलेली मेहनत पाण्यात जावू नये म्हणून चोहोबाजूने आणि वरतून लोखंडी पत्रा लावला जायचा कारण पाऊस हा हमखास येणारच. पत्रा दिसू नये म्हणून आतमधून चारही बाजूने आणि वरती पांढरा कपडा लावला जायचा आणि त्याचबरोबर दिवसा गणपतीबाप्पाला झाकायला समोर मोठा पांढरा पडदा. दिवसा प्रत्येकजण आपापल्या कामात गुंतलेला असल्याने हि सर्व कामे चालायची ती रात्रीचीच, तेव्हा रात्रभर जागावे लागणार असल्याने चहा तर हवाच मग नंबर प्रमाणे प्रत्येकजण चहाची जबाबदारी घ्यायचा. पंप मारून स्टोव्ह सुरु करायचा आणि त्यात होणारा स्टोव्हचा आणि भांड्याचा आवाज येवून देखील कोणाच्याच घरचे झोप मोडली म्हणून किरकीर करायचे नाहीत. आमच्यासाठी रात्रभर जागवण्याचे काम करायचा तो चहा आणि मोठ्या मंडळींना जागवण्याचे काम करायचा बार...गायछापचा.  
      
या तयारीबरोबरच सुरु व्हायची लगबग ती म्हणजे देखाव्याची, यंदा कोणता देखावा करायचा याबद्दल चर्चा व्हायच्या, कोणी म्हणायचे हलता देखावा, कोणी म्हणायचे गाण्यावरचे लायटिंग, कोणी म्हणायचे निसर्गदर्शन किंवा कोणत्यातरी किल्ल्याची प्रतिकृती. प्रत्येकाला वाटायचे कि त्याची कल्पना वास्तवात उतरावी पण मेन मुद्दा यायचा तो म्हणजे खर्चाचा आणि मग जास्त खर्चिक देखावे आपोआप मागे पडायचे आणि कमी खर्चाच्या देखाव्यांचा विचार केला जायचा. एके वर्षी मंडळाने ठरवले कि,हलता देखावा करायचा पण तो थोडा खर्चिक असल्याने मागे पडू पाहत होता, त्यावर उपाय म्हणजे देखाव्यातील त्या मूर्तींची हालचाल करण्यासाठी मंडळातील लहान आणि तरुण मुलांनी जबाबदारी घ्यायची. म्हणजे प्रत्येक वाक्याला त्या त्या मूर्तीची हालचाल करायची. वरकरणी सोप्पं वाटत असणारं काम नंतर नंतर खूपच त्रासदायक वाटायला लागलं. मांडवाला खालून पडदे गुंडाळलेले आणि आम्ही खाली, मिळाली तर खुर्ची नाहीतर दोन पायावर बसून प्रत्येक मूर्तीची हालचाल करायला बसायचो. त्रासदायक जरी असले तरी त्यामध्ये गंमत आहे असं हळूहळू जाणवायला लागलं. सगळ्यात आधी मंडळाच्या गणपतीच्या आरती व्हायची आणि त्या आरतीसाठी झाडून सगळी मंडळी हजर असायची. मग ज्येष्ठ व्यक्तीला आरतीचा मान देवून आरती केली जायची, प्रत्येक जण स्वखर्चाने प्रसादाची सोय करायचा. सरकारी नोकरदार असणारी मंडळी पेढा किंवा खव्याच्या मोदकांचा प्रसाद आणायचे तर तुटपुंजा पगारदार मंडळीचा हमखास ठरलेला प्रसाद म्हणजे केळी. समजा उद्या एम.एस.बी. मध्ये काम करणाऱ्या आणि रोज मुंबई पुणे अप डाऊन करणाऱ्या कुर्डेकर मामांचा नंबर असेल तर हमखास समजायचे कि, खव्याचे मोदक किंवा पेढा येणार आणि तेही दोन ते तीन बॉक्स. आणि त्यानंतर रिक्षा चालवणाऱ्या शिंदे मामांचा नंबर आला की, दोन डझन केळी फिक्स. छोट्या चकत्या केल्या कि, भरपूर प्रसाद व्हायचा. मंडळाच्या गणपतीची आरती झाली आणि सगळ्यांना प्रसाद वाटून झाला कि मग बाकीच्यांच्या घरातल्या गणपतीच्या