Wednesday 18 May 2016

हेल्मेट...

आजही तो प्रसंग आठवला कि, अंगावर काटाच उभा राहतो. माणूस जो पर्यंत हातीपायी धडधाकट आहे तोपर्यंत त्याला कशाचीही किंमत कळत नाही, अगदी आपल्या स्वतःच्या शरीराची देखील. पण जेव्हा तोच एखादया अपघातामुळे किंवा जीवघेण्या आजारामुळे अंथरुणावर आडवा पडून राहतो. तेव्हा आपल्याकडून नकळत किंवा जाणूनबुजून झालेल्या चुकांची उजळणी करायला लागतो. यापुढे आयुष्य जर जगायला मिळाले तर ‘माणूस’ म्हणून जगू अशी स्वतःशीच भलावण करतो. 
  
खरं तर त्या दिवशी घडलेल्या प्रसंगात चूक माझीच होती. चतुश्रुंगी पोलीस चौकीच्या इथून पुणे विद्यापीठाच्या दिशेने भरधाव वेगाने गाडी चालवताना, गावी जाण्यासाठीची एस.टी. वेळेत पकडायची हे माझे जणू आयुष्याचे ध्येय झाले होते. स्वारगेटला पोहचल्यावर दुचाकी स्वारगेटच्या पेड पार्किंगमध्ये लावायची, रस्ता ओलांडायचा आणि लगेच एस.टी.त बसायचे अशी मनात उजळणी करत होतो. या विचारात दुचाकी चालवत असतानाच..... नको ते अघटीत घडले. बोलत असताना काहीतरी प्रोब्लेम झाल्याने अलगद पुढे मांडयांवर विसावलेला. कधी निसटून सिमेंटच्या रस्त्यावर तो पडला हे देखील कळले नाही. काळजाचा ठोकाच चुकला, पाठीमागून भरधाव वेगाने चार चाकी वाहने जात होती. मनात आलं, एखादया वाहनाने त्याला चुकवले नाही तर ??? त्याच्या डोक्याचा अगदी भुगाच होवून जाईल. थरथरत्या हाताने दुचाकी कशीबशी रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न करत होतो. एवढ्यात पाठीमागून भरधाव वेगाने जाणारे एक-दोघे जण ओरडलेच, ‘अरे येड्या, जा उचल त्याला लवकर. नाहीतर भुर्जी होवून जाईल’. खरं तर अश्यावेळी कोण काय बोलतं याकडे आपलं लक्षच नसतं. दरदरून घाम फुटलेला होता. त्यामुळे जाणारे काय बोलत होते याकडे माझे अजिबात लक्ष नव्हते. मी कशीबशी दुचाकी रस्त्याच्या कडेला घेतली, दुचाकीवरून उतरलो आणि रस्त्याच्या मधोमध पडलेल्या त्याला उचलण्यासाठी पळालो. समोरून भरधाव वेगाने चारचाकी गाड्या येत होत्या, पण माझे त्यांच्याकडे अजिबातच लक्ष नव्हते. मी फक्त आणि फक्त त्याच्याकडेच बघत होतो. अश्यावेळी काही चारचाकी वाहन चालकांच्या लक्षात आले आणि त्यांनी त्याला वाचवण्यासाठी गाड्या बाजूने घेतल्या. मी मनोमन त्यांचे आभार मानत, त्याला उचलले. अशी वेळ खरं तर वैरयावर देखील न येवो. पण त्या दिवशी माझ्या नशिबात खरंच काहीतरी अघटीत घडणार असंच होतं. हाताच्या ओंजळीत धरून त्याला मी एकटक बघतच  होतो. डोळ्यात पाणी जमा झाले होते. काही बोलावं हेच समजत नव्हतं. अगदी काही क्षणाआधी मी त्याच्या करवी बोललो होतो आणि आता.....आता तो अगदी निस्तेज माझ्या हातात होता. आजूबाजूचे गर्दीतले हळहळत होते, कोणीच काही करू शकत नव्हते. त्यापैकी एकाने खांदयावर हात ठेवून माझ्याकडे बघत ‘तो’ आता गेला अश्या आशयाने आपली मान हलवत माझे सांत्वन केले. मी सांत्वन करणाऱ्याला म्हणालो छे ...रे वेड्या...असा कसा जाईल हा ? आत्ताच आम्ही दोघं गावाला जायचं, काय काय कामं करायची याची उजळणी करत होतो. अरे याच्याच मार्फत मी बोललो होतो ट्राक्टरवाल्याशी, खालची पट्टी नांगरून घ्यायची, पोखरलेली माती वरल्या पट्टीत टाकायची. बाभळीची झाडं तोडण्यासाठी वखारीवाल्यासोबत देखील बोललो होतो पण तो परवडत नाही म्हणाला. तर मग यानेच... यानेच मला बाभळीच्या झाडांपासून कोळसे बनवणाऱ्या व्यापाऱ्याचा फोन नंबर दिला होता. त्या कोळसेवाल्याशी बोललो तर तो मी म्हणत असलेल्या किंमतीवर झाडं घेण्यास तयार झाला आणि हे फक्त याच्याच मुळे शक्य झाल. अरे, हातात घड्याळ घालून देखील एक्झाट किती वाजलेत हे कन्फर्म करायचे असेल तर याला पाहिल्यावरच समजते, इतका पाबंद आहे हा वेळेचा. मग अश्या अवेळी एक्झिट कशी काय घेवू शकतो हा???? आणि मला बाहेरगावी जायचे असताना, जेव्हा सगळ्यात जास्त याचीच गरज असताना, असा कसा काय हा मला सोडून जावू शकतो??? नाही.... मला....हा मला असा सोडून जाणं अशक्यच आहे.समोरच्याने पुन्हा एकवार माझा खांदा दाबला आणि ‘तो’ आता नाहीये हे पुन्हा एकवार डोळ्यानेच खुणावून सांगितले. तरीही माझा विश्वास बसतच नव्हता, अरे...कसा बसेल यार.....कसा बसेल. आत्ता सोबत असलेला अचानक नाहीये....यावर कसा काय विश्वास बसेल....तुम्हीच सांगा ना.

