Sunday 16 October 2016

...तथास्तु

( स्थळ : पुण्यातला प्रचंड रहदारीच्या, अगदी बाजीराव रस्त्याकाठच्या, सदाशिव पेठेतील पाच मजली इमारत, नाव-कल्पवृक्ष, टेरेसवर जमलेली सोसायटीची सभासद मंडळी )

सोसायटीच्या अजेंड्यावर कधी नव्हे तो खूप मोठा आणि अतिमहत्वाचा विषय आला होता.

लिफ्टचा दरवाजा उघडा राहू नये आणि जर चुकून राहिलाच तर तो लक्षात यावं म्हणून, सोसायटीच्या सर्व सभासदांनी (कोकणस्थ आणि देशस्थ याचे पहिल्यांदा एकमत झालेले दुर्मिळातले दुर्मिळ उदाहरण.असो.)   असे ठरवले कि, जोरात वाजणाऱ्या एखाद्या संगीताची धून लावावी. (बरं, इथे शीला कि जवानी, मुन्नी बदनाम हुई, असले थर्ड क्लास संगीत कानाखाली फुकटात वाजवले जाते. त्यामुळे त्याचा विचार देखील कोणाच्या मनात येणे देखील दुर्लभ) कोणी तरी सुचवले कि, पंडितजींच्या आवाजातील भैरवी लावावी. पण समजा रात्रीच्या वेळी जर कोणी घाईघाईमध्ये दरवाजा लावायचा ठार विसरला तर...? आख्खी सोसायटी पहाट झाली समजून जागी व्हायची. तेव्हा तेही बारगळले. अगदी संगीत नाटकाचे पद ते समुधुर संगीत यावर देखील चर्चा झाली. शेवटी एकमताने निवड झाली ती, ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे याची. सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि चहा पाण्याचा कार्यक्रम करायचा ठरला...आपापल्या घरी.

मी मात्र जाम वैतागली होती, सगळ्यांवरच, अगदी आयुष्यावर देखील. इंग्लिश मिडीयम शाळेमध्ये टीचर म्हणून काम करणे सोप्पे नव्हे. त्यातल्या त्यात, लहान मुलांना शिकवायचे म्हणजे तुमच्यामध्ये, फक्त असीम नव्हे तर जीव गेला तरी शांत राहून हसरा चेहरा ठेवण्यासाठीचे, पेशन्स असणे खूप गरजेचे. सरकारचा नवीन नियम, लहान मुलांवर हात उगारायचा नाही, त्यांना शारीरिक शिक्षा देखील करायची नाही. तर शिक्षा म्हणून त्यांना वर्गाच्या बाहेर उभे करायचे. त्यातल्या त्यात काही टारगट मुलं तर ठरवून दंगा करतात आणि शिक्षा म्हणून बाहेर उभे राहण्याची शिक्षा आनंदाने स्वीकारतात. त्यातल्या त्यात शिक्षा जर कारंज्यापाशी झाली तर अगदी मान ताठ करून जातात, कारण समोरच रहदारीचा वाहता रस्ता असल्याने, मुलांना मस्त आनंद वाटायचा. तिथली शिक्षा अगदी रंगवून इतर मुलांना सांगायचे. जणू काय पिकनिक पॉइंटच तो. अशातच घरी येवून थोडा वेळ शांततेत राहावे तर ब्लॉक नेमका लिफ्टच्या बाजूलाच असल्याने नेहमी लिफ्टचा दरवाजा उघडा राहायचा. मग कोणीतरी पाचव्या मजल्यावर येवू पाहणारे, तळमजल्यावरून दरवाजा उघडा ठेवणाऱ्याच्या नावाचा उद्धार करायचे. मग न राहून शेवटी आवाज यायचा तो यायचाच, बाळ इंदू, अगं जागीच असशील, तर जरा त्या लिफ्टचा दरवाजा (पण खरं तर तो उच्चार...थोबाड असाच असायचा) व्यवस्थित लाव बरं. मग दरवाजा न लावणाऱ्याचा आणि तळमजल्यावरून अगदी पाचव्या मजल्यापर्यंत उंच स्वरात दरवाजा लाव म्हणून ऑर्डर सोडणाऱ्याच्या नावाचा उद्धार करीत, मी लिफ्टचा उघडा दरवाजा व्यवस्थित लावत असे. तसा सगळ्यांना माहित होता, माझा जमदग्नीचा अवतार. पण इथे दारात उभ्या राहिलेल्या सेल्समनला कोणी दार उघडून बघत नाही, तिथे माझा जमदग्नीचा अवतार पाहायला, कोण पाचव्या मजल्यावर येणार.    

