Friday 12 December 2014

शीरनाना... (लघुकथा )

‘शीरनाना’ या फक्त चार अक्षरी नावाचा एकट्या गावानेच नाही तर पूर्ण पंचक्रोशीने धसका घेतला होता. शीरनाना माहित नाही असा माणूस या पृथ्वीतलावरला नाहीच इतका तो कू’प्रसिद्ध होता. प्रसिद्धीसाठी माणसं काहीतरी करीत राहतात पण शीरनानाला स्वतःची प्रसिद्धी कधी करावीच लागली नाही. गावातील एक ना एक माणूस शीरनानाच्या पोथ्या एकसारख्या वाचत असायचा. शीरनानानी आज हा प्रताप केला, शीरनानानी आज त्या लग्नाची धूळधाण उडवली, त्यातल्या किती खऱ्या आणि किती खोट्या ते सांगणाऱ्यालाच माहित, पण ते ऐकत असताना शीरनानाला पाहिलेल्या व्यक्तीला डोळे झाकून ऐकीव गोष्टींवर विश्वास बसेल असा तो आडवा तिडवा वाढलेला देह. या प्रचंड देहाची तुलना २ हत्तींना मिळून एक माणूस अशीच केली जायची.

तशी शीरनानाची गप्पांचा फड मारण्यासाठी ठरलेली जागा म्हणजे देवळाजवळचा पार. पण उन्हाळ्यात जसा आंब्याचा हंगाम चालू व्हायचा तसा शीरनानाचा मुक्काम वस्तीपासून थोड्या अंतरावर टेकडाखालील उतारावर असलेल्या त्याच्या मालकीच्या आंब्याच्या झाडाखाली यायचा. ते आंब्याचे झाड म्हणजे दोन झाडांनी एकमेकांना बांधल्यासारखे चिटकून उभे होते अगदी शीरनानसारखं अवाढव्य. अन त्या आंब्याच्या झाडाची मालकी शीरनानाचीच होती. तशी आंब्याची काही कमी नव्हती वस्तीवर, अमाप आंब्याची झाडं होती, पण वेळ न जाणाऱ्या माणसाला काहीतरी काम हवेच आणि ते गरज नसताना त्याची रखवालदारी देखील. थोडक्यात, अथांग पसरलेल्या समुद्रातील पाणी कोणी चोरू नये म्हणून लक्ष ठेवायला एखादया रखवालदाराची नेमणूक करावी तशी शीरनानाची अवस्था वाटायची. बरं, तसंही टारगट पोरांनी ठरवून हल्लाबोल जरी केला तरी शीरनाना जाग्यावरून बूड न हलवीता दगड मारण्याखेरीज काहीही करू शकत नव्हता. ताड्कन उठावं अशी शरीरयष्टी शीरनानाला लाभलेली नव्हती. पण त्याच्या आवाजाची जरब भल्याभल्याला जागेवर खिळवून ठेवणारी होती. तसा शीरनानाचा स्वभाव खूपच मस्करी होता, एखाद्या वेळेस हसायला लागला तर त्याच्या गडगडाटी हसण्याने समोरचाच्या पोटात भीतीने गोळा यायचा, हसता हसता शीरनानाचा जीव जातोय कि काय असं समोरच्याला वाटायचं एवढा तो गदगदून हसायचा. ज्याने शीरनानाची जीभ आपल्या लहानपणी पाहिलेली होती ती त्याच्या तरुण वयात येईपर्यंत अगदी तशीच्या तशीच होती, स्ट्रॉबेरी सारखी लालेलाल. कारण शीरनानाच्या तोंडातलं आणि चंचीमधलं पान कधीच संपायचं नाही. गप्पांचा फड जमल्यावर बोलताना त्याच्या तोंडातून तो साठलेला पाचकरस, समोर बसलेल्याच्या तोंडावर आणि स्वच्छ धुतलेला पांढऱ्या सदऱ्यावर एम एफ हुसेन सारखं आडवा-तिडवा चित्रकारी करीत असायचा. एखादी गोष्ट जरी पटली तरीही समोरचा टाळी दयायला हात पुढं करायला घाबरायचा कारण ओठांमधून गळणाऱ्या सुपारीयुक्त पाचकरसाला शीरनाना कधी पुसून त्याच हाताने समोरच्याला टाळी देईल याचा नेम नसायचा. शीरनानाच्या गप्पांमध्ये एक प्रकारची जादू होती एकदा का त्यांची बारामती पेसेंजर सुरु झाली कि ती अगदी छोटे छोटे स्टेशन घेत थेट दौड स्टेशन गाठायची आणि बराच वेळ थांबायची. अगदी तसच शीरनाना अदमास घेत घेत मध्येच थांबत आणि लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून पुढील किस्सा सांगत. लोकांची हसून हसून पुरे वाट लागायची, एखादा किस्सा चुकू नये म्हणून परसाकडे जायची नितांत गरज जरी एखाद्याला झाली तरी तो जाग्यावरून उठायचा देखील नाही इतकी जादू होती शीरनानाच्या गप्पांमध्ये. आणि त्यातुनही एखाद्याने शीरनानाला त्याची खविसासोबत झालेली कुस्तीची आठवण करून दिली कि मग भीतीने दोन चार जण एकमेकानसोबत लघवीला जायला देखील घाबरायचे, काय घ्या डेरिंग करून गेलोच आणि अचानक खवीस समोर आलाच तर, झाली का मग ओली.

