Tuesday 10 July 2018

पावसाळी सेल...

काही आठवणीतील भावना आहेत
विकायच्या
पावसात भिजलेल्या...

पण
हळव्या भावनांना
अन पावसात भिजून
चुरगळलेल्या नोटेला
किंमत असते शून्य
व्यवहारी जगात...


म्हणूनच न दिसणाऱ्या
फक्त जाणीव करून देणाऱ्या
चलनी व्यवहारात
खोट न खावू देणाऱ्या
भावनांचा
पावसाळी सेल लावलाय....

डिस्काऊंट ???
शंभर टक्के
म्हणजे फुकटातच
कारण भावनांना किंमतीचे
लेबल नसते
त्याला असतो
तलम न दिसणारा धागा
ज्याला दिसेल त्याची ती भावना
न दिसणाऱ्याला
जाणवेल
पावसाची विनाकारणांची
रिपरिप....


-सुरेश तु. सायकर

Tuesday 3 July 2018

"रेखाओं का खेल है मुक़द्दर"....कैफ़ी आज़मी

गुणगुणावीशी वाटणारी, हृदयाच्या जवळची असणारी, प्रेरित करणारी, जगण्याला बळ देणारी, उभारी देणारी, ऐकल्यावर अंगावर काटे येणारी, वैफल्यातून बाहेर काढणारी, अश्या गाण्यांची शब्दरचना करणारे जे कोणी असतात ते खरे गीतकार. त्यात कैफ़ी आज़मींचा कितवा नंबर लागेल हे तानसेन काय तर कानसेन देखील सांगू शकणार नाही, कारण त्या काळात त्यांच्यासोबत त्यांच्यासारखेच, अनेक प्रतिभाशाली गीतकार होते. कैफ़ी आज़मीचा नंबर हा वेगवेगळ्या फॉर्म मध्ये जर मोजला तर इतरांपेक्षा जरा जास्त वरचा लागेल. याला कारण म्हणजे त्यांचे शायरीवरचे प्रेम आणि त्यावर असणारी हुकूमत. शब्दांना लीलया खेळवणे, हि खरंतर दैवी देणगी म्हणावी लागेल आणि कैफ़ी आज़मी यांनी यामध्ये महिरात हासील केलेली होती.

कैफ़ी आज़मींच्या अनेक चित्रपटातील गाण्यांपैकी, 'अर्थ' या चित्रपटातील "तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो" हे गाणे, उत्तोमत्त उदाहरण म्हणावे लागेल. त्यातली सगळीच कडवी, नव्हे तर सगळेच शब्द इतके प्रभावी आहेत कि, कोणालाही आपल्या व्यक्तिगत आयुष्यात जवळची वाटावीत. या गाण्यातली सगळीच कडवी आवडती आहेत. कमी-जास्त, डावे-उजवे असे, एकही नाही. पण हे एक कडवे म्हणजे कळस आहे, "रेखाओं का खेल है मुक़द्दर, रेखाओं से मात खा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो..."

व्यक्तिगत आयुष्यात, एखादा जेव्हा आपल्या क्षेत्रामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करून देखील यश मिळत नाहीये म्हणून नशीबाला दोष देऊन हताश होतो. तेव्हा त्याच्या मनामध्ये अनेक विचारांचे काहूर माजलेले असते. क्या अच्छा और क्या बुरा, याचा काहीच मेळ लागत नाही. सगळेच वाईट, या नकारात्मक निष्कर्षापर्यंत तो जेव्हा पोहचतो, तेव्हा त्याच्या मनात स्वतःला संपवावे, असेच काहीसे नकारात्मक विचार येतात. यश मिळत नाही म्हणून आयुष्य संपवणारे अनेक आहेत. पण जिद्दीने लढून उभारी घेणारे कमीच. अश्या कमी लोकांमध्ये, करून दाखवण्याची जिद्द असते. पण पडत्या काळात भोगाव्या लागलेल्या हालापेष्टांना त्यांनी तिलांजली मात्र दिलेली नसते. आपल्याला भोगाव्या लागलेल्या त्रासाला त्यांनी शब्दात उतरवून अशी झाल चढवली कि, ऐकणारा मुग्ध होऊन जाणार यात शंकाच नाही.  पण भोगावा लागलेला त्रास, सहन करावी लागलेली अहवेलना, हि अशी एक दुखरी नस असते कि, जी दाखवताही येत नाही, तोंडी सांगता देखील येत नाही. पण हो.... "युनिव्हर्सल पेन" असल्याने शब्दात जरूर मांडता येते. शब्दात व्यक्त होणे प्रत्येकालाच शक्य नाही आणि म्हणूनच दर्जा राखणारे गीतकार अगदी बोटावर मोजणारे होऊन गेले. त्यापैकीच एक...कैफ़ी आज़मी.

यातल्या प्रत्येक कडव्यांवर जर लिहायचे म्हंटले तर खूपच मोठा शब्दांचा भांडार खोलावा लागेल. आणि तसेही प्रत्येकाला त्या कडव्यांचा, शब्दांचा, मतितार्थ वेगवेगळा जाणवू शकतो आणि तो लाज़मी आहे. खरं तर सुरुवातीच्या कडव्यापासून श्रीगणेशा व्हायला हवा होता, पण इथे मात्र शेवटापासून झाली आहे. आपण हेदेखील सकारात्मकपणे घेऊयात....जसा एव्हरेस्ट हा पायथ्यापासून चढून, टोकावर गेल्यावर स्वप्नपूर्तीचा आनंद देतो. अगदी तसाच आनंद, या गाण्याबाबत देखील आपण घेऊयात.

- सुरेश तु. सायकर