लिफ्टमन म्हणून काम करणारा महादू, वय झाल्यामुळे काम सोडून गेला होता. त्या बिचाऱ्याने इमानीतबारे पुरे चाळीस वर्षे नोकरी केली होती. तसा त्यालाही दुसरा कोणताच पर्याय नव्हता. आधी जसे, कारकुनी नोकरी करणारे आयुष्यभर एकाच जागी चिटकून अगदी, पी.एफ. ग्राजुईटी घेवून निवृत व्हायचे. अगदी तसेच महादूचे होते. जाताना त्याला अगदी उचलून, रिक्षात घालून त्याच्या मुलांनी नेला होता. त्याला पी.एफ. ग्राजुईटी मिळाली नाही, हि गोष्ट अलहिदा. तर तो गेल्यानंतर, इथे कोणीच लिफ्टमन म्हणून काम करायला तयार होत नव्हता. त्याला कारण फक्त अशक्त, कमकुवत पगार नव्हता. तर त्याला असणारे कारणच खूप विचित्र होतं, तळमजल्यावरच्या जोशींकाकूंना दुधाच्या पिशव्या आणून देण्यापासून ते पाचव्या मजल्यावरच्या दामले आजींची औषधे आणून देण्याची कामे त्या एकाच पगारामध्ये त्याला करावी लागत असे. मधल्या मजल्यावरच्या मंडळींची मग बातच नको. अनेकदा तर, दुसरे कामाला लावतात, तर मग आपणा का नको? अशी ईर्ष्या वाटून, कुलकर्ण्यांनी तर एकदा कहरच केला. त्याला अगदी ठरवून पाच वेळा वर्तमानपत्र बदलून आणायला पाठवले होते. प्रत्येक वेळी वेगवेगळे समूहाचे वर्तमानपत्र बदलून आणायला नव्हे, तर, आधी काय म्हणे तर वर्तमानपत्राचा छोटासा कोपराच फाटलेला,  तर दुसऱ्यांदा आतल्या पानाची घडी व्यवस्थित नसल्याने नेमकी त्यांना वाचायच्या बातमीवर रेघ पडली होती म्हणून. असल्या छळाला वैतागून, तो बिचारा लिफ्टमन फक्त पळून गेला म्हणून नशीब. नाहीतर बिचाऱ्याने पाचव्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला असता, तो हि नेमका जोशींच्या, कुलकर्ण्यांच्या,दामलेंच्या डोक्यावर. तसेही हे सगळे एका जागीवर सापडणे दुर्मिळच, बहुतेक त्याला याची जाणीव झाल्याने, तो बापडा पळून गेला.