मी आजूबाजूच्या लोकांचा ‘तो’ आता नाहीये या सांगण्यावर अजिबात विश्वास न ठेवता, गावाला जायचे कॅन्सल करून, त्याला तश्याच अवस्थेत त्याच्या हॉस्पिटलमध्ये घेवून गेलो. खरं तर अशी वेळ अगदी वैरयावर देखील न येवो. मी फक्त वाचले होते, ऐकले होते, की, इमर्जन्सीच्या वेळेत मोठ्मोठी हॉस्पिटलदेखील अश्या अवस्थेतील रुग्णास एड्मीट करून घेत नाहीत. आणि दुर्दैवयाने ती वेळ माझ्यावरच  आली होती, मी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणावरून तिसऱ्या ठिकाणी त्याला घेवून फिरत होतो, याचना करत होतो, हात जोडत होतो. कारण त्याच्याशिवाय मी अगदी काहीच नव्हतो, खरंच काहीच नव्हतो, प्रचंड अवलंबित्व होतं त्याच्यावर माझं. म्हणतात कि देव खरंच आहे...हो तो आहेच, कारण इतक्या विनवण्या केल्यावर सरतेशेवटी एके ठिकाणी त्याला एड्मीट करून घेतले. पण एड्मीट करून घेताना वरच्याचा म्हणजे परमेश्वराचा हवाला दिला. आशेचा एक किरण...फक्त एक किरण, तुमच्या आयुष्याची दिशा बदलवून टाकू शकतो यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. त्याच विश्वासावर मी त्याला तिथे एड्मीट केले. तो कोमात गेल्याने त्याला आधीचे काहीच आठवत नव्हते. तो पूर्णपणे ब्लांक झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर, जाणीव होत असल्याची कोणतीच लक्षणं दिसत नव्ह्ती. त्यांनी मला आधी चार तासांची मुदत दिली मी तिथेच सैरावैरा होवून चकरा मारत होतो. खूप प्रयत्न करून थकल्यावर त्यांनी पुन्हा १२ तासांची मुदत दिली. १२ तास म्हणजे दुसराच दिवस, त्यांनी मला घरी जाण्यासाठी सांगितले. त्याच्या शरीरात टेस्टिंगसाठी नळ्या खोचलेल्या होत्या, अश्या अवस्थेत त्याला पाहणे खूपच त्रासदायक होते. तिथे थांबून देखील काही उपयोग नव्हता. त्याला वेन्टीलेटरवरच ठेवले होते. त्याची यारदाश परत आणणारी आणि त्याला मैच होणारी उदयाच उपलब्ध होणार होती. त्याच्या स्पेशालीस्ट डॉक्टरांकडे पाहून हात जोडले. त्यांनी डोळ्यानेच आश्वासन दिले. जड अंत:करणाने तिथून निघालो. डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. जर तो कधीच पहिल्यासारखा नाही झाला तर???? छे.... छे....विचार देखील करवत नव्हता. मला तोंडपाठ देखील नाहीत त्यापेक्षा जास्त माझ्या लोकांबद्दल त्याला माहिती आहे. कसाबसा घरी आलो, दोन घास देखील घशाखाली उतरवू शकलो नाही. रात्री एक दोन वेळा तर त्याने आवाज दिला कि काय असा भास होवून मी झोपेतून गडबडून उठलो देखील. आजूबाजूला पहिले तर ‘तो’ नव्हता. पण काही केल्या त्याची आठवण माझी पाठ सोडत नव्हती. ती संपूर्ण रात्र मी तळमळत काढली.

