Sunday 11 October 2015

मी आणि स्मार्ट?फोन....

हातावर मारलेल्या झिकझाक पद्धतीच्या पुसट रेषा पाहून एकदम आठवलं, दोन दिवसापूर्वी काही कामानिमित्त बाहेर जायचे होते आणि सोबत मित्र देखील येणार होता. त्याला भेटलो गप्पा मारल्या आणि मित्राला अचानक एका कामासाठी जायची आठवण झाली. बरं, त्याला यायला अर्धा तास लागणार होता तेव्हा नेहमीप्रमाणे आपण माणसं न्याहाळत बसूयात असं स्वतःशी म्हणेपर्यंत त्याने त्याचा स्मार्टफोन माझ्या हातात दिला आणि म्हणाला ‘माझ्यामुळे तुला थांबावं लागतंय तेव्हा मी येईपर्यंत डाऊनलोड केलेला नवीन साऊथ इंडिअन पिक्चर बघ, तुफान फायटिंग आहे’. मी अजूनही स्मार्टफोन हाताळण्यासाठी इतका स्मार्ट झालेलो नाही हे त्यालाही ठावूक. तेव्हा त्याने व्हिडिओ डाऊनलोड केलेल्या फोल्डरमध्ये जाण्यासाठी एक विशिष्ट पासवर्ड असतो हे सांगितले आणि बोटाने आडव्या तिडव्या रेषा मारत व्हिडिओ ओपन करून दाखवला आणि ‘असं ओपन कर आणि पिक्चर बघ’ असं म्हणाला अन निघाला. मी बावळटासारखं त्याच्याकडे पाहत होतो, खरंतर त्याने पासवर्डरुपी मारलेल्या आडव्यातिडव्या रेषा माझ्या स्मरणातून कधीच पुसल्या गेल्या होत्या. याबाबत माझे अज्ञान त्याला पुरेपूर ठावूक असल्याने तो पुन्हा एकदा सांगू लागला त्याक्षणी मी पेन घेवून तो मारत असलेल्या रेषा पाहून हातावर रेघोट्या मारल्या. जमतंय कि, असं मनाशी म्हणून त्याच्याकडे पहिले तर ‘काय बावळट आहेस रे’ असा त्याचा अविर्भाव होता. असो. अनेकदा अश्या गोष्टी दिसत असून देखील त्याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करणे हे खूप जिकरीचे आणि....पुन्हा एकदा,असो. थोडक्यात जितके जास्त फोल्डर तितके जास्त पासवर्ड.   

तर मित्राने माझ्या हातात स्मार्टफोन सोपविला आणि तो त्याच्या कामासाठी निघून गेला. मी पिक्चर चालू केला आणि मान खाली घालून तिथे उभ्या असलेल्या सजीवांमधून क्षणात गायब होवून स्वतःच्या कोशात गेलो. अनेकदा अशी टाळकी मान खाली घालून इवलीश्या स्क्रीनवर डोळ्यांचे आकुंचन करून स्वतःमध्येच मग्न झालेली पाहून त्यांच्या अश्या एकटेपणाची कीव करावीशी वाटायची. आज मित्राच्या कृपेमुळे मी त्यांच्यापैकी एक झालो होतो आणि कोणीतरी माझी देखील कीव करीत असेल इतका विचार करायला मी निदान त्यावेळी तरी सजीव असायला पाहिजे ना. इतक्यात मोबाईल वाजला आणि मी सजीवांमध्ये म्हणजे भानावर आलो. स्क्रीनवर एक नंबर आला, अश्यावेळी दुसऱ्यांच्या फोनवर आपण उत्तर देणे सोईस्कर वाटले नाही म्हणून फोन सायलेंट मोडवर टाकला. काही सेकंदानी फोन कट झाला. मी पुन्हा व्हिडिओच्या फोल्डरमध्ये गेलो तर तो ओपन होण्यासाठी ‘खुल जा सिमसिम’ प्रमाणे पासवर्ड सांगा म्हणून अडून बसला. तसा मी हुषार आहेच, कारण लक्षात न राहण्याच्या सवयीमुळे अनेकदा पंचाईत आणि हसू होत असल्याने स्वतःच्या मोबाईलवर (स्मार्ट मोबाईल नाहीये हो...सांगितलंय ना आधीच) स्मार्टपणे ‘टू डू लिस्ट’ या एकमेव ऑप्शनचा पुरेपूर वापर करून घेतो. त्याची क्षमता फक्त पाच गोष्टी लक्षात ठेवण्याची असल्याने अनेकदा कसरत करावी लागते, बघा, जुन्या का होईना पण तंत्रज्ञानाला देखील काहीवेळेस मर्यादा असते केवळ या विचारानेच आतल्याआत अगदी सुखावून गेलोय. तर, मित्राने सांगितलेला पासवर्ड हा झीकझाक पद्धतीचा असल्याने तो त्यावर कसा सेव्ह करून ठेवणार म्हणून हातावर आधीच त्या झिकझाक रेघोट्या मारलेल्या होत्या त्या उपयोगी आल्या. बोटाने स्क्रीनवर रेघोट्या मारल्या आणि डायरेक्ट पिक्चर सुरु झाला आणि मी पुन्हा एका क्षणात सजीवांमधून स्वतःच्या कोशात गेलो. सेनापती बापट सारख्या प्रचंड रहदारीच्या रस्त्याच्या कडेला बसलेलो असूनदेखील आणि हेडफोन नसूनदेखील त्या मोबाईलच्या इवल्याश्या स्पीकरमधून येणारा हळुवार आवाज देखील प्रचंड पुरेसा वाटत होता. नाहीत्यावेळेस त्याच प्रचंड रहदारीमध्ये एखादयाशी मोबाईलवर बोलायचे म्हंटल्यावर अंगावर काटाच येतो. अनेकदा मी अश्या गर्दीच्या ठिकाणी किंवा कार्यक्रमाच्या ठिकाणी मोबाईलवर आलेला कॉलदेखील घेत नाही. कारण आपण फोनवर बोलत असतो आणि आपण जे बोलतोय ते समोरचा ऐकतोय असं वाटून आपण झपाटल्यासारखे बोलतच राहतो. त्याचवेळी विनाकारण वाजवल्या जाणाऱ्या हॉर्नचा आवाज असा काही मिक्स होतो कि, समोरच्याने आपल्याला मूर्ख समजून कधी फोन कट केलाय हे देखील समजत नाही. मग अश्यावेळी फोन न उचलेला बरा. तर, पिक्चर बघण्यात तल्लीन झालेलो असताना पुन्हा एकदा फोन वाजला मग स्वतःच्या कोशातून सजीवांमध्ये आणि फोन पुन्हा सायलेंटवर. बिचारा वाजून वाजून कट झाला. पुन्हा पासवर्ड, पुन्हा आडव्यातिडव्या रेषा आणि पुन्हा पिक्चर चालू, पुन्हा सजीवांमधून स्वतःच्या कोशात. थोड्यावेळाने पुन्हा फोन वाजला मग स्वतःच्या कोशातून सजीवांमध्ये आणि फोन  सायलेंटवर, या वेळेस मात्र मित्र आला, त्याला फोन आलाय सांगितल्यावर त्याने तो घेतला आणि बोलायला लागला.

