Thursday 30 June 2016

असंच....सहज....फिरताना.....

बऱ्याचदा माणसं कोणतं तरी ध्येय ठेवून नेहमी बाहेर पडतात. पुरुषाबद्दल विचार केल्यास, क्लायंटसोबत ठरवलेली ऑफिशियल मिटिंग वेळेत गाठून काम मिळवणं, गृहिणीबद्दल विचार केल्यास, बाजारात जावून भाजी घेवून लवकर स्वयंपाक बनवणं, तरुण मुला-मुलींबद्दल विचार केल्यास, आपल्या प्रेमी किंवा प्रेमिकेला भेटून प्रेमाच्या गुजगोष्टी करणं.
अश्यावेळी बाहेर पडल्यावर ठरलेल्या जागी पोहचताना इतर कशाचाही विचार करत नाहीत. ऑफिसवाल्याच्या डोक्यात, प्रोजेक्टचे दमदार प्रेझेंटेशन करून प्रोजेक्ट कसे मिळवायचे? गृहिणीच्या डोक्यात, काल कोणती भाजी केली होती आज कोणती भाजी करायची? प्रेमी किंवा प्रेमिकीच्या डोक्यात, ओझरता का होईना स्पर्श कसा अनुभवता येईल? फक्त याचाच विचार.
हे करत असताना, आपली धावत्या यांत्रिक जगाची छोटी छोटी चाकं कधी झालीत हेच समजत नाही.
पण एकदा जरा वेगळं जगून बघा....म्हणजे कोणताच विचार डोक्यात ठेवायचा नाही....आणि सहज बाहेर पडायचं. अगदी डोकं मोकळं ठेवून, रस्त्यावरून भन्नाट चालत फिरायचं. मग बघा...काय सुख सापडेल.....आजूबाजूला कोणत्या ना कोणत्या ध्येयाने धावणारे जीव आणि आपण अगदी मोकळे....तुलना केल्यावर...इथेच पहिले सुख लाभेल. स्वतः बद्दल असूया वाटायला लागेल.
मग एक थोडा वेगळा खेळ खेळून बघायचा.....समोरच्यांच्या मनात काय चाललं असेल याचे आडाखे बांधायचे, त्याच्या चेहऱ्यावरच्या भावना टिपायच्या, स्वतःला त्या व्यक्तीसोबत कनेक्ट करायचं, त्यांच्या लकबी निरखायच्या, त्यांचा आजूबाजूच्या इतर लोकांबद्दल काय विचार चालला असेल याचे विश्लेषण करायचे.
सहज चहा पिण्यासाठी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एखादया हॉटेलपाशी उभे राहायचे. चहा पिणारी गर्दी न्याहाळायची, एकसो एक रंगीले रतन दिसतील. घोळका करून असतील परंतु लक्ष दुसरीकडे....म्हणजे सुंदर मुलींकडे. चहा पिताना एकमेकांत गप्पा मारणारी मुलं आणि मुलीदेखील ( याला मुली अपवाद असतात असं मुळीच मानू नये. ) आपण गप्पांमध्ये रंगलेलो आहोत हे दाखवत असतात. पण त्याचवेळी बाजूला उभ्या राहिलेल्या सुंदर मुलींवर किंवा मुलावर त्यांची नजर असते. तोंडाने गप्पा, पण डोक्यात विचार वेगळेच आणि तेही आपल्यापासून काही अंतरावर असणाऱ्या बद्दल. कनेक्ट करून बघा....
त्याचवेळी घाईघाईत फुटपाथवरून चालणारया गृहिणीच्या मनातले विचार, रस्त्यावरून भन्नाट वेगात मिटिंगसाठी जाणारया बिझनेसमनचे विचार, कॉफीशॉपच्या बाहेर टेबलावर हातात हात गुंफून बसलेले प्रेमीक जीवांचे विचार, आतुरतेने वाट बघणारे बसस्टॉपवरचे प्रवाश्यांचे, बर्गर किंग शॉपीच्या बाहेर उभा असणारा हडकुळ्या दरबानचे, किंमती इलेक्ट्रोनिक्सच्या वस्तू विकणारे पण स्वतः विकत न घेवू शकणारया शोरूमच्या कर्मचाऱ्यांचे, ज्वेलर्सच्या दुकानामध्ये मौल्यवान दागिने दाखवणारे परंतु स्वतः विकत घेवू शकत नसल्याने स्वतःला त्या दागिन्यांमध्ये पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे... अश्या अनेकाविध लोकांचे थक्क करून टाकणारे अनेकाविध विचार.
सायकलवाल्याला कट मारून पुढे जावून अचानक सिग्नल लाल झाल्यावर उभा राहणारा बाईकवाला. त्याचवेळी पेंडल मारून वैतागलेल्या सायकलवाल्याच्या मनात बाईकवाल्याबद्दल वाटणारी असूया, बाईकवाल्याच्या शेजारी येवून उभ्या राहणाऱ्या कारला बघून थंड ए.सी.ची हवा खाणाऱ्या कारवाल्याबद्दल वाटणारी बाईकवाल्याला असूया, त्याच बाईकवाल्याच्या मागे बसलेल्या सुंदर मुलीला बघून कारवाल्याला वाटणारी बाईकवाल्याची असूया. माणसांची हि अनेकाविध, वेगवेगळी, काहीशी विचित्र, गूढ, बहुरंगी, कधी विक्षिप्त वाटून देखील भन्नाट वाटणारी अनेक रूपे.....
बघायचीयेत......मग एकदा पडाच बाहेर....अगदी सहजच...डोकं मोकळं ठेवून.......
-सुरेश तुळशीराम सायकर