आरतीसाठी आम्ही निघायचो. मग काय नुसताच कल्ला व्हायचा. सर्वात आधी, कुर्डेकर मामांच्या घरची आरती प्रसाद,पेढा किंवा मोदक आणि पुढे उभे राहणाऱ्या मुलांना टपलांचा प्रसाद, नंतर शिंदे मामांच्या घरची आरती, प्रसाद, केळी, आणि पुढे उभे राहणाऱ्या मुलांना टपलांचा प्रसाद, नंतर विकी जागडेच्या घरी आरती, प्रसाद, उकडीचे मोदक, आणि पुढे उभे राहणाऱ्या मुलांना टपलांचा प्रसाद, सकाळवाले मोरे, प्रसाद, साखर-खोबरे किंवा केळी, आणि पुढे उभे राहणाऱ्या मुलांना टपलांचा प्रसाद, वरेंच्या घरीची आरती, प्रसाद, केळी, आणि पुढे उभे राहणाऱ्या मुलांना टपलांचा प्रसाद, असे करत करत अख्ख्या वाडीला प्रदक्षिणा घातली जायची. सर्वात शेवटची आणि त्या वयात कंटाळवाणी वाटणारी आरती म्हणजे भाजीवाल्या विदर्भीय देशमुखांच्या घरची आरती, किमान पाच ते सहा इतर देवांच्या, देवीच्या मोठमोठ्या आरत्या झाल्यावर मग मूळ गणपतीच्या आरतीपर्यंत पोहचायला अर्ध्यातासांपेक्षा जास्त वेळ जायचा, प्रसाद, साखर-खोबरे, आणि इथे मात्र पुढे कोणीच उभे रहायला तयार व्हायचे नाही मागे-मागे करत मुलं अगदी देशमुखांच्या दरवाज्यापर्यंत यायची, आरती करणाऱ्या देशमुखकाका आणि मुलांच्या मध्ये प्रचंड अंतर आणि जेव्हा ‘घालीन लोटांगण... म्हणायला काका वळायचे तर मुलं इतकी लांब पाहून नजरेने त्यांना पुढे या असे दटावायचे. मग त्यातल्या त्यात पुढे उभे राहणाऱ्या मुलांना टपलांचा प्रचंड प्रसादच प्रसाद.

देशमुखांचे शेवटचे घर झाले कि मग घरी जेवायला जायचे, जेवणानंतर स्वीट खाल्ले जाते पण आम्ही जेवणाआधीच खायचो फक्त गणपतीच्या दिवसांमध्ये...असो. तर जेवण झाले कि, मोर्चा पुन्हा वळायचा मंडळाच्या मंडपाकडे आधीच बसून असलेल्या मुलांमध्ये सामील व्हायचो आणि गप्पांचा फड रात्री उशिरापर्यंत चालायचा. कोणत्या मंडळाने कोणता देखावा केला, किती खर्च केला, कोणाची किती वर्गणी जमा झाली, कोणत्या दोन मंडळांमध्ये खुन्नस चालू आहे, वर्गणीवरून कशी दोन मंडळांमध्ये मारामारी झाली अश्या एक ना अनेक गप्पा. दुसऱ्या दिवशी सकाळी पेपर टाकायला जायचे असून सुद्धा कधीच वैताग किंवा आळस आला नाही. शहरातल्या बऱ्याच मोठमोठ्या मंडळांचे देखावे गणपती बसल्यावर देखील पूर्ण झालेले नसायचे. साधारण दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी ते तयार व्हायचे आणि मग सुट्टीचा आदला दिवस गाठून गणपती बघायला जायचो. काही वेळेस त्या दहा दिवसांमध्ये कोणती इतर सुट्टी यायची नाही आणि आलीच तर मुलांना शाळेला सुट्टी पण वडिलांना ऑफिसला नाही मग अश्यावेळी शनिवार गाठून सगळी मंडळी आपल्या कुटुंबकबिला घेवून देखावे पाहायला बाहेर पडायची, म्हणजे रविवार दिवसभर आराम करायला मिळायचा. गणपती पहायला जाण्यासाठी आमचा एक ग्रुप होता, विनोद भताने त्याच्या दोन बहिणी विनिता ताई, हेमा आणि त्यांच्या शेजारच्या शिंदेंच्या दोन मुली, ज्योती