Wednesday 22 July 2015

फकीर...



आईला कामावर सकाळी बरोबर सात वाजता पोहचायला लागायचं. घरापासून कामाचे अंतर लांब असल्याने घाईघाई मध्ये स्टोव्हवर स्वयंपाक उरकून सकाळी सहा वाजताच निघायची. बसने गोखलेनगर पासून शनिपार आणि मग तिथून पायी चालत भवानी पेठत बुरुडगल्ली ओलांडून हमाल पंचायत कष्टाची भाकर केंद्र. सकाळी आईच्या हातचा गरमागरम आणि गोड चहा पिल्यावर पाठोपाठ मी आणि मोठा भाऊ पेपर टाकायला घराबाहेर पडायचो. माझी पेपर लाईन घराच्या जवळच होती, पण पेपर घ्यायला डेक्कनच्या गुडलक चौकात जायला लागायचे.  मग तिथून दीपबंगला चौकातून लाईन सुरु व्हायची मग ओम सुपर मार्केट, सिंबायोसिस कॉलेज असं करत जवळपासच्या सोसायटीमध्ये पेपर टाकून शेवटचा पेपर मुथा चेंबर मध्ये टाकला कि मग तिथून सरळ गोखलेनगर चौकात यायचो. सकाळी साडेसात पर्यंत लाईन टाकून पूर्ण व्हायची. सायकल दुकानामध्ये जमा झाली कि सायकलीला बांधलेली सुतळी सोडवून घ्यायची मग तिथून घराकडे मोर्चा. पेपर मालक एकदाच सुतळी द्यायचा आणि मग तीच सुतळी आपण पेपरलाईन सोडेपर्यंत वापरायची. सकाळी निघताना घरात खिळ्याला लटकवलेली सुतळी खांद्यावर टाकून भाड्याने सायकल घ्यायला सायकलीच्या दुकानात जायचो. एखादा यंत्र कामगार जसा आपले हत्यार घेवून जातो तसाच काहीसा अवतार असायचा. पेपर पडू नयेत आणि व्यवस्थित राहावेत म्हणून पेपरच्या गठ्ठ्यासोबत येणारे ब्राऊन कलरचे जाड पेपर सायकलच्या ह्यांडेल वर बांधून मग त्यावर इंग्लिश पेपरची पुरवणी बांधायचो आणि मग त्यावर लाईनचे पेपर. माझ्या शिवाय दुसरा कोणीच पेपरची पुरवणी बांधायचा नाही आणि त्यात इंग्लिश मग तर शक्यच नाही. मला टाईम्स ऑफ इंडियाची पुरवणी खूप आवडायची त्यातल्या त्यात शनिवार आणि रविवारची असेल तर विचारायलाच नको. त्या पुरवण्या इतक्या भारी असायच्या की बोटाने उलगडायच्या म्हंटल तर तेल लागल की काय असं वाटावं इतक्या त्या ऑईली दिसायच्या. आणि त्यात पिक्चरमधल्या हिरो हिरोइन्सचे येणारे फोटो आणि त्याच्या मुलाखती, त्यांच्या कपड्यांच्या नवनवीन स्टाईल, एखाद्या येवू घातलेल्या नव्या पिक्चरमधील फोटो आणि मग तो फोटो बघून मी पूर्ण पिक्चरची स्टोरी अंदाजाने मनात रंगवायचो. रविवारच्या टाईम्समध्ये चार ते पाच पुरवण्या असायच्या मग मी हळूच कोणाचे लक्ष नाही हे बघून ब्राऊन पेपरवर त्या पुरवण्या  बांधायचो आणि लगेच पेपरचा गठ्ठा ठेवायचो. मग सुतळीने तो गठ्ठा व्यवस्थित बांधायला शेळके यायचा, मालक असला तरी सगळ्यांशी प्रेमाने बोलायचा कारण रागावल्यावर एखाद्या मुलाने लाईन सोडली तर आली का पंचाईत अश्या विचारांचा तो मुळीच नव्हता. मुळातच शांत पण चिडल्यावर सौम्य भाषेत समोरच्या मुलाची बोलण्यात चड्डी उतरवायला कमालीचा हुशार होता. माझ्यासोबत जास्त करून वडारी समाजाची मुलं होती त्यामुळे ती आपआपसात