तर शीरनानाचा खविसासोबतच्या कुस्तीचा किस्सा आत्तापर्यंत अनेकदा ऐकून झाला होता तरीही एखादा नवीन पाव्हणा गावात आला आणि रात्रीभर रंगत जाणाऱ्या गप्पांच्या फडामध्ये सामील  झाला तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा त्या किश्याची उजळणी व्हायची. गप्पांमध्ये एखादा मध्येच शीरनानाला बोलायचा ‘नाना...आमच्या या पाव्हण्याला तुमची खविसासोबत झालेल्या कुस्तीबद्दल सांगितलं तर या गड्याला खरंच वाटनासं  झालंय’ आणि मग शीरनाना दीर्घ उसासा टाकायचा, पाव्हण्याकडं एकवार बघायचा अन मग शांतपणे आपली चंची उघडायचा त्याच्या या चालणाऱ्या शांत प्रक्रियेवरून इतरांच्या लक्षात यायचं कि नानाची किस्सा सांगायची सुरुवात होणार. मग हळुवारपणे उघडलेल्या चंचीमधून एक एक जिनसा बाहेर यायच्या, पान, चुना, कात या सगळ्याचं मिश्रण होवून तोंडात जाईपर्यंत पाव्ह्ण्याव्यतिरिक्त बाकीचे आपापली नैसर्गिक कार्य उरकून येई कारण त्यांना माहित होतं कि समजा मध्येच जोरात आली तर उठायची आणि अंधारात जायची कोणाचीच हिम्मत होणार नाही. मग शीरनाना अडकित्त्याने सुपारी कातरत पुन्हा एकवार पाव्हण्याकड बघायचा, सुपारी कातरून पाव्हण्यापुढं हात करायचा. पाव्ह्ण्याने घेतली तर ठीक नाही तर सगळी सुपारी तोंडात जायची. इतर सगळे जण ऐकलेला किस्सा असून देखील नव्याने ऐकतो अश्या अवस्थेमध्ये शीरनानाकडे बघत कधी एकदाचं सुरु होतंय अश्या नजरेने पहायचे. एखादया भुताच्या चित्रपटामध्ये जशी भूत येण्याआधी वातावरण निर्मिती केली जाते अगदी तशीच  वातावरणनिर्मिती शीरनाना करायचा. मग जसा पहिल्या पिचकारीचा अर्धा अधिक पाचक रस घशातून पोटात आणि अर्धा बाहेर टाकला जायचा तेव्हा सगळ्यांना खात्री पटायची कि आता सुरुवात होणार. पुन्हा एकवार पाव्हण्याकड बघून अंधारात एकटक बघत शीरनाना सुरु व्हायचा  “तर पाव्हणं, लई दिस झालं त्या गोष्टीला. नव्यानं लग्न झालेलं अन सासऱ्याकडची पयलीच यात्रा. सासऱ्यान सोता येवून म्हातारीला यायला इनंती केली पन म्हातारीनं नाय म्हणून सांगितलं. तिचा जीव निगाना घरातून मग मला जा म्हणाली. मला नाय पन बोलता यायना, सासरा गरीब हुता स्वभावानं, म्हंटला येतू तुम्ही जावा लेकीला घेऊन. मंग मी गेलू दोन दिसांनी तर सासू अन सासरा लय खुश झालं, सासऱ्यान आदीच बोकाड कापलेलं हुतं. मंग म्या आपला सुरु झालो नेमिपरमान, लेका, वाडपी चक्कर येऊन पडतोय का काय असं वाटत हुतं. बाजूला बसलेली लोकं येक नाय तर दोन भाकरी खावून उठाय लागलं पन म्या कसला हलतोय जाग्यावरन. माज्याकडं बगून लोकं कायबाय बोलायला लागली तवा सासरा लागला वाढायला. येकसारखा त्याला असा वाकाया लागतंय बगून म्या मनात म्हटलं बास्स झालं, आपल्यामुळ त्या बिचारयाचं कशाला हाल. उशीर झालेला अन अंधार पडाय सुरवात