आणि कविता. त्या दोन मुली सहसा कोणामध्ये जास्त मिसळायच्या नाही पण विनोद सोबत आहे म्हंटल्यावर शिंदेमावशी निर्धास्त असायच्या. विनोद म्हणजे एक अजबच रसायन होतं, एकदम दिलखुलास माणूस, कधी कोणासोबत वाद नाही तंटा नाही, नेहमी हसतमुख. फक्त एक दोन वाक्यांमध्ये त्याच्याविषयी लिहिणे शक्यच नाही सविस्तरपणे लिहिणे क्रमप्राप्त. शनिवार गाठून आमचा सहा जणांचा ग्रुप गणपती बघायला निघायचा. आमचा गटप्रमुख विनोद त्याला पुण्यातल्या सगळ्या गल्लीबोळाबद्दल माहिती, कोणत्या मंडळाचा देखावा चांगला आहे, त्या देखाव्यापाशी जास्त गर्दी असल्यास तिथून बाहेर पडायचे असेल तर कोणत्या बोळातून शोर्टकर्ट घेता येईल, कुठला रस्ता कोठे निघतो, हे त्याला अगदी तोंडपाठ होते, नाहीतर एवढ्या प्रचंड गर्दीत शहाणा माणूस देखील गोंधळून जाण्यासारखी स्थिती निर्माण व्हायची. या गर्दीमध्ये देखावे पहायला येणारे कमी आणि गर्दीचा गैरफायदा घेणारे जास्त असायचे, भुरटे चोर आणि त्याहून जास्त असायचे ते स्त्रियांना आणि मुलींना नको तिथे हात लावण्यात समाधान मानणारे वखवखलेल्या नजरेची गिधाडे. अशी चीड आणणारी माणसं दिसली कि प्रचंड राग यायचा आणि आमच्या सोबत असणाऱ्या मुलींच्या अंगचट यायचा प्रयत्न करताना दिसला कि, मी मारामारीच करायचो आणि मग अशात विनोद सामंजस्याची भूमिका घेत तो वाद तिथेच संपवायचा. मला म्हणायचा, भाई, लोकं वाईट नसतात तर त्यांची वृत्ती वाईट असते. जर वृत्ती चांगली तर माणूस चांगला.त्यावेळी इतका राग आलेला असायचा कि त्याचे उपदेशाचे डोस कधीच पचनी पडायचे नाहीत. विनोदला  आवडणाऱ्या व्यक्तीला संबोधण्याची त्याची एक खास स्टाईल होती, ’भाई’. मला आमच्या वाडीतले लोक खूप रागीट म्हणायचे आणि आजही म्हणतात, पण माझा राग नेहमी असायच्या तो अन्यायाविरुद्ध मग तो अन्याय कोणत्या प्रकारचा असो. आजही मी आतल्या आत धुमसत असतो आणि तेव्हासारखा आजही व्यक्त होतो ते हातांनीच, पण आता लेखणीद्वारे. वाद निवळा कि मग डोकं शांत होण्यासाठी विनोद हसून म्हणायचा, ’चला, भाईचं डोकं गरम झालंय, बघू आईस्क्रीम किती लवकर वितळतय ते’ मग आम्ही आईस्क्रीम खायला भैय्याच्या गाडीपाशी जायचो. मग भाजलेलं कणीस, वडापाव, पोपकोर्न सगळं दाबून व्हायचे आणि त्या दिवशी होणाऱ्या सगळ्या खर्चाचा पुरस्कर्ता असायचा तो म्हणजे विनोद. शेवटच्या विसाव्याचा टप्पा म्हणजे बालगंधर्वाचा पूल, तिथं बसल्यावर जाणवायचे कि पाय दुखायला लागलेत. त्यावर उपाय म्हणजे गरम गरम चहा मग सगळी मरगळ झटकून घरी निघायचो. हे सगळे देखावे पायी फिरत पहायचो आणि पहाटे उशिरा घरी यायचो. घरी जावून सुतळी घ्यायची मग जाधव सायकलमार्ट आणि तिथून मग पेपरलाईन. इतकं फिरून पायाचे तुकडे पडलेत असं कधीच वाटायचं नाही. काही दिवसानंतर आजारपणात विनोद गेला......कायमचा आणि त्यानंतर मी गणपतीचे देखावे देखील पाहणे बंद केले...कायमचेच.