वडारी भाषेत बोलायची आणि शेळकेची टर उडवायची. त्यांच्या सोबत राहिल्याने मला देखील वडारी भाषेचे थोडेफार ज्ञान व्हायला लागले होते. शेळकेच्या डोक्यावरची केसं उडून गेल्याने त्याला मुलं ‘टकल्या’ असं त्याच्या उपरोक्ष म्हणायची. तर मला चहा आवडतो हे शेळकेला माहित असल्याने मला दोनदा कटिंग चहा मिळायचा पहिला म्हणजे सकाळी सगळी मुले आल्यावर हातगाडीवरचा आणि बाकीचे मुले गेल्यावर दुसऱ्यांदा मिळायचा तो म्हणजे माझा आवडता गुडलक मधला. पेपरचा गठ्ठा बांधायचा म्हणजे वेगळेच कसब लागते अगदी शेवटचा पेपर राहिला तरीही तो त्या सुतळीने बांधलेल्या जाळीतून बाहेर पडू शकणार नाही इतका व्यवस्थित बांधायला लागतो आणि शेळके तो बांधण्यात एक नंबर होता. नेमकी गोम इथेच होती शेळके माझा गठ्ठा बांधायला आला कि त्याचे लक्ष नेमके तळाला लावलेल्या पुरवण्यांकडे जायचे. मग आरडाओरड करायचा कशाला बांधतोस इतक्या पुरवण्या म्हणून ओरडायचा तरीही मी रोज बांधायचो मग त्याला हळूहळू कळून चुकले कि मला इंग्लिश वाचण्याचे वेड आहे. कालांतराने तोही मग बडबड करायचा बंद झाला. तर सायकल दुकानात जमा करून झाली कि सुतळी खांद्यावर आणि हातात पुरवण्या घेवून घरी यायचो. मोठ्या भावाची पेपर लाईन वेगळी आणि लांब असल्याने त्याला यायला उशीर व्हायचा मग तो पर्यंत मी माझ्या कामाला लागायचो. पहिल्यांदा सगळं घर स्वच्छ झाडून घ्यायचो तो पर्यंत सार्वजनिक नळाला पाणी आलेलं असायचं. मग पिण्याची भांडी साबणाने चांगली घासून भरायचो आणि हे करीत असताना बाजूला स्टोव्हवर चहा उकळत असायचा. मनी मस्तपैक्की शेपटी अंगाभोवती गुंडाळून स्टोव्हच्या बाजूला झोपायची. थंडीच्या दिवसात तर तिची गंमतच व्हायची ती स्टोव्हच्या इतक्या जवळ जावून बसायची कि स्टोव्हच्या गरम वाफेने तिची केसं जळाली तरी तिला समजायचं नाही. मग मला केस जळाल्याचा वास आल्यावर धावत येवून तिला बाजूला सरकवायचो तरीही ती काहीच घडले नाही अश्या चेहऱ्याने तिची ती गोड गुलाबी जीभ बाहेर काढून अंग ताणून आळस द्यायची आणि पुन्हा तिथेच स्टोव्हखाली स्वतः भोवती गोलगोल फिरून पडून राहायची. आईला सकाळी कामावर जायला  उशीर व्हायचा म्हणून मी तिला फक्त स्वयंपाक करून जायला सांगायचो पण तिचा जीव तसं करायला तयार व्हायचा नाही ती शक्य तितकी कामे स्वतः करून जायला बघायची तिची धडपड बघवायची नाही म्हणून मग मीच तिला ओरडून जायला सांगायचो. स्वयंपाक केल्यावर राहिलेली भांडी घासून पालथी घालेपर्यंत चहा चांगलाच उकळलेला असायचा. तोपर्यंत भाऊ यायचा मग स्टोव्हवर त्याला अंघोळीसाठी पाणी गरम करायला ठेवायचो. मनीला तिच्या ठरलेल्या वाटीमध्ये दूध ओतले की ती खाली घातलेली मान दूध संपेपर्यंत वर घ्यायची नाही. दूध संपल्यावर तिथेच बसून तिच्या त्या गोड गुलाबी जिभेने आपल्या मिशा साफ करायची आणि मग उजव्या