मनात विचार आला, सध्या आपणदेखील स्मार्टफोनच्या फिचर प्रमाणेच आपले जीवन जगत आहोत, एकलकोंड्यासारखे, स्वतःच्याच कोशात. म्हणजे आतल्याआत कुढत बसत आपण आपल्या मनाची कवाडे बंद करून घेतलेली आणि आतमध्ये कोणालाही अजिबात प्रवेश नाही. जर एखाद्याला प्रवेश दयायचा असल्यास आडवा येतो पासवर्ड. म्हणजे समोरची व्यक्ती आपली गुपिते सांगण्याइतपत योग्य आहे कि नाही याची शंका येवून फक्त वरवरचे बोलणे, समाजामध्ये न मिसळणे, एखाद्याच्या समारंभासाठी आमंत्रण असूनही टाळणे, गर्दी किंवा माणसांचा समूह नकोसा वाटणे, एकांतात रहावेसे वाटणे असे एक ना अनेक प्रकार. स्वतःच्या आईवडिलांनसोबत व्यक्त होताना देखील हातचे राखून सांगणे, इतकेच काय तर लग्न झालेले पुरुषदेखील स्वतःच्या बायकोपासून बऱ्याचदा काही गोष्टी लपवून ठेवतात. आपण सांगितलेली गोष्ट तिला कितपत पटेल अन तिने त्या गोष्टीचा गैरसमज करून घेतला तर? इतकेच काय, तर आपल्या मनात एखादा विचार असाही निर्माण होवू शकतो कि ज्याचा सुगावा बायकोला लागला तर काय? या विचाराने देखील ती व्यक्ती, त्या विचारांना पासवर्डच्या आतमध्ये कायमचे बंदिस्त करते. नेमकी अशीच स्थिती बायकांच्या बाबतीत घडते, आपल्या नवऱ्याला आपण एखादी गोष्ट सांगावी आणि त्याने त्याचा सरळ अर्थाने विचार केला तर ठीक अन्यथा त्याच्या विपरीत घडले तर? या विचाराने मनात असूनदेखील त्या शेअर करीत नाहीत. मग वाढत जातात कुलुपबंद नाती. भाड्याने शेजारी रहायला आलेल्या कुटुंबाची फक्त माहितीच नाही तर नाव देखील अनेकदा आपल्याला माहित नसते आणि ते असावेच अशी काही अट देखील नाही. तरीही आपण स्वतःहून चौकशीला गेल्यास समोरच्यांच्या वागण्या बोलण्यामधला तुटकपणा सहज लक्षात येतो. ‘कशाला हव्यात फुकटच्या चौकश्या’ अश्या अविर्भावात पहिले जाते. मग एकूण परिस्थितीचा अंदाज आल्यावर आपण तिथून काढता पाय घेतो. आपण बाहेर पडल्या पडल्या होणाऱ्या दरवाज्याच्या ‘धाडडड्’दिशी आवाजावरून ओळखून जायचे कि आपले त्या घरात पुन्हा कधीच स्वागत होणार नाही. त्या एकाच दरवाजाला कितीतरी पासवर्डस, खालची कडी, वरची कडी, की-व्होल, सेफ्टीचेन, भरीसभर म्हणून सेफ्टीलॉक आणि त्यावर कडी म्हणजे बाहेर भक्कम तटबंदीचा लोखंडी दरवाजा. आपटलेल्या दरवाजावरून समजून घ्यायचे कि तिथला पासवर्ड किती घट्ट आणि अनब्रेकेबल आहे ते. परंतु आपण आपल्या लहानपणापासून नेहमीच माणसांच्या गराड्यात वाढलेलो असल्याने आणि अश्या परिस्थितीला सामोरे गेलो नसल्याने सुरुवातीला त्रास होतो. परंतु पुढेपुढे सराईतपणे अश्या प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ आपोआप आपल्यात तयार होते. म्हणजेच नकळतपणे आपणदेखील पासवर्डरुपी कुलुपबंद व्यवस्थेचे कधी भाग होवू लागतो हे देखील समजत नाही. मग हीच व्यवस्था आपल्याकडून आपल्या मुलांना देणगीदाखल मिळते आणि मग वाढत जाते पासवर्डचे अनब्रेकेबल जटील जंजाळ.    
           