मंडपाच्याखाली बरीच जागा असायची मग अशातच मोठ्या मुलांचे रात्रभर पत्त्यांचे डाव चालायचे ते पत्त्यांचे डाव पैश्यात चालायचे. सिगरेट ओढणे, तंबाखू खावून पचापच थुंकणे असले धंदे चालू व्हायला लागले. अश्यातच कोणीतरी पोलिसांना टीप दिली बहुतेक आमचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या मंडळाने दिली असावी आणि अचानक पोलिसांची धाड पडली. पत्ते खेळणाऱ्याना पोलिसांनी पकडून नेले, मग त्यांच्या घरच्या मोठ्या माणसांनी, मुलं रात्रीची झोप येवू नये म्हणून टाईमपाससाठी खेळत होती पण पैसे लावून खेळत नव्हती असे काहीबाही सांगून त्यांना सोडून आणले. या प्रकारानंतर माझ्या सोबतच माझ्या वयाच्या इतर मुलांचे मन उडाले आणि अशातच ठरवले कि आपण आपले वेगळे नवीन मंडळ स्थापन करायचे आणि मग स्थापना झाली ‘अष्टविनायक बालमित्र मंडळ’ची.

फाटाफूट झाल्यावर मोठ्या मंडळाच्या गणपतीची स्थापना मेन रोडवर व्हायला लागली. आणि आमच्या नवीन मंडळाच्या गणपतीची स्थापना वाडीतल्या आतल्या जागेत झाली. आता नवतरुणांच्या विचाराने भारावलेले आमचे दिवस सुरु झाले. आधीपासूनच ठरवले कि वाडीतल्या लोकांना वर्गणीसाठी कोणतीही बळजबरी करायची नाही. कारण एकाच वाडीत राहून दोन वेगळी मंडळ झालेली होती त्यामुळे लोकांना असं नको व्हायला कि कोणाला किती रक्कम दयावी. शेवटी ज्यांना मनाला वाटेल तेवढी रक्कम दयावी आणि जास्तीत जास्त सहभाग दयावा असे ठरले. मोठ्या मंडळामध्ये चालणाऱ्या गैरप्रकारामुळे आधीच लोकं त्यांच्या विरुद्ध झालेली होती त्यामुळे आमच्या मंडळाला चांगला प्रतिसाद मिळू लागला. मंडप उभे करताना ज्यांना वाटेल त्यांनी तो तो खर्च करायचा, कोणी लोखंडी पत्र्यांचा खर्च उचलला, कोणी मंडपासाठी लागणारे लाकडी खांब आणि लाकडी फळ्यांचा खर्च उचलला असे करून पहिल्यावर्षी जोमात सुरुवात केली, देखावा देखील अगदी जेमतेम केला. मंडळाचा जमाखर्च अगदी काटेकोरपणे लिहून अहवाल सुरु केला. ठरल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन मंडपापाशी होवू दिले नाहीत. वरचेवर मिटिंग घेवून नियोजन करायचो काही छोटे छोटे वाद व्हायचे पण ते चहाच्या पेल्यातच संपायचे, पण एकप्रकारे ती सुरुवातच होती. वेगवेगळ्या विचारांची डोकी एकत्र आली आणि त्यातल्या त्यात प्रत्येकाला कार्यकर्ता न राहता नेता व्हायचे असेल तर मग? 