हाताचा पंजा उचलून जिभेने साफ करायची. हे सगळं झालं की माझ्याकडे बघून डोळे बारीक करून मान पुढे करून बघायची आणि मान झटकायची. हे सगळं झालं की तिच्या ठरलेल्या जाग्यावर जावून पुन्हा मस्तपैक्की ताणून द्यायची. मला तिचा खूप हेवा वाटायचा. वडील वारल्यावर, आम्ही गावी गेलो असता याच मनीने कोणाच्या हातचे अन्न अजिबात खाल्ले नाही की दूध प्यायली नाही. आम्ही साधारण एक ते दीड महिन्याने गावावरून परत आल्यावर मनी आम्हाला आलेलं पाहून कशीबशी घराच्या पत्र्यावरून खाली उतरली. आम्ही वडील गेल्यावर पहिल्यांदाच घरी आल्यावर शेजारपाजारचे जमा झाले होते ते पाहून आईला रडू आवरेना मी आणि भाऊ देखील रडत होतो. तर मनी आईच्या पुढ्यात येवून आईचे पाय चाटत बसली. जणू काही आईची चौकशीच करीत होती. आजूबाजूची सगळी लोकं आश्चर्य करीत होती की मांजर किती शहाणी की दुसऱ्यांच्या हातून साधं दूध न पिलेली आईला बघून तिच्या अंगात असं कोणतं बळ संचारलं की धडपडत चालत येवून फक्त आईच्या जवळच बसली. तर अशी हि आमची मनी, तिला पिल्लं झाल्यावर तिने एकही पिल्लू जगू दिलं नाही. दोन चार दिवसात मारून टाकायची आजपर्यंत आम्हाला हे कोडं उलगडलेलं नाही की तिने असं का केलं. एकमात्र आहे की मनी गेल्यानंतर आम्ही कोणताच प्राणी घरात आणला नाही. बहुतेक मनीला हेच अपेक्षित असावं. तर या अश्या मनाबाई दूध पिल्यावर मस्तपैक्की ताणून द्यायच्या आणि मग मी चपाती आणि आणि माझा ठरलेला स्टीलचा ग्लास भरून चहा घ्यायचो. चहा भरलेला ग्लास बघून भाऊ ओरडायचा पण त्याच्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करून मी इंग्लिश पेपरच्या पुरवण्या समोर घेवून वाचायला बसायचो. चपाती सोबत चहाचे घुटके घेत पेपर वाचत असताना फोटो पाहण्यातच माझा जास्त वेळ जायचा. त्यांच्या स्टाईल बघून आपण देखील यांच्यासारखं राहावं असं वाटायचं...मनात. भाऊची अंघोळ उरकली की मी स्वतःसाठी पाणी गरम करायला ठेवायचो. भाऊने दहावीमध्ये दोन विषय राहिल्यामुळे शिक्षण सोडून दिले होते. घरात आई एकटी कमावणारी होती, दिवसभर चपात्या लाटून आणि भाकरी थापून महिन्याला तिचा पगार ३५० रुपये यायचा आणि त्यात फक्त खाण्याचे तिघांचे कसेबसे भागवायचो. सोबतीला दोघांची पेपर लाईन होतीच पण त्यातून पैसे खुपच कमी मिळायचे. शिल्लक हा प्रकारच माहित नव्हता त्यामुळे काहीच उरायचं नाही आणि त्यात माझे शिक्षण चालू होते. मराठी माध्यमातून शिकायला होतो म्हणून खर्च कमी व्हायचा पण शेवटी न कमावता खाणारं तोंड होतोच ना. तर भाऊ चिंचवडमध्ये  एका रबर फाक्टरीमध्ये कामाला जायला लागला. त्यामुळे आईला थोडाफार का होईना हातभार लागायला सुरुवात झाली आणि माझ्यावरचे शिक्षण अर्धवट सोडण्याचे संकट टळले. भाऊ त्याचे आवरून, नाश्ता करून झाला की त्याला डब्बा भरून द्यायचो मग तो कामाला जायचा.  