झाली तसा माजा जीव लागला वर खाली व्हायला, एक तर म्हातारी एकलीच घरी, तसं गडीबी हुतं पण शेवटाला नोकर मानसंच   ती बी. बायकुला सांगितलं कि मला काय चैन नाय पडायची हितं. तवा म्या निगतो हे आयकून सासऱ्याला वाटलं कि त्याच्याकडून काय कमी ज्यास्त झालंय का काय म्हणून ते लागलं हात जोडाय. म्या सांगितलं मामा आवो तसं काय न्हाय, येकतर म्हातारी यकलीच घरी तवा तिला सोडून म्या नाय राहू शकत. आता निगालो तर पोचल लवकर. कशीबशी समजूत काडून निगालो. पायाखालचा रस्ता, निगालो ताडताड करत. अंधार पडलेला पन चांदण्याच्या उजेडात आपला नेमिपरमान चलत होतू पन जशी आपल्या गावाची वेस ओलांडून आत यायला लागलो तसं कोनी तरी पाटीमागून येतंय असं वाटाय लागलं. वळून पायलं तर कोनीच दिसना. मग म्याच ओराड्लू, मायला तुज्या, दम असंल तर भायीर ये. पन कोनीच दिसना म्हणून समूर पायलं तर एक गडी उबा, हयो ताडमाड उच, माज्याउन चांगला तब्यतीन पयल्वान गडी. मला बगून म्हनतोय कसा ‘लेका, तू यकलाच प्वाट भरून मटान खावून आलास व्हय. मला बी मटान पायजे.’ म्या म्हटलं ‘आरं, मटान म्या काय खिशात भरून फिरतोय का काय? जा तिकडं माज्या सासुरवाडीला तिकडं बोकाड काप्लाय’ म्या सांगुस्तोवर गडयानं टाकला कि माज्यावर पैलवानी डाव. म्या मानगूट सोडवलं आणि दिला त्याला बी हिसका, तसं ते लागलं येड्यावानी वरडायला. उबा राह्यलं अन कसनुसं त्वांड करून हसायला लागलं. म्या म्हनल ‘आई निजव्या, हो बजूला. मला उशीर होतोय घरला जायला’ तसं ते म्हणालं ‘मटान तरी दे नाय तर मला कुस्तीत तरी हरव’ मग माजं बी डोस्कं सरकलं. म्या जवा त्याचं मानगूट पकडायला हात टाकला तसं ते समूरनं पशार. मागनं हसायचा आवाज आला तर मागं वळून पायलं तर हे बेणं माग उब होतं. पुन्यांदा डाव टाकायला गेलो तर गायब. परत मागून हसायचा आवाज आला, तर ह्यो मागं उबा. मंग माजं डोस्कंच सरकलं, त्याला म्हनलं ‘खऱ्या आय बापाचा असंल तर समूर ये. ह्यो कसला रडीचा डाव खेळतूयास ’ तसं त्यानं मागनं येऊन माजं मानगूट पकडलं आणि मला उचलून आपटला कि ढेकळात. मंग म्हनल कि आता याची काय खैर नाय गड्या आज. ढेकळातून उठलू, उचलला त्याला अन आपटला खाली. तसं ते पुन्यांदा लागलं येड्यागत वरडायला अन उठलं कि कसनुसं हसायचं. मग पुन्यांदा त्यानं मला उचललं अन दिलं कि लांब फेकून मुरमाच्या रानात, कम्बरड मोडलं काय असं वाटाय लागलं. कसबसा उठलू अन पळत जावून पलटवर दिला अन दिलं फेकून त्याला मुरमाच्या रानात. ते पुन्यांदा हसायला लागलं अन  म्हनाला ’ लय वरसांनी  खरा गडी भेटला आज मजा येणार’ असं म्हणून दिला कि मला टोला. भेलकांडत म्या पडलो खाली तसा माज्या उरावर बसला माजा इस्वास लागला कि कोंडायला. म्या बी त्याला धोबीपछाड टाकला त्याच्या मांड्यात हात घालून पलटवर