Tuesday 23 May 2017

आमरस आणि बाप्पू...



शाळेला उन्हाळ्याची सुटी आणि मामाचे गाव, हे आयुष्यातलं खरंच डेडली कॉम्बिनेशन आहे. ज्यांनी अनुभवले आहे, ती आठवणींची शिदोरी त्यांच्या आयुष्यातून कधीच संपणार नाही. मला आयुष्यात खूप चांगलं शिकवणारी, अगदी बोटावर मोजावी एवढीच लोकं भेटली. त्यात खूप वरचा नंबर लागेल, तो म्हणजे माझ्या आजोबांचा, बाप्पूंचा, म्हणजेच माझ्या आईच्या वडिलांचा.

बाप्पू म्हणजे खूप भारी रसायन होतं. ‘रसायन’ हा शब्द आणि तोही वयोवृद्द माणसासाठी अश्यासाठी कि, त्यांच्यात कणखरपणा जितका होता तितकाच अवखळपणा देखील होता, असा समप्रमाणात गुण असणाऱ्या व्यक्ती फारच कमी आढळतात. कणखरपणा यासाठी कि, त्यांच्या तरुणपणी बारामतीमधल्या, माळेगाव इथे बामणाच्या मळ्यावर सालगडी म्हणून काम करण्याआधी, लहानपणी ते त्यांच्या सख्ख्या मामाच्या घरी सालगडी म्हणून काम करत होते. आता मामा म्हंटल्यावर, कामामध्ये थोडीफार सूट मिळेल, अशी आशा वाटणे देखील स्वप्नवत. अश्या परिस्थितीमध्ये काम केल्यावर कणखरपणा माणसामध्ये येणार हे नक्कीच. पण तो येत असताना, त्यांनी आपल्यातले लहान मुल आणि अवखळपणा, कधीच मरू दिला नाही. त्यांच्या बोलण्यामध्ये विलक्षण मिश्कीलपणा आढळायचा. कोणाची टर उडवताना, डोळे बारीक करून, बोळक्या गालात असे काही हसत कि, ते बघणेबल (नवीन शब्द शोधलाय...वापरत आणायला कोणतेही राईटस नाहीत.असो.) असायचे.
तर सालाबादप्रमाणे, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, आंब्यांच्या सिझनमध्ये आमचा मुक्काम तिकडेच असायचा. पाड  लागला कि, आंब्यांच्या झाडावरून आंबे उतरवल्यावर, घरामध्ये एका कोपऱ्यात, आंबे पिकवण्यासाठी ‘आडी’ घातली जायची. ‘आडी’ म्हणजे सगळ्यात आधी गवत पसरवून ठेवायचे, मग त्यावर कच्चे आंबे ठेवले जायचे आणि मग त्यावर पुन्हा गवत पसरविले जायचे. हे काम बाप्पू स्वतः करायचे, कधी गरज पडली तर मला आणि मामाच्या मुलाला हाताखाली घ्यायचे. एकदा का, ‘आडी’ घातली कि, पाड लागलेल्या त्या कैऱ्यांचा प्रवास सुरु व्हयाचा, कच्च्यापासून तो पिकण्यापर्यंतचा आणि त्याला साक्षीदार असायचो, मी.

