Monday 9 December 2013

‘आम’ ते ‘आप’

व्यक्ती जोपर्यंत ‘आम’ असते तोपर्यंत ती तुमच्यासाठी नेहमी तत्पर असते पण तीच जेव्हा ‘आप’ होते तेव्हा त्याच्या वागण्याचा रोख बदलतो आणि लोकशाही क्षणात हुकुमशाही मध्ये बदलून जाते. खरं तर या गोष्टीला असे होण्यासाठी काळ किती लागतो याही पेक्षा ती कशी बदलत जाते याचा प्रवास खरंच विलक्षणच असतो. अश्या बदलांना पूरक असणे हा खरा तर मानवी गुणधर्मच आहे जोपर्यंत तुम्ही कार्यकर्ता असता तोपर्यंत 'सामान्य' आणि एखाद्या ग्रुपचा लीडर किंवा नेता बनता तर लगेच 'असामान्य'. गोष्टी एका निकालावरून लगेचच बदलत जातात्त. सोडून गेलेल्यांना आपल्या पुण्यायीच्या जोरावर मिळाले असे वाटते आणि परतीचे दोर स्वतःच तोडून टाकलेले असल्याने आंतरिक हाव असूनही वळता येत नाही. आणि मग सोबत गेलो असतो तर तिथली गरम हवा आपल्याला पण चाखायला मिळाली असते असं मनोमन वाटायला लागते.      

जेव्हा तुम्ही स्वतःचा एखादा व्यवसाय सुरु करता तेव्हा माणसं जोडताना जिभेवर नेहमी मध ठेवून असता. जेव्हा भरभराट होते, थोडक्यात जेव्हा तुम्ही ‘प्रस्थापित’ होता आणि सुरुवातीच्या शिलेदारांची किंमत असून नसल्यासारखी जेव्हा वाटू लागते तेव्हा त्यांना क्षणात ‘विस्थापित’ करण्यास तुम्ही अजिबात धजावत नाही. याला कॉर्पोरेट भाषेमध्ये ‘डोंट टेक इट पेर्सोनली’ असं बोलून बोळवण केली जाते. तसेच दुसऱ्या अर्थाने कॉर्पोरेट मानले जाणारे क्षेत्र म्हणजे ‘राजकारण’ यामध्ये देखील गणितं एका क्षणात बदलून जातात ‘जिकडे हवा तिकडे पूर्व दिशा’ अशी प्रवृत्ती अनेकदा आढळून येते ‘राजकारणामध्ये कोणी कोणाला अस्पृश्य नसतो’ असे म्हणून मांडीला मांडी लावून मग पुढची नांदी सुरु होते.

हे सुद्धा अगदीच खरं आहे, कोणी कोणाला अस्पृश नसतोच. आणि मग यातूनच 'तुला थोडे' आणि 'मला थोडे' अशी अपप्रवृत्ती वाढायला लागते आणि न वाढवणारयांच्या वाट्याला येतो तो एकतर वनवास किवां स्वर्गवास.


-सुरेश सायकर