केला अन बसलू त्याच्या उरावर. तसं ते बेणं पुन्यांदा हसायला लागलं कसनुसं. असं किती येळ चाललं हुतं कुनास ठाव. पन जसं तांबडं फुटाया लागलं तसं त्या बेण्यानं माज्या तावडीतून सुटका करून घेतली आणि दिलं मला ढकलून, खाली पडल्यावर माज्या डोळ्यात फुफाटा गेल्यामुळ काईच समजलं नाय. डोळे चोळत उबा राह्यलो अन समूर बगितलं तर ह्यो गडी गायब. कुटं गेलं म्हणून इकडं तिकडं बगाय लागलो तर कुटंच दिसना. अन तेवड्यात माज्या डोळ्यासमोर अंधारायला लागलं, कसं तरी समूर पायलं तर चार पाच लोकं पळत येत हुती. ती जवळ येत्यात न येत्यात तवर म्या पडलो खाली. कुनी तरी वरडत हुतं आरं शीरनाना घावला इथं. मग नंतरचं मला काईच आठवाना अन जवा डोळा उगडला तवा म्हातारी डोक्याजवळ बसलेली दिसली, उटाय लागलू तर अंगात अजिबात ताकत नव्हती. डोक्यावर पाण्याची पट्टी लावलेली, सगळं अंग सुजलेलं हुतं. वस्तीवरची लोकं वसरीवरच बसून हुती. मग म्हातारीनं सांगितलं कि म्या दोन रोजापास्न बेसूद पडून होतो. कुन्यातरी करणी केली माज्यावर म्हणून म्हातारी ऊर बडवून घेत हुती. जसा सुद्दीवर आलो तसा तीच्या जीवात जीव आला. माज्या कपाळाला कसला तरी बुक्का लावत चिमुटभर बुक्का पाण्यात टाकून मला पाजलं अन म्हणाली माजा शीरनाना सुद्दीवर येवूदे मग म्या तुला कोंबडं कापन. अन  म्हातारीनं म्या सुद्दीवर आल्याचं बगितल्यावर खरंच कोंबडं कापलं अन वेशीपाशी नेवून टाकलं. अन मला त्यानंतर वाईच फरक पडाय लागला. जवा म्या सगळ्यांना काय अन कसं घडलं हे सांगितलं तशी सम्द्यांची खात्री पटली कि म्या खाविसाबरुबर कुस्ती खेळलो. अन त्यातला त्यात माज्यात रग हुती म्हणून म्या रात्रभर लढलो अन तांबडं जसं फुटलं तसं खवीस उजेडाला घाबरून पळालं.’ हे सगळं सांगतल्यावर शीरनाना पावण्याचा अदमास घ्यायला थोडा थांबायचा. पाव्हणा आपलं मानगूट खाविसानं मागून पकडाय नको म्हणून अंग चोरत गर्दीत बसलेला ही कहाणी ऐकून कसाबसा भानावर यायचा आणि दोन्ही हात जोडून शीरनानाला साष्टांग दंडवत घालायचा. मग शीरनाना उशीर होतोय म्हणून सगळ्यांना आपापल्या घरी निघायला सांगायचा. पारावरून लोकं मग भीतीनं गटागटाने घरी जायची आणि जी शीरनानाच्या घराजवळपास राहायची ती खाविसाच्या भीतीनं शीरनानाला खेटून खेटून चालायची. शीरनाना त्यांची उडणारी तारांबळ बघून गालातल्या गालात हसायचा चालता चालता मध्येच थांबायचा अन अंधारात उगाच एकटक बघत ‘कोन हाय रं तिकडं’ असं म्हणायचा मग खेटून चालणारी हे ऐकून खवीस दिसल्यासारखी शीरनानाच्या कडेवर टुणकरून उडी मारून बसायची बाकी रहायची. एवढी कहाणी ऐकल्यावर प्रत्येकाला आपलं मानगूट कोणीतरी पकडतंय असा भास वाटायचं. भीती इतकी असायची कि वस्तीवरच्या लोकांन सोबत पाव्हणा देखील अंधारात परसाकडे जायला टाळाटाळ करायचा.