कमीला भर म्हणून कि काय, माझ्या शेजारच्या ब्लॉकमध्ये कानाने एकदमच ब्लॉक झालेल्या दामले आजी राहत होत्या. नेमक्या त्याच नेहमी लिफ्टचा दरवाजा उघडा ठेवून निघून जात असत. तश्या त्या एकट्याच राहत होत्या, मुलगा अमेरिकेला आणि मुलगी लग्न होवून मुंबईला. दामले आजींना जिथे मुंबईच वर्ज्य तिथे अमेरिकेची बातच नको. त्यामुळे त्या एकट्याच राहायच्या, जसे जमेल तसे स्वतःसाठी बनवून खायच्या. त्यांचा वेळ घरापेक्षा, राम मंदिरामध्येच जास्त व्यतीत व्हायचा. त्यांना ऐकू अजिबातच यायचे नाही, तरीपण भजन, कीर्तन यामध्ये अगदी तल्लीन होवून जायच्या. मला नेहमी वाटायचे, सोसायटीच्या सभासदांना सांगून लिफ्टच्या दरवाजास भजन, कीर्तनाची ट्यून लावावी. कमीकमी त्यामुळे तरी त्यांना ऐकू जाईल. कावळा बसायला अन फांदी तुटायला एकच वेळ म्हणतात. तसं घडलं, मला जेव्हा समजले कि, लिफ्टसाठी ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे ची ट्यून लावणार आहेत. त्यावेळेस साखरेचे अगदी चार दाणे, सोसायटीतल्या सगळ्या लोकांच्या हातावर ठेवावेत असे मनात आले. पण दुसऱ्याच क्षणी, एखाद्याचे एफ.बी.वरचे अपडेट केलेले स्टेटस चांगले असून देखील लाईक करायचा विचार झटकावा, तसे ते झटकून टाकले. शाळेतून आल्यावर, तळमजल्यावरून लिफ्टने डायरेक्ट पाचव्या मजल्यावर येणारी मी, मधल्या मजल्यांवर कोण राहते याची साधी चौकशी पण कधी केली नव्हती आयुष्यात. त्यातल्या त्यात बेशिस्त लोकं जवळपास म्हंटली कि, माझ्या डोक्यात प्रचंड तिडीकच जाते. शाळेतील मुलं कमी पडतात म्हणून कि काय, सोसायटीमधली मुलं काही कमी नव्हती. पण त्यांना माझा नेहमीच धाक असायचा. मी फक्त डोळे रोखून जरी त्यांच्याकडे पहिले, तरी ती मुले मुकाट तोंड खाली पाडून निघून जात. अश्यातच, ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे ची ट्यून लावणार म्हंटल्यावर, आता आपली, लिफ्टचा दरवाजा लावण्यापासून सुटका होणार, याचा खूपच आनंद झाला.

त्या दिवशी शाळेमधून आल्यावर नेहमीप्रमाणे प्रचंड चिडचिड झालेली. वर्गामध्ये एका मुलींला होमवर्क का केले नाही म्हणून विचारले तर, डान्स इंडिया डान्सचा प्रोग्रॅम टीव्हीवर लागलेला होता, तो बघताना झोपी गेले. आता सौम्य शिक्षा ती काय करावी...? या विचाराने डोक्याची नस फुटून जायची वेळ आली होती. वर्गाबाहेर जावून उभी रहा असं सांगितलं तर, अगदी निर्लज्जपणे, मिस, कारंज्यापाशी का..? असं विचारले. मनात आलं, कि दोन, चार.... पण विचार मनातच गाडून टाकला. डोकं प्रचंड दुखत होते, म्हणून घरी आल्यावर आलं, सुंठ टाकून चहा बनवायला घेतला. पातेल्यात चहा उकळत होता आणि   माझं रक्त देखील. इतक्यात ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे ची ट्यून वाजली. मनात म्हंटल, चला, आजी मंदिरातून आल्या असतील, आता त्या ट्यून ऐकून लिफ्टचा दरवाजा बंद करतील. पण दरवाजा काही बंद झाला नाही, म्हणून मी लागोलाग बाहेर जावून पाहिलं तर, लिफ्टचा दरवाजा थोडा उघडाच होता. आणि इकडे दामलेआजी जणू काय भजन चालू आहे, अश्या अविर्भावात टाळ्या वाजवत दरवाजा उघडून आपल्या ब्लॉकमध्ये जात होत्या. मी एकदम किंचाळूनच जोरात ओरडले, आजी त्या दरवाजाचे थोबाड आधी बंद करा. भजनामध्ये रंगत यावी, म्हणून बुवा जसे मध्येच उच्च स्वरात हुंकार भरतात. बहूतेक त्यांना तसेच वाटले कि काय, म्हणून त्यांनी टाळ्या वाजवता वाजवता, एकदम दोन्ही हात उंचावले, आणि ब्लॉकचा दरवाजा बंद करून आतमध्ये गेल्या. आता मात्र माझी प्रचंड चिडचिड झाली, मी शक्य तितक्या जोरात ओरडून, सगळ्यांचा उद्धार करीत होते. शाळेमध्ये शिस्त म्हणून मी अजिबात ओरडू शकत नव्हते. त्याचा सगळं कसूर मी इथे भरून काढत होते. पण जणू काही घडतच नाहीये, अश्या अविर्भावात सगळे सभासद आपापल्या ब्लॉकमध्ये, ब्लॉक झाले होते. तिकडे उकळलेला चहा पूर्ण आटून गेला, आणि इकडे माझा आवाज, ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे च्या ट्यूनमध्ये.