तो निघून गेल्यावर मी उगाचच घुटमळायचो, स्टोव्हची हवा कमी कर, पुन्हा पुन्हा पुरवण्या वाच असं करीत असताना डफलीवर थाप पडल्याचा आवाज यायचा तसा मी त्या आवाजाकडे ओढल्यासारखा दारात येवून उभा रहायचो. रोज येणारा फकीर माझ्या औत्सुक्याचा विषय असायचा. डोक्यावर हिरवं मुंडासं गुंडाळलेला, छातीपर्यंत लोंबणारी काळीभोर दाढी आणि मध्येच काही पांढरी झालेली दाढीची केसं, अंगात हिरवा शर्ट आणि त्यावर जाकेट आणि खाली कमरेभोवती लुंगी गुंडाळलेला, गळ्यात लाल, पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या मोठमोठ्या मण्याच्या दोन ते तीन माळा घातलेल्या असायच्या, उजव्या खांद्यावर झोळी, डाव्या हातात डफली, त्या डफलीच्या आतील कडांना स्टीलच्या पातळ चकत्या मध्ये भोक पाडून लटकवलेल्या असायच्या आणि त्यामुळे डफली सोबत त्या स्टीलच्या कडा देखील किंणकिणायच्या तो आवाज इतका सॉलिड असायचा की आजही स्पष्टपणे तो आवाज माझ्या कानात साठून राहिलेला आहे. तसेच त्याच्या उजव्या हाताच्या कोपरामध्ये स्टीलच्या कडीचा मोठा डब्बा स्थिरावलेला असायचा ज्यात भस्म असायचे आणि त्याच हातात धूप जाळण्यासाठी पितळेची छोट्या तीन खणांची छोटी मिनार असायची. त्या मिनारच्या सगळ्यात वरच्या खणात विस्तव असायचा, दुसऱ्या खणात धूपाचे खडे असायचे आणि तिसऱ्या खणात विस्तवातून तयार झालेली राख. त्याच्या झोळीमध्ये डोक्यावर आपटून आशीर्वाद देण्यासाठी मोरांच्या पिसांचा जुडगा असायचा आणि एक काळ्या रंगाचं वाडगं असायचं ते एकदम पॉलिश केल्यासारखं चकाचक काळेभोर दिसायचं. मेलेल्या माणसाची कवटी उलटी करून समोरील कपाळापासून मागच्या छोट्या मेंदूपर्यंत फोडल्यानंतर जसं मोकळं भांडं दिसेल तसं ते दिसायचं. कोणी पैसे द्यायला लागले की तो ते वाडगं पुढे करीत असायचा. त्याने पैसे हातात घेतल्याचे मी कधीच पहिले नाही. बहुतेक ते वाडगं म्हणजे एखाद्या लालची किवां श्रीमंत माणसाची कवटीच असावी ज्याच्याकडे पैसा लोहचिंबकासारखा जावून चिटकत असावा असं मला लहानपणी एकसारखं वाटत असायचं. तर तो फकीर आमच्या घरासमोर राहणाऱ्या आणि आमच्या वाडीतील इतरांपेक्षा जास्त सधन असलेल्या चौधरी कुटुंबाच्या दारासमोर जावून डफली वाजवून साईबाबांची गाणी म्हणायचा. त्या कुटुंबाची प्रमुख त्या घरातील एक स्त्री होती तिला आम्ही धोबिणमावशी म्हणायचो कारण ते धोबी समाजाचे होते आणि कपडे धुण्याचा त्यांचा व्यवसाय होता. मुंबईला धोबीघाटावर त्यांचा व्यवसाय चालत असे. तर त्या मावशी खुपच भांडकुदळ होत्या कोणी सहज जरी त्यांच्या घराकडे पहिले तर त्याची काहीच धडगत नसायची मावशी त्याच्या संपूर्ण पिढीचा उद्धार करायच्या. त्यांच्या या