पहिले वर्ष जोमात पार पाडले. दुसऱ्या वर्षीचे नियोजन करताना बऱ्याच गोष्टी भव्य प्रकारात करव्यात असे ठरले. माझ्यासोबत काहीजणांचा विरोध होता पण प्रतिस्पर्ध्याला टक्कर द्यायची म्हणजे भव्यदिव्य करणे आलेच. अशातच एक वेगळाच पायंडा पडायला सुरुवात झाली. याआधी वाडीतल्या ज्येष्ठांना मिळणारा आरतीचा मान आता प्रत्येकजण आपल्या ओळखीच्या सो कॉल्ड नेत्याला दयायला लागला. मग अशातच मी देखील आमच्या इथल्या नगरसेवकाला बोलावले, भव्य करायचे म्हणजे निधी हवा आणि मग जास्त वर्गणी देणाऱ्याला आरतीचा मान. मी बोलावलेल्या नगरसेवकाला मान मिळाला पण मग अंतर्गत विरोध देखील वाढायला लागला. कसेबसे दहा दिवस आटपत आले  आणि अचानक काही महाभागांनी ठरवले कि या वर्षी मूर्तीचे विसर्जन करायचे नाही तर त्या मूर्तीची कायम स्वरूपी मंदिर बांधून त्यात स्थापना करायची. हेतू खूपच चांगला होता, पण मूर्तीची स्थापना करायला मंदिर कुठे होते अन ते उभारायचे म्हणजे तेवढा निधी तरी कुठे होता. नियमाप्रमाणे मिटिंग घेतली ती विकास जागडेच्या घरी, मिटिंग मध्ये पुन्हा हा विषय मांडला. मी विचार मांडला, आपण या वर्षी मूर्तीचे विसर्जन करू. आधी मंदिर बांधू आणि पुढच्या वर्षीच्या मूर्तीची स्थापना त्या मंदिरामध्ये करू. यावर्षी ते शक्य नाही कारण मंदिरासाठीची जागा निश्चित नाही, निधी नाही आणि कोणतीच योजना तयार नाही. सर्वात महत्वाचे, मंदिर बांधून होईपर्यंत सध्याची मूर्ती ठेवायची कोठे? कारण मूर्ती आकाराने मोठी होती आणि त्यामानाने इतरांची घरे लहान आणि त्यातल्या त्यात एखाद्याच्या घरी मूर्ती ठेवायची म्हणजे सोवळेओवळे आलेच त्याचे काय? वाडीतली बरीचशी मंडळी मांसाहार करणारी होती त्याचे काय? अशातच दत्त्या म्हणाला, आपण विकासच्या घरी मूर्ती ठेवू. त्याने नुकतीच त्याच्या चुलत्याची शेजारी असणारी खोली विकत घेतली होती. तिथे मूर्ती ठेवायला काही हरकत नाही. मी म्हणालो, विक्याच्या घरी ठेवण्याऐवजी तुझ्या घरी ठेवू. इतरांच्या मानाने तुझे देखील घर मोठेच आहे. यावर त्याने सांगितले कि, माझ्या वडिलांना दिवसाआड खायला मटण हवे असते. अश्यावेळी ते शक्य नाही. त्यावर अचानक विक्याने स्वतःच्या घरी मूर्ती ठेवून घ्यायची तयारी दाखवली. मी त्याला विरोध केला, त्याला म्हणालो, अरे, तू कशाला विनाकारण पुढारपण घेतोस. जो म्हणतोय यावर्षी विसर्जन न करता मूर्ती ठेवायची आहे त्यालाच ठेवून घे म्हणावं मूर्ती आपल्या घरी. खूप अडचण होईल तुला तुझ्या घरी मूर्ती ठेवून घेतल्यावर पण विक्या म्हणजे गणपतीचे दुसरे रूपच, लोकांचे भले करण्यातच आजपर्यंत त्याने धन्यता मानली आहे. कोणाला खरे वाटत नसेल तर विक्याचे डोळे बघा, सेम टू सेम गणपतीबाप्पा सारखेच, फक्त डोळेच सारखे नाही तर वृत्ती देखील बाप्पासारखीच. विक्या त्याच्या मतावर ठाम राहिला आणि माझा विरोध फिक्का पडू लागला. माझ्या या विरोधाला केवळ शरदचाच पाठींबा होता. सरतेशेवटी या निर्णयाला मी माझा विरोध दर्शवून मिटिंगमधून आणि मंडळामधून बाहेर पडायचा निर्णय घेतला आणि पडलो देखील सोबत होता फक्त शरद. अश्याप्रकारे माझ्या सार्वजनिक मंडळातला सहभागाचा देखील शेवट झाला.....कायमचाच. एक कोडं माझं मलाच आजतागायत उलगडलेलं नाही, एखादी गोष्ट माझ्या मनातून कायमची उतरली कि मी कधीच त्याच्या वाटेला जात नाही. नात्यांच्या बाबत अशी वेळ न येवो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.

-सुरेश सायकर