दुसऱ्या दिवशी शनिवार, म्हणजे शाळेला अर्धा दिवस सुट्टी. त्यातल्या त्यात सोसायटीचे बरेच सभासद जाग्यावरच सापडणार होते. त्यामुळे त्या सगळ्यांना अगदी धारेवरच धरायचे, याच विचारात मी रात्रभर झोपूच शकले नाही. संपूर्ण रात्रभर, ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे ची ट्यून एकसारखी माझ्या कानात वाजत होती. एक दोन वेळा मी मध्यरात्री उठून, लिफ्टचा दरवाजा कोणी उघडा ठेवलाय कि काय..? हे पाहून पण आले. शाळेत इतकी कठोर शिस्तीने वावरणारी मी, इथे मात्र माझी अगदीच शेळी झाली होती. पण काहीही झाले तरी उद्या, दामले आजींचा निकाल लावायचा म्हणजे लावायचाच असा चंग मनाशी बांधला.
दिवसभराच्या दगदगीमुळे जरा डोळा लागला आणि काही वेळाने पुनश्च, ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे ची ट्यून. दरवाजा उघडा ठेवणाऱ्याची आता काही खैर नाही. या जोशमध्ये मी डोळे उघडले तर सगळीकडे धूरच धूर, अरे बापरे चहाचे भांडे अजून गैस वर चुकून राहिले कि काय...? अशी शंका मनामध्ये आली. पण हे प्रकरण जरा वेगळेच होते. ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे ची ट्यून अजूनही वाजतच होती. मग तर डोके सटकलेच, जोरात किंचाळून ओरडलेच. अरे...त्या लिफ्टच्या दरवाज्याचे थोबाड कोणी तरी बंद करा रे. वैताग आलाय त्या ट्यूनचा...एकसारखी वाजतीये मघापासून... दरवाजा तर बंद नाहीच झाला पण प्रत्युतरादाखल काही सफेद वस्त्र परिधान केलेली, मधाळ हास्य चेहऱ्यावर घेवून फिरणारी, डोक्यावर कसल्याश्या टोप्या कि मुकुट घातलेली, इकडून तिकडे फिरणारी माणसं, मला तोंडावर बोट ठेवून, शूउउउउ, असं म्हणत फिरत होती. डोकं एकदम कामातूनच गेलं. चार दिवसांवर गणपती आलेत, आणि दरवर्षीप्रमाणे सोसायटीची मंडळी कसली तरी नाटिका सादर करणार आहेत. अरे पण मग इतक्या पहाटे, हि काय वेळ आहे का, तालीम करायची. पण एकही थोबाड ओळखीचे दिसत नव्हते. तसेही, सोसायटीची मोजकीच मंडळी चेहऱ्याने ओळखीची होती. पण त्यापैकी इथे कोणीही दिसत नव्हते. डोकं आणखीनच दुखायला लागलं आणि त्यात भर म्हणजे, ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे ची ट्यून चालूच.

मी (एकाच्या हाताला पकडून, त्याला म्हंटल,) - अरे कोणाला तरी सांग रे...हि ट्यून बंद करायला...

तो – “ हे नाम अखंड चालूच असते...ते बंद करू शकत नाही...”

मी – “ अरे...कसं काय बंद नाही करू शकत....दरवाज्याचे थोबाड व्यवस्थित लावले कि होईल ते बंद...पण मला त्या दरवाज्याचे थोबाड इथे कुठेच दिसत नाहीये...”

तो – “ इथल्या पुण्याभूमीवर असले अपशब्द वापरणे पाप आहे “

मी – “पाप...अरे माझ्या झोपेचे खोबरे झाले....त्याचे काहीच नाही....म्हणे पुणे भूमी...”

तो – “पुणे भूमी नाही... पुण्याभूमी आहे ही....स्वर्ग म्हणतात याला...”

मी – “ स्वर्ग....अरे बाजीराव रोडची कल्पवृक्ष सोसायटी हि....माझ्यासाठी तर नरकच....म्हणे स्वर्ग....”
इतक्यात थोड्या उंचावर, खुर्चीवर बसलेला एकजण, खुर्ची कसली तर लग्नात असते ना तसली. तर  खुर्चीवरून बसून म्हणाला, “कोण गोंधळ घालतोय रे तिकडे...?”