दुसरा दिवस उजाडला खरा पण तो देखील खूप उशिरा....कारण जो पर्यंत तो आवाज देवून उठवत नाही तो पर्यंत मी झोपेतून जागा झालोय असं कधीच घडलं नव्हतं. धडधडत्या अवस्थेत कसबसं आवरून मी त्याच्या हॉस्पिटलची पायरी चढलो. त्याचा डॉक्टर बहुतेक माझीच वाट बघत होता, मला पाहिलं तसा तो उठून समोर आला. मी माझ्या मनाची तयारी खरं तर आधीच करून ठेवली होती, कि तो आता नाहीये आणि कधीच नसणार. एवढ्यात त्याच्या स्पेशालीस्ट डॉक्टरने माझ्या समोर येवून मला धक्का दिलाच अभिनंदन.....खूपच नशिबवान आहात तुम्ही.....त्याला मैच होणारं जे काल पर्यंत मिळत नव्हतं ते आजच सकाळी मिळालं. खरं तर तुम्हाला एवढी धावपळ करायलाच लागली नसती. फक्त काही रुपयांचं त्याच्यासाठी हेल्मेट घेतलं असतं तर हि वेळच असली नसती

मला काही क्षणांसाठी खरंच काहीच समजायला तयार नव्हतं, मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. मी जे ऐकलं ते खरं आहे का....म्हणजे तो परत आला. ज्याला दुसऱ्यांनी ब्रेन डेड सांगितलं होतं आणि तो परत कधीच आधी सारखा होणार नाही असं सांगितलं होतं......तो परत आलाय. मी त्याला हातात घेतला, डोळ्यात पाणी जमा झालं होतं....त्याला प्रेमाने गोंजारलं.....त्याच्या चेहऱ्यावरून प्रेमाने बोटं फिरवली आणि त्याला कानाला लावला आणि म्हणालो हेल्लो नाना....हा... मी बोलतोय....मी उद्या येईल गावाला...नाही कालच निघालो होतो पण जरा प्रॉब्लेम झाला होता. हो...हो...उदयाच येतो सकाळच्या एस.टी.नेएवढं बोलून झाल्यावर पुन्हा एकवार त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं. डोळ्यात अजून पाणी जमा होतं, डोळ्यातलं पाणी पुसलं, खिशातून पाकीट काढलं. झालेलं टोटल बील देवून टाकलं... चक्क डिस्काऊंट न मागता.

आणि ८० रुपयाचं एक चांगलं हेल्मेट....म्हणजे कव्हर घेतलं....मैनचस्टर यूनायटेडचं बैकग्राउंड असलेलं.....माझ्या प्रिय.... मोबाईलसाठी.


-सुरेश सायकर