मी अश्यासाठी कि, रोज सकाळी झोपेतून उठलो कि, आधी ‘आडी’पाशी जावून आंबे पिकलेत का? याचा वास घ्यायचो. बापूंनी सांगितले होते, कि जेव्हा आंबे पिकायला सुरुवात होईल तेव्हा घरभर घमघमाट सुटेल. मग मी नजर चुकवून, गवत न सरकवता, ‘आडी’मध्ये हात घालून, एखादा आंबा पिकलाय का दाबून बघायचो. आणि एखादा हाताला लागलाच कि, चेहऱ्यावर असले भारी भाव उमटायचे कि, हात जेव्हा ‘आडी’मधून बाहेर यायचा तेव्हा हातात तो अर्धवट पिकलेला आंबा असायचा. मग मी तो आंबा खिशात टाकून, कोणाचे लक्ष नाहीये याची काळजी घेत बाहेर पडायचो आणि मग घोलपाच्या आमराईमध्ये जावून, अर्धवट पिकलेल्या आंब्याला दोन्ही हातात ‘शंख’ पकडतात असा पकडायचो. मग दोन्ही हातांच्या अंगठ्यांनी हळुवार दाबत जाग्यावर गोलगोल फिरवायचो. तो अश्यासाठी कि,  आंबा जिथे थोडाफार कच्चा राहिलेला असायचा, तो देखील कडक न राहता रसाने भरून जायचा. मग आंब्याच्या वरचे तोंड, नखाने हळुवार उडवायचे, आणि चीकासोबत थोडा रस बाहेर काढून तो झटकायचा. कारण तो चिक   तोंडाला लागल्यावर ‘जर’ उमटायचा आणि चोरी उघडी पडण्याची शक्यता असायची. मग तो आंबा स्वर्गीय सुखाने खायचो. हे सगळे उपद्व्याप बापूंची नजर चुकवून यासाठी म्हंटले कारण, असे आंबे, पिकण्याआधी दाबून बघितले तर खराब होण्याची शक्यता असते, असे बापूंनी सांगितले होते. तरीही मी बधत नाहीये आणि अधूनमधून आंब्यांची संख्या कमी होतीये, हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मला समोरासमोर काहीही न बोलता, सकाळचा चहा प्यायला बसल्यावर इनडायरेक्ट ऐकवले. ते असे, कि काय आहे, उन्हाळ्यात लांबड्याना खूप गरम होते ना, मग ते गारव्यासाठी, अगदी इथे आडीतल्या गवतात देखील येवून बसतात. हे ऐकल्यावर कोणाच्या बापाची बिशाद पुन्हा ‘आडी’ मध्ये हात घालायची. कारण बापूंना माहित होते कि, मला लांबड्याची (म्हणजे सापाची) खूप भीती वाटायची.  हि मात्रा अगदी बरोबर लागू पडायची. मग मी रोज सकाळी, ‘आडी’पाशी उभा राहून, ‘आडी’तल्या अर्धवट पिकलेल्या आंब्यांच्या फक्त वासावरच भागवायचो. हे बापूंच्या अनेक मिश्किल स्वभावातल्या किश्यांपैकी एक छोटासा किस्सा.

मग तो सोन्याचा सुदिन दिवस उजाडायचा, पिकलेले आंबे बाप्पू ‘आडी’ मधून बाहेर काढायचे आणि मग संध्याकाळी आमरसाचा बेत फिक्स. बाप्पू मोठ्या पितळेच्या परातीमध्ये आंबे धुवून ठेवायचे आणि स्वतः समोर एक पितळी पातेल्यात त्याचा रस काढायचे. बाप्पू आंबा हातात असा काही गोल फिरवून, आपल्या एका डाव्या हाताच्या अंगठ्याने पिळायचे, कि ते बघायला भारी वाटायचे. कारण त्यांच्या उजव्या हाताला अंगठा नव्हता. तरुणपणी घोड्याला चारा खायला घालत असताना, घोड्याने त्यांच्या अंगठा तोडला होता. 

खरी मजा तर पुढे यायची, म्हणजे संख्येने आंबे जास्त असल्याने, आंबे  जास्त न पिळता, फक्त गर काढून घ्यायचे आणि मग कोय आणि साल याला चिटकून राहिलेला केशरी गर, अधाश्यासारखे बसून असलेल्या, मला आणि मामाच्या लहान मुलाला, म्हणजे नानाला मिळायचा. इथे बाप्पू खरी गंमत करायचे. आंबा पिळून घेण्याआधी आम्हा दोघांना विचारायचे, हा बोला, कोय कोणाला? आणि साल कोणाला? नाना म्हणायचा, मला कोय.. मग बाप्पू नानाला कोय देताना खूप सारा गर तसाच ठेवायचे आणि साल मात्र पिळवटून, अगदी कोरडी करून मला खायला दयायचे. मग मी आपलं तोंड वाकडं करून, अगदी म्हणायला थोडाफार गर असलेली ती साल खायचो. इकडे बाप्पू गालातल्या गालात मिश्किलपणे हसत असायचे. तो आंबा पिळून झाला आणि दुसरा आंबा घेतला कि, पुन्हा विचारायचे,हा आता बोला, कोय कोणाला? आणि साल कोणाला?यावेळी मी म्हणायचो, कोय मला पाहिजे... मग बाप्पू आंबा थोडासा पिळून, कोय बाहेर काढायचे आणि साल नानाला खायला दयायचे, ज्यामधून गर अगदी नावापुरताच काढलेला असायचा. मग गालातल्या गालात हसत, स्वतःच्या हातात कोय पकडून, त्याचा अगदी सगळा गर काढू घ्यायचे आणि नावापुरता राहिलेला गर असलेली कोय, म्हणजे अगदी पांढरे  केसं पिंजारलेली म्हातारी दिसावी, अशी कोय ते माझ्यापुढे धरायचे. मी हात पुढे करून ती कोय घ्यायचो आणि तोंड वेडावाकडं करीत गर शोधत कोय खायचो. इकडे नाना मात्र मिटक्या मारत गर असलेली सालं, कोय खात असायचा. आणि माझ्या वाट्याला फक्त म्हणायला पांढरी झालेली कोय आणि कोरडी सालं यायची. 