मी – “ गोंधळ मी नाही याने घातलाय....ती ट्यून तेवढी बंद कर म्हणाले तर, मला म्हणतोय, इथे अपशब्द वापरायचे नाहीत...”

खुर्चीवाला – “अगदी सत्य आहे...स्वर्गामध्ये अपशब्द वर्ज्य आहेत....”

मी – “आता बासचं हा...तो म्हणे स्वर्ग, तू म्हणतोय स्वर्ग.....मला झोपेत चालायची अजिबातच सवय नाहीये...आणि एखाद्याला जरी असली तरी, पाचव्या मजल्यावरून लिफ्टमधून खाली येवून, एखाद्या दुसऱ्या सोसायटीमध्ये जाणे शक्य आहे का...? आपलं उगीचच काहीही....”

खुर्चीवाला – “बहुतेक तुला अजून समजलं नाहीये....हे स्वर्ग आहे...देवलोक...”

मी – “काय्य्य....? देवलोक....म्हणजे तुम्ही मला पृथ्वीवरून.....इथे.....स्वर्गात...”

खुर्चीवाला – “ आता तुला समजलं....तुझा पृथ्वीवरचा कार्यकाळ संपलेला आहे आणि म्हणून तू स्वर्गामध्ये आलेली आहेस...?

मी – “काय.... वेडबीड लागलं नाहीये ना....हि कसली पद्धत, ना काही अलर्ट, ना मेसेज, ना कसली नोटीस, विदाऊट नोटीस इथे तुम्ही मला आणलेच कसे....? मी कोर्टात खेचेन तुम्हाला.....माझी एकदा देखील परवानगी घेतली नाही....आणि मी असं काय पाप केलंय.....दामले आजीना ओरडून बोलले म्हणून डायरेक्ट स्वर्ग.....असला नोन्सेंसपणा मी अजिबात खवपून घेणार नाहीये...समजलं.... ”

खुर्चीवाला – “ऑफिसमधला शिपाई नाही.....अरे देव आहे मी...देव”

मी – “देव असताल, पण ते तुमच्या घरी....आमच्या घरीपण आहेत ना देव....”

खुर्चीवाला – “अरे....माझाच अवतार आहेत ते...”

मी – “ मग तुमच्यापेक्षा ते बरे....गप गुमान देव्हाऱ्यात बसलेले असतात....रोज सकाळी आई त्यांना अंघोळ घालते....टिळा लावते.... मग छान वासाची उदबत्ती ओवाळून त्यांच्या बाजूलाच लावते....मग दोघांच्या मध्ये मिळून एक, असे फूल वाहते....आणि त्या उपर, सगळ्या देवांसाठी, चिमुटभर साखर नैवद्य म्हणून ठेवते....बिचारे घेतात, दोन-चार दाणे आपापसात वाटून....हू नाही कि चू नाही.....आणि तुम्ही म्हणे देव...देव असे असतात का, पोलीस देखील एखादया स्त्रीला असं अपरात्री तिच्याच घरातून, तिची परवानगी न घेता...पोलीस चौकीमध्ये नेत नाहीत....आणि तुम्ही तर डायरेक्ट स्वर्गात घेवून आलात.....तुमच्यापेक्षा आमच्या देव्हाऱ्यातले देवच बरे....”

खुर्चीवाला – “अरे चित्रगुप्त, कोणाला आणलंय तुम्ही....आणि कोठून....”

चित्रगुप्त कि काय ते – “देवा....हि पुणे शहरातील, बाजीराव रोड इथे, कल्पवृक्ष सोसायटीमध्ये, ब्लॉक नंबर २०३ राहणारी, ७२ वर्षीय इंदुमती आहे.”

मी – “ शी...७२ वर्षीय....आणि मी....वेडबिड लागलंय कि काय तुम्हाला....”

चित्रगुप्त कि काय ते – “देवा...हिला...बाकीचे मुद्दे महत्वाचे वाटत नाही...पण ७२ वय म्हंटला कि, लगेच...ई ई ई ई....सुरु झाले आहे...या स्त्रियांचे खरं तर जरा अवघडच आहे.....”