लग्न समारंभ आणि शीरनाना याचं अतूट नातं होतं. लग्नातल्या जेवणावळीत सगळ्यात आधी बसलेला आणि सगळ्यात शेवटच्या पंक्तीला उठलेला अनेकांनी शीरनानाला पाहिलेलं आहे. एखादा वाढणारा वाढपी नवीन असेल तर तो घाम गाळून कमरेत लकवा भरेल इतक्या वेळेस वाकून बेजार व्हायचा आणि शेवटी भरलेलं भांडं समोर ठेवून ‘काका, तुम्हाला हवं तसं घ्या’ असं प्रेमळवजा आग्रह करायचा. त्यातल्या त्यात एखाद्याने वाढताना थोडा आडता हात घेतला तर शीरनाना त्याला तत्वज्ञान सांगायचा  ‘बाबारे...अन्न हे संपूर्ण ब्रम्ह आहे, तवा नंतरची चार माणसं उपाशी राहिली तरी चालल पण समूर बसलेल्या माणसाचं ताट कवापन मोकळं राह्यालं नाय पायजे..आरं असा गीते मंदी लिवलंय” असं बोलल्यावर वाढपी अर्ध निम्मं शीरनानाच्या  ताटात ओतायचा. शीरनाना गालातल्या गालात हसत ‘ आरं.. आरं...बास झालं..बाकीच्यांना पन वाईच असू दे’ असं म्हणायचं. बरं शीरनानाच्या अजब तत्वज्ञानानुसार गीतेच्या कोणत्या अध्यायात असं लिहिलेलं आहे हे गीता लिहिणाऱ्याला देखील शोधून सापडायचं नाही. पण शीरनानाची अवाढव्य पसरलेली ढेर पाहिल्यावर ब्रम्हांडाची निर्मिती करताना आणि त्यातल्या त्यात पृथ्वीची निर्मिती करताना ब्रम्हाला जेवढे प्रचंड कष्ट पडले असतील त्याहून कित्येक पटीने जास्त शीरनानाला कष्ट पडलेले असतील यामध्ये काहीच वाद किमान गावकऱ्यानमध्ये तरी नसावा. पण या सगळ्यामुळे पंक्तीतल्या इतर लोकांची भरपेट करमणूक मात्र व्हायची, आजूबाजूची लोकं उठून जायची पण शीरनानाच्या न गप्पा संपायच्या ना पत्रावळीमधले अन्न, श्रीकृष्णाने दिलेल्या भांड्यातून जसे वाढताना अन्न संपत नव्हते तसे शीरनानाच्या ताटातील अन्न संपायचे नाही. अन्न वाया जावू नये, उकिरड्यावर टाकायला लागू नये यासाठी लग्नघरातील सगळे अन्न संपले तरी चालेल पण वाया जावूनच द्यायचे नाही या एकाच ध्येयाने शीरनाना खातच राहायचा. सरतेशेवटी एकदाची समाधानयुक्त ढेकर यायची, ढेकाराचा आवाज जणू काय कडकडून वीज पडावी असाच यायचा तो ऐकून लग्नघरातील लोकांचा जीव मग भांड्यात पडायचा. न जेवता देखील ५ ते ६ आडदांड लोकं जिथं शीरनानाला उठवायला लागायची तिथे त्याने जेवण केल्यावर किती लागावीत याचा अंदाज केलेलाच बरा. जेवण झाल्यावर शीरनानाचा मोर्चा मग पाराकडे वळायचा जिथे आधीच बैठकीत बसलेल्यांमध्ये शीरनानाचीच चर्चा चाललेली असायची पण शीरनाना येताच विषय बदलला जायचा, हे शीरनानाला देखील माहित होतं. पण तो कधीच असल्या गोष्टींवर चर्चा करीत बसला नाही. तो पारावर बसायला आलेला पाहून आपण चेंगरून जावू नये म्हणून काही लोकं आधीच जागा मोकळी करून द्यायची, अश्यावेळेस भीतीयुक्त आदर म्हणजे काय याची पुरेपूर प्रचीती यायची. मग पानासोबत गप्पांना देखील रंग चढायचा. शीरनानानी आत्तापर्यंत कुठेकुठे जेवणावळीचा धुव्वा उडविला याच्या सुरस कथा ऐकायला म्हाताऱ्यानसोबत तरणी पोरं आणि शाळेतील लहानसहान पोरं सुद्धा जमा व्हायची. तिकडं नवऱ्यामुलीची सासरी पाठवणी होत असताना होणाऱ्या रडारडीच्या आवाजापेक्षा इकड पारावर शीरनानाच्या गडगडाटी हास्याचा आवाज प्रचंड व्हायचा. अश्या रडारडीत कोण हसतंय म्हणून नवऱ्या मुलांच्या नातेवाईकांमध्ये चर्चा व्हयाची पण गावकऱ्याना या सगळ्या गोष्टींचा अनुभव असल्याने त्यांना याचे काहीच वाटायचे नाही. मग त्या गडगडाटी हास्यातच नवरीची पाठवणी केली जायची. जसजसा अंधार पडायला लागायचा तशी मग शीरनानाची घरी जाण्यासाठी चुळबूळ वाढायला लागायची. एका दोघांच्या खांद्यावर हात रेलून उठाच्या त्याच्या तयारीने लोकं बुड न झटकता टुन्नदिशी उडी मारून पाराखाली येत. एवढ्यात कोणी थांबवायला लागल्यावर, शीरनाना त्याला ‘आरं मर्दा, भाकर तुकड्याची येळ झाली. जर असाच बसून राहिलो अन चक्कर आली तर तू उचलून नेणार आहेस का घरी?” असं बोलल्यावर समोरचा माणूस गपगार व्हायचा, शीरनानाला उचलून नेण्याच्या कल्पनेनं नाही तर त्याच्या लगेच झालेल्या जेवणाच्या तयारीने.

