Friday 28 December 2018

बॉडी...

स्मशाना जवळून वाहणाऱ्या नदीने
आत्तापर्यंत शेकडो टन
हाडांपासून बनलेली राख
आणि
अर्धवट जळून उरलेली काही हाडं
घेतलेली आहेत
आपल्या पोटात
सोबत खरपूस वास येणारी 
जळालेल्या लाकडांची
उरलेली राख....

ती मूक साक्षीदार असते
या सगळ्या घटनांची
ती वाहताना बोलत असते
पण आपल्याला ऐकू येते ती,
फक्त
खळखळ.... 

नातं एकदमच बदलतं
जिवंतपणीचा काका,मामा,आप्पा
मेल्यावर एकदम गायब होतो
मेंदूमधून
छोट्याश्या स्क्रीनवरून
नंबर डिलीट व्हावा तसा
नातेवाईकांना फोन लावताना
मग आपसूक तोंडातून बाहेर पडतं,
डॉक्टरांनी,
बॉडी लवकर हलवायला सांगितलीये....
  
जगताना
जसा आधार हवा असतो
तसा
मेल्यावरही हवा असतो
नाही तर मृत शरीर जळताना
कोणतीच जिवंत बॉडी
उभी राहिली नसती
कवटी फुटायची वाट बघत
लाकडाचा आधार असतो
म्हणून तर जळतं मृत शरीर
व्यवस्थित
दुसऱ्या दिवशी सावडायला...
  
भारीच आहे ना,      
जेव्हा झाड जिवंत असतं
तेव्हा त्याला झाड म्हणतात
आणि तोडलं कि
लाकूड
माणूस जिवंत असताना माणूस म्हणतात
अन
मेल्यानंतर
बॉडी...

- सुरेश तुळशीराम सायकर