मी – “अवघड माझे नाही आता तुमचे होणार आहे....एकतर मी इंदुमती नाही तर इंदिरा आहे....दुसरे म्हणजे मी जरी कल्पवृक्ष सोसायटीमध्ये राहणारी असले तरी, माझा ब्लॉक नंबर २०३ नाही तर २०२ आहे.... आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, माझे वय ७२ नव्हे तर २७ आहे....”

खुर्चीवाला – “चित्रगुप्त...हि काय म्हणतीये.....तुम्ही तुमची नोंदवही व्यवस्थित पाहून घ्या....”

चित्रगुप्त कि काय ते – “देवा....नक्कीच काहीतरी मोठा घोळ झालेला दिसतोय...म्हणजे पृथ्वीसारखाच कारकुनी प्रकार इथे घडलेला दिसतोय.....माझ्या हाताखालील एखाद्या कनिष्ठ कारकुनाने आकडेवारीमध्ये चुकीची नोंद केली....पुढचे मागे आणि मागचे पुढे असं काहीसं झालंय बहुतेक.....आणि मी देखील विश्वास ठेवून, न वाचताच, सरळ सही ठोकून दिली....”

खुर्चीवाला – “मोठ्ठा... खूपच मोठ्ठा गोंधळ करून ठेवलाय तुम्ही....ताबडतोब तुमची नोंदवही बारकाईने पाहून घ्या बरं....”       

मी – “ पाहून वगैरे ते काय आहे ते तुमचं तुम्ही नंतर घ्या....आधी मला माझ्या घरी पाठवा....एकतर माझी आई काळजीत असेल....दिवसा न सांगता जाणारी कार्टी, अशी अचानक पहाटे कुठे गेली....आणि दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे....माझा स्कूल टायमिंग....सकाळचा शार्प... शार्प ७ वाजताचा आहे...मला अर्धा सेकंद जरी इकडचा तिकडे झाला तरी अजिबात चालत नाही...तेव्हा तुम्ही मला आत्ताच्या आत्त्ता लगेचच घरी पाठवा...समजलं”

खुर्चीवाला – “चित्रगुप्त, तुम्हाला हजारदा बजावून झालंय...पुण्यामधून आणि त्यातल्या त्यात पेठांमधून कोणाला जर उचलायचे असेल तर ते फक्त आणि फक्त सत्तरी ओलांडलेल्यानाच....कारण एकतर त्यांची भांडण्याची ताकद कमी झालेली असते....त्यामुळे ते अजिबात वादविवादात पडत नाहीत....आणि त्यामुळे आपल्या प्रोसिजरला अजिबातच वेळ लागत नाही....”

चित्रगुप्त कि काय ते – “ देवा, माफी असावी....”

मी – “ ओ....चित्रगुप्त कि काय ते....माफी त्यांची काय मागता...माफी माझी मागायची...समजलं...एकतर माझ्या परवानगीशिवाय तुम्ही मला इथे आणलंय...आणि त्यातल्या त्यात, त्या दामले आजींना आणायचं सोडून भलत्यालाच आणलंय...तेव्हा माफी माझी मागायची....इतकं पण समजत नाहीये तुम्हाला.....कसे काय स्वतःला देव म्हणवता तुम्ही....अवघड आहे बाबा तुमचं...”

खुर्चीवाला – “ अरे किती बोलते हि बाई....”

मी (किंचाळून) – “बाईई...ईईईई.....बाई म्हणता मला....इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिकवते मी....मिस, मैडम वगैरे असं काही म्हणायचे सोडून....बाईई....शी...”
एवढं ऐकल्यावर खुर्चीवाल्याने, साष्टांग दंडवतच घातला, म्हणाला, “चूक झाली हो....पुन्हा अशी चूक  कध्धीच नाही होणार....माफ करा....आणि तुमच्या इतकं वादविवादाचं प्रचंड बळ....आम्हाला देखील मिळू दया....”

मी – “खरंतर...अजिबातच वेळ नाहीये.....मला स्कूलला जायला उशीर होतोय....तरीपण...तथास्तु..”


- सुरेश तु. सायकर
985060-1353 / 955257-1353