अश्या वागण्यामुळे कोणीच त्यांच्याकडे जात नसे किवा स्वतःहून बोलत असे. पण फकीर फक्त त्यांच्याच घरासमोर जावून गाणी म्हणायचा. मावशी माहेर येवून त्याच्या वाडग्यात पैसे टाकायच्या, कधीकधीच चिल्लरचा आवाज व्हायचा बहुतेक वेळेला नोटाच जास्त असायच्या. मग फकीर खुश होवून जोरात दुवा द्यायचा, झोळीतून मोरांच्या पिसांचा जुडगा बाहेर काढून मावशीच्या डोक्यावर जोरजोरात आपटायचा. इतर वेळेस सहज कोणी नजर मारलेल्या माणसाच्या पिढीचा उद्धार करणाऱ्या मावशी फकिराने डोक्यात मारलेल्या माराचा भक्तीभावाने हात जोडून स्वीकार करायच्या. त्यामुळे त्या फकीराचा खूप हेवा वाटायचा. मग फकीर काहीतरी पुटपुटत धुपाच्या वड्या विस्तवावर टाकायचा आणि मोराच्या पिसाने धूर मावशीच्या घरात लोटायचा. एवढं करून झाल्यावर फकीर धूप विझेपर्यंत ती मिनार मावशीच्या घराला लागूनच ठेवलेल्या लाकडी बाकावर ठेवून स्वतः तिथेच बसायचा आणि मग सकाळपासून जमा झालेले पैसे काढायचा. नोटा आणि चिल्लर वेगळ्या करून नोटा खिशात आणि चिल्लर वाडग्यात ठेवायचा. जाताना सायकलीच्या दुकानात चिल्लर देवून त्या बदल्यात नोटा घ्यायचा आणि त्या खिशात ठेवलेल्या नोटांसोबत ठेवून पुन्हा एकवार मोजून निघून जायचा.

रोजच्या खरेदीमधून मुद्दाम वाचवलेले पैसे मी त्या फाकीरासाठी ठेवायचो. मी पण दान करू शकतो हे दाखवण्यासाठी माझी धडपड असायची. एकवेळ आमचीच खाण्याची भ्रांत असायची पण हम भी कुछ कम नही हे दाखवण्याचा माझा प्रयत्न असायचा. तो फकीर येण्याच्या वेळेला सकाळी मी रोज दरवाजा उघडा ठेवून दारातच मुद्दाम रेंगाळायचो. त्याने फक्त एकदाच याचानात्मक नजरेने माझ्याकडे पहावे आणि मग मी पण दिलदारपणे त्याला हसून दान द्यावे असे वाटायचे. पण त्या फकिराने एकदाही माझ्याकडे चुकून देखील पहिले नाही. फक्त माझ्याकडेच काय तर वाडीतील कोणत्याच घरासमोर उभा राहून त्याने याचना केलेली मी कधीच पहिले नाही. तो फकीर अगदी म्हातारा होईपर्यंत रोज न चुकता येई. अशातच धोबिणमावशी आजारी पडून देवाघरी गेल्या, तरीही तो फकीर रोज येई. एकेदिवशी मी घरात काहीतरी काम करीत होतो आणि अशातच फकीराच्या डफलीचा आवाज ऐकू आला. मला वाटलं नेहमीप्रमाणे फकीर मावशींच्या घरासमोर डफली वाजवत असेल पण काही मिनटानंतर पुन्हा डफलीचा आवाज ऐकू आला. मला आश्चर्य वाटले कारण त्याला एकदा डफली वाजवल्यावर पुन्हा डफली वाजवायची कधीच गरज पडली नव्हती. मी आश्चर्याने दारात आलो तर म्हातारा फकीर धोबिणमावशीच्या दारासोर उभा होता पण आतून कोणाचाच प्रतिसाद न मिळाल्याने तो हताश होवून फक्त ‘या अल्लाह’ एवढंच पुटपुटला आणि सावकाश चालत तिथून निघून गेला...तो कायमचाच.

-सुरेश सायकर