परमेश्वराच्या कृपेने शीरनानाच्या घरी कोणत्याच गोष्टीला कमी नव्हतं, चांगली वीस एकर बागायती अन ती कसायला सालानी ठेवलेली गडी माणसं, लिंबोणीची बाग, आंब्याची बाग, दुभत्या गाया, घरात भरून वाहणाऱ्या धान्यांच्या कणग्या आणि बायकोसोबत त्याची ८ पोरांची छोटीशी टीम, आणि शीरनानाची म्हातारी आई. म्हातारी फक्त नावाला होती पण चाळीशीच्या बाईला लाजवेल अशी कामात तरबेज होती. आणि त्याची साक्ष म्हणजे म्हातारीचा एकही दात पडलेला नव्हता. म्हातारीचा शीरनानावर भारी जीव, एकुलता एक म्हणून त्याचे म्हणतील तितके लाड पुरवले होते. शीरनानाला कष्ट असे तिने कधीच पडून दिले नव्हते. त्यामुळे शीरनानाच्या लग्नात तीने नवरीच्या आई बापाला आधीच ठणकावून सांगितला होतं कि आम्हाला हुंडा एक छदाम मिळाला नाही तरी एक वेळेस चालेल पण मुलगी धडधाकट पाहिजे. आणि शीरनानाच्या नशिबाने त्याला एकदाची त्याच्या बरोबरीची मुलगी मिळालीच. लग्न ठरविताना म्हातारीने आधीच सांगतले होते कि, माझा सोन्या एकुलता एक, पण घरात बाळ गोपाळांची रांग लागली पाहिजे. शीरनानाच्या ८ पोरांना बघून त्याची खात्री पटावी. म्हातारी असे पर्यंत शीरनानाला घरात कधीच लक्ष दयावे लागले नाही. तो आपला कधी पारावर, कोणाच्या लग्नात, गावच्या बैठकीत नाही तर रानात त्याच्या जुळ्या आंब्याच्या झाडाखाली बसलेला असायचा. पण जशी म्हातारी एकदा अंथरूणाला खिळली तसा शीरनाना निम्मा अर्धा झाला, म्हातारीला देखील तीचा शेवट दिसतच होता पण जीव काही सुटत नव्हता. शीरनाना तिच्या डोक्याजवळच बसून होता. शेवटी शीरनानाची बायको पुढे झाली आणि म्हातारीला वचन दिलं कि तुमच्या मागं अगदी तुमच्या सारखीच शीरनानाची काळजी घेईल. या वाक्यासरशी म्हातारीच्या जीवात जीव आला इतके दिवस पडून राहिलेली म्हातारी उठून बसायचं म्हणाली. लोकांमध्ये चुळबूळ सुरु झाली कोणाला काहीच समजेना. शीरनानाचा हात हातात घेवून म्हातारीने लहानमुलाच्या तोंडावरून प्रेमाने हात फिरवावा तसा शीरनानाच्या तोंडावरून हात फिरवला. म्हातारीच्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर एक समाधान पसरलं, तिनं सुनेचा हात हातात घेवून प्रेमाने तिच्याकडे पाहिलं आणि डोळ्यांनीच, माझ्या पोराचा सांभाळ कर असं तिला सांगितलं. सुनेने पण म्हातारीचा हात दाबत हमी भरली. त्यासरशी म्हातारीने बसल्या जागीच समाधानाने शीरनानाकडे बघत डोळे मिटले. शीरनाना कीतीतर वेळ एकटक म्हातारीच्या तोंडाकडे बघतच राहिला त्याच्या मनात म्हातारीचा डोळा लागलेला असेल पण म्हातारीचा जीव समाधानाने शरीरातून कधीच निघून गेला होता. म्हातारीने शेवटी आपला शब्द खरा करून दाखवला होता, या जन्मात कधीच आडवं पडून मरणार नाही तर बसल्या जागी शेवटचे डोळे झाकल. शीरनानाला रडूच फुटत नव्हतं कारण म्हातारी गेली यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. शेवटी त्याच्या बायकोने शीरनानाचा हात हातात घेवून म्हातारी आता आपल्यात राहिली नाही म्हणून मानेने खुणावलं तसं शीरनानाच्या चेहऱ्यावरचा रंग बदलत गेला. आज पर्यंत शीरनानाला रडणे म्हणजे काय हे माहीतच नव्हतं, लहानमूल जसं आई समोर दिसत नसल्यावर धायमोकलून रडायला लागतं तसा शीरनाना रडायला लागला. सगळ्या गावाला त्याच्या रडण्याला कशाची उपमा दयावी सुचत नव्हतं. आजपर्यंत गडगडाटी हास्य अनुभवलेल्या गावकऱ्यांच्या डोळ्यात शीरनानाच्या या रडणाऱ्या रुपाकडे पाहून रडू कोसळ होतं. फक्त बायामाणसंच नाही तर गाडीमाणसं सुद्धा रडायला लागली होती. बायकोच्या गळ्यात पडून आईचा हात हातात घेतलेल्या शीरनानाकडे पाहताना, एका आईकडून दुसऱ्या आईकडे लहान पोरगं सोपवतीये असं चित्र दिसत होतं. अख्ख्या गावात स्मशान शांतता पसरलेली होती सगळा गाव शीरनानाच्या घरापाशी त्याचे सांत्वन करायला लोटलेला होता. जो तो शीरनानाची समजूत काढत होता कायम हसताना पाहणाऱ्या शीरनानाला रडताना पाहून समोरच्या माणसाच्या डोळ्यात आपोआप पाणी येत होतं. ते पूर्ण १३ दिवस सगळा गाव शीरनानाच्या भोवतालीच असायचा, सगळे असून सुद्धा शीरनाना आपला शून्यात एकटक बघत बसायचा. लोकांना त्याच्या या अवस्थेचं खूप जास्त वाईट वाटत होते. त्यानंतरचे बरेच दिवस शीरनाना ना पाराकडे वळला ना कोणाच्या कार्यक्रमाकडे. आणि त्याच्या अनुपस्थितीने कोणत्याच कार्यक्रमाला रंगत चढत नव्हती इथेही शीरनानाचीच चर्चा व्हयाची पण यावेळेस त्याच्या खाण्याबद्दलची नाही तर त्याच्या दुःखाची.