अनेकदा आपण व्यक्ती समूहामध्ये असतो, हस्तांदोलन करतो, समोरच्याशी बोलत देखील असतो, व्यक्त होत असतो, हसत असतो, पटल्यास टाळीरुपी प्रतिक्रियादेखील देत असतो. पण तरीही आपण त्या व्यक्तीशी खुलून बोलत नसतो, अगदी वरवरचे असले प्रकार चालू असतात. बोलावेसे, विचारावेसे वाटून देखील कृत्रिम हास्याने बोलत असतो. पण जेव्हा ती वेळ येते आणि आपण ती गोष्ट विचारतो तेव्हा समोरची व्यक्ती सराईतपणे तो विषय टाळून आपली पासवर्डरुपी बंदिस्त कवाडं उघडतच नाही. अगदी आपली स्वतःची मुलं देखील आपल्याला त्यांच्या बाबतीत घडणारी प्रत्येक गोष्ट सांगतीलच असे नाही. अनेकदा आपण स्वतःहून विचारल्यावर देखील ती अगदी वरवरचे सांगतील. फक्त बापच नाही तर आजकाल आयांना देखील असेच वरवरचे ऐकून खरे वाटायला लागते. कारण आपल्या मुलांना आपण पूर्वी जे आयुष्य जगलोय ते कसे अवघड, लढाईचे आणि हलाखीचे होते याचे वर्णन करून वारंवार सांगत असतो. त्यामुळे मुलेदेखील अश्या विरुद्ध विचारप्रवाहाच्या विरुद्ध जावून काही वेगळे धाडस करायचेच म्हंटल्यावर अनेकदा विचार करतात. मग अश्यातच काहीजण स्वतःला हवीशी वाटणारी ती गोष्ट करण्याचे धाडस खाजगीत करतात आणि वारंवार करीत राहतात, असे करत असताना ती गोष्ट घरच्यांना समजणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते आणि त्यांना साथ मिळते ते अश्याच पद्धतीने पासवर्डबंद आयुष्य जगणाऱ्या समवयस्कांची. जितकी जास्त गुपिते तितके जास्त पासवर्ड झिकझाक पद्धतीचे. मित्राने सांगितले कि एखाद्या अनाहुताने तीन पेक्षा जास्त वेळेस चुकीच्या पद्धतीने रेषामारून फोल्डरमध्ये जाण्याचा प्रयत्न केला कि मोबाईलमधला सायरन वाजायला लागतो आणि कॅमेरा आपोआप सुरु होवून समोरचा अनाहूत त्यात बंदिस्त होतो. अगदी तसेच, जेव्हा अश्या पासवर्डरुपी माणसांचे बंदिस्त आयुष्य अनवधानाने ओपन होते तेव्हा नात्यांचा सायरनरुपी स्फोट होवून समोरची व्यक्ती समाजासमोर उघडी पडते. 
                                
म्हणून वरवर चांगली दिसणारी प्रत्येक व्यक्ती, वस्तू किंवा गोष्ट स्मार्टच असेल असे नाही. तेव्हा पासवर्डरुपी बंदिस्त आयुष्याची कवाडं उघडी करा.....आणि मोकळेपणाने जगा.

-सुरेश सायकर