हि गोष्ट मात्र आजीच्या नजरेतून सुटायची नाही. पण आजी, जिला आम्ही आक्का म्हणायचो, ती काहीही न बोलता फक्त डोळे मोठे करून रागाने बापूंकडे बघायची आणि बाप्पू मात्र जणू काही घडलेच नाही अश्या अविर्भावात गालातल्या गालात हसायचे. मी चिडून त्यांना म्हणायचो, तुम्ही मुद्दाम असं करताय... यावर बाप्पू म्हणायचे, मुद्दाम कशाला...अरे, कितीही केलं तरी तू माझ्या लेकीचा, मुलगा आहेस. तेव्हा तुझा इथे काहीच अधिकार नाहीये. याउलट नाना माझ्या लेकाचा, मुलगा आहे. तेव्हा इथल्या सगळ्या गोष्टींवर त्याचाच हक्क आहे. त्यामुळे त्यालाच जास्त खायला घालणार ना. तुम्ही म्हणजे फक्त पाव्हणे...असं म्हंटलं कि, माझ्या रागाचा पारा चढायचा, कानशिलं गरम व्हायची, समोर जे दिसेल ते फेकून द्यायचो आणि तिथून आमराईमध्ये, जांभळाच्या झाडाखाली किंवा आंब्याच्या झाडावर, फांदीवर जावून बसायचो. 

थोड्यावेळाने जेवणाची वेळ व्हयाची, आमरस तयार झाला असेल या आठवणीनेच पोटात आग पडायला लागायची. फांद्यावरून खाली उतरायचो आणि सरळ घरी जायचो. मला बघितल्यावर आक्का, स्टीलचे ताट काठोकाठ  भरून आमरस वाढायची, आणि तो हि अनलिमिटेड. सोबत गव्हाची चपाती. आक्का, चुलीवर चपाती एवढी खरपूस भाजायची कि, चपाती कोरडी जरी खाल्ली तरी मन आणि पोट भरायचे नाही. मग जेवत असताना मान वर न करताच जेवायचो. त्याला कारण हि तसेच असायचे. परंतु मान खूपच दुखायला लागली कि, नाईलाजाने वर बघावे लागायचे, तर समोर जेवायला बसलेले असायचे, बाप्पू. डोळे बारीक करीत मिश्किलपणे माझ्याकडे बघत, गालातल्या गालात हसत असायचे. बापूंचे गालातल्या गालात हसणे, ज्याने कोणी अनुभवले किंवा ज्याला उमगले असेल त्याला त्यांचा मिश्किल स्वभाव नक्कीच कळला असणार. बापूंचे ते हसणे अगदी त्यांना शेवटची अंघोळ घालताना देखील मी अनुभवले होते. ते आयुष्यात कधीही माझ्या स्मृतीपटलावरून पुसले जाणार नाही. 

बापूंकडून मी अनेक चागंल्या गोष्टी घेतल्या, त्यातल्या तीन आजही भारी वाटतात. पहिली, त्यांचा मिश्कीलपणा, दुसरी,लहान मुलांसोबत, लहान होवून खेळकरपणे खेळणे आणि तिसरी, खूप महत्वाची म्हणजे, त्यांचे चहाची आवड (याला काही लोकं, व्यसन, असं म्हणतात, उगीचच...). या तिन्ही गोष्टी त्यांच्याप्रमाणेच शेवटपर्यंत माझ्यासोबत राहोत, हि प्रार्थना.

- सुरेश तु. सायकर