जसे दिवस सरत गेले तसं शीरनानाने स्वतःला सावरलं आणि एके दिवशी त्याची पावले पुन्हा पाराकडे वळली. त्याच्या येण्याने सगळेच सुखावले. परंतु शीरनाना आता पहिल्यासारखा राहिला नव्हता, त्याच्या वागण्याबोलण्यात एक प्रकारची गंभीरता आली होती जी कोणालाच हवीशी नव्हती. अशातच सगळ्यांनी ठरवल्याप्रमाणे नाटक सुरु केले. तुक्या म्हणाला ‘पोराचं लग्न झालंय  तवापास्न लयीच वंगाळ घडाय लागलंय. काय मेळ लागाना असं झालंय’ तेवढ्यात सदा बोलला ‘आरं तू अडाणी तर अडाणीच राहणार लेका. लग्न झालं खरं पण तू अजून जागरण गोंधळ कुठं घातलंय लग्नाचं, भैरुबा मग असाच तुज्यावर नाराज हुनार. तवा पयल्यांदा जागरण होवू दे अन ते पण तिखटाचं. मग बघ सगळं कसं काय सुरळीत होतंय ते. काय वो शीरनाना....’ सगळ्यांचा होरा होता कि, जेवणावळ होणार आणि ती पण तिखटाची म्हंटल्यावर शीरनाना उभी मांड ठोकून तयार होणार. पण घडलं भलतंच, शीरनाना खाली मान घालून बसल्या जागेवरून कसाबसा स्वतःला सावरत उठायला लागला तसा एका दोघांनी आधाराला आपला खांदा पुढं केला पण शीरनानाने दुर्लक्ष करत सगळा भार आपल्या तळहातावर पेलून उभा राहिला आणि पारावरून उतरून घराकडं निघाला. सगळी एकदम चिडीचूप झाली, कोणाचाच आवाज बाहेर पडणं असं झालं. एवढ्यात सदानं आवाज दिला ‘ शीरनाना...काय झालं? अन तुकाच्या जागरणाचं काय करायचं?” चालता चालता शीरनाना थोडा थबकला आणि मागं वळून घोगऱ्या आवाजात बोलला “गड्यानू, आता पयल्यासारखी जागराणं सहन नाही होत....” असं बोलून पुन्हा घराकडं जायला वळला. तसा पारावरच्या लोकांच्या श्वासासोबत झोंबणारा वारा देखील काही काळासाठी स्तब्ध झाला.   

क्रमश....  

-सुरेश सायकर

Wednesday 10 December 2014

माझं एक गाव आहे….



माझं एक गाव आहे, म्हणजे स्वतःच आहे असंच म्हणावं लागल ?
कारण मी अगदीच वर्षातून एखाद-दुसऱ्यांदा जातो,
कारणं अनेक असू शकतील परंतू महत्वाचे म्हणजे पोट आहे,
तसं गावात राहणाऱ्यांना पण असतं,
पण आमची भूक काही वेगळीच आहे, आमचे पोट कधीच भरत नाही,
नेहमी त्यात काहीतरी टाकावंच लागतं....

गाडीतून जाताना स्वतःच्या रानात उगवलेली बाभळीची झाडं पहिली,
शहरातल्या माणसाला ती पेरणी करून अन निगा राखून जगवलेली वाटावी,
इतकी दाट आणि पूर्ण रानात पसरलेली होती,
वाटलं गाडीतून उतरावं आणि सरळ कुऱ्हाडीचे घाव घालून तोडून टाकावीत,
कुऱ्हाडीला धार होती पण घाव घालण्याचे बळ कोठून आणणार,
ते बळ तर शहरात राहून बीळबिळीत झालं होतं.....

वडील म्हणायचे शेवटचे दिवस सुखात घालवणार स्वतःच्या रानात राबत-राबत,
पण शहरातून त्यांची सुटका झाली पण ती जीव गेल्यावरच,
स्वतःच्या रानात फक्त सरणावर देह जळत होता ज्याला स्वतःच असं काहीच माहित नव्हतं,
स्वतःच्या रानात जळण्याचे सुख देखील....  

माझी पण इच्छा आहे, शेवटचे दिवस सुखात स्वतःच्या रानात कष्ट करून व्यतीत करायची,
दंडात फक्त दिसणाऱ्या  बेट्कुल्यांची  परीक्षा घ्यायची,
बहुतेक ती देखील पूर्ण होईल, पण शहरातून सुटका झाल्यावरच....वडिलांसारखी

-सुरेश सायकर