Wednesday 23 March 2016

उमेद....

वर्तमानपत्रामध्ये आलेल्या एका बातमीवर एकसारखी नजर जात होती. तो नसेल असं वाटून एकदोन वेळेस पानं उलटून दुसरी बातमी वाचण्याचा प्रयत्न केला. पण त्या बातमीबद्दल कुतूहल वाटून पुन्हा पुन्हा वाचत होते. मन म्हणत होतं कि हा तोच मनू आहे पण वयपरत्वे थकलेल्या डोळ्यांचा यावर विश्वास बसत नव्हता. काहीश्या विलक्षण वेगाने मी भूतकाळात गेले.

अशीच एकेदिवशी दुपारी सर्व कामे आटपल्यावर नेहमीप्रमाणे निवांत वर्तमानपत्र वाचत दिवाणखान्यात बसले होते. गेट उघडल्याचा आवाज ऐकला तसं उठून खिडकीतून बाहेर डोकावलं तर समोर सुधा लहानग्या ५ वर्षाच्या मनुला घेवून येताना दिसली. सुधा, वय साधारण २७ ते २८ दरम्यान, निर्मात्याला देखील स्वप्नात वाटले नसेल इतकी देखणी. रंगरुपाने गोरीपान, आकर्षक बांधा, काळेभोर बोलके डोळे आणि स्त्रीला देखील प्रेमात पाडेल अशी लांब केसांची वेणी पण अकालीच नशिबी आलेली कपाळी वैधव्याची खुण. प्रेमविवाह केल्यामुळे फक्त माहेरच नाही तर सासर देखील दुरावलेलं. तरीही परिस्थितीला धैर्याने सामोरे जाताना कमरेला पदर खेचून मनूसाठी उभी राहिली. मी राहत असलेल्या बंगल्याच्या समोर काही चाळीवजा घरे होती आणि सुधा आपल्या नवऱ्यासोबत तिथेच भाड्याच्या घरात राहत होती. सुधा गरोदर असतानाची गोष्ट, ती रोज संध्याकाळी जेवण झाल्यावर आमच्या बंगल्यासमोरील रस्त्यावरून नवऱ्यासोबत पायी फिरायची. मी रोज तिला पहायचे, खूप कौतुक वाटायचे तिचे आणि तिच्या नवऱ्याचे, खूप काळजी घेणारा होता. सुरुवातीला मला वाटलं कि नोकरी निमित्त दोघे बाहेर गावावरून इथे रहायला आलेत आणि त्यामुळे सासरची मंडळी सोबत नाहीत. अशीच एके दिवशी ती नवऱ्यासोबत आमच्या गेट समोरून जात असताना तिला चक्कर आल्यासारखं झालं आणि हे पाहून तिचा नवरा गडबडला. मी गेट जवळच झाडांना पाणी देत होते. अचानक उद्भवलेली परिस्थिती पाहून मी पुढे होवून तिला आधार देवून आत घेतले आणि थोडं साखर पाणी दिलं तशी ती सावध झाली. तिच्या नवऱ्याला तर काहीच समजत नव्हते बिचारा पुरता भांबावून गेला होता. अश्या अवघडलेल्या परिस्थितीत हे होणे साहजिकच होते त्यामुळे काहीही घाबरून जाण्यासारखे नाहीये हे समजावून सांगितले. तसा तो थोडा शांत झाला. सुधाला आता बरे वाटायला लागले, दोघेही माझे आभार मानून गेले. तिला ‘पुन्हा ये’ असं सांगावेसे वाटले पण अगदीच पहिल्यांदा ओळख झाल्याने जरा स्वतःला सावरून घेतले. तशीही सकाळी ११ नंतर संध्याकाळी ६ या वेळेत मी एकटीच असायची, हे लवकर आवरून ऑफिसला जायचे आणि पाठोपाठ मुलं शाळेचं आटपून जायची. त्यानंतर बाकीची कामे आटपल्यावर मी अगदीच निवांत असायचे. मला कुचाळक्या करणाऱ्या बायकांचा प्रचंड तिटकारा आणि या एकमेव कारणामुळे मी इतर महिला मंडळामध्ये जाण्यास टाळायचे. का कुणास ठावूक पण सुधा मला तशी वाटली नाही. आणि बहुतेक त्यामुळेच तिला घरी येण्यासाठी आमंत्रित करावेसे वाटले.

आता ती रोज जाता येता मी दिसल्यावर हसून पहायची. मी नाही दिसले तर कधी कधी गेट जवळ थांबून  आत डोकावून पहायची आणि दिसल्यावर फक्त हसून पुढे जायची. आपल्याला अडचणीच्यावेळी कोणताही विचार न करता मदत करणाऱ्या व्यक्तीबद्दल असे वाटणे साहजिकच होते. पण मला एकसारखे सुधा सोबत बोलावेसे वाटू लागले. एकेदिवशी ती गेट समोरून जाण्याच्या वेळेत मी तिथेच झाडांना पाणी देत होते. नेहमीप्रमाणे सुधाने समोरून जाताना हसून पहिले. मी देखील हसून पहिले आणि तिला विचारले काय कशी आहे तब्येत दोघांची”. सुधा म्हणाली खूपच छान, हे सकाळी लवकर जातात कामावर... मी तिचे बोलणे मध्येच तोडत म्हणाले अगं...दोघांची म्हणजे तुझ्या यांची नाही तर बाळाची विचारपूस करत होते मी त्यासरशी ती खूप मनापासून आणि छान हसली. इतकं नैसर्गिक हास्य मी कोणाच्याही चेहऱ्यावर पहिले नव्हते. बाकीचे सगळेच डेली सोप सारखं कृत्रिम हास्य चेहऱ्यावर घेवून फिरतात आणि समोरच्या व्यक्तीची पाठ वळली रे वळली कि लगेच कुचाळक्या करायला सुरुवात करतात. सुधा तशी नाही वाटली. मी तिला विचारले आता काय झोपणार कि काय घरी जावून ती म्हणाली हो..म्हणजे एकटीला अगदीच करमत नाही आणि मग टीवीवर सीरिअल पहायला लागले कि लागते झोप आपोआप”. मी म्हंटले अग त्या सीरिअल पाहण्यापेक्षा आणि झोपण्यापेक्षा माझ्याकडे येत जा गप्पा मारायला. अशीही मी एकटीच असते दुपारच्या वेळेत मी असे बोलल्यावर का कुणास ठावूक मला तिच्या डोळ्यात एकदम पाणी आल्यासारखे वाटले. सुधा म्हणाली म्हणजे तुमची काहीही हरकत नसली तर मला आवडेल तुमच्यासोबत बोलायला मला देखील माणसं ओळखण्याच्या माझ्या कसबेचे कौतुक करावेसे वाटले. कारण मी सुधा बाबतीत मनात केलेले अंदाज अगदी तंतोतंत खरे ठरले होते. कोणी बोलावले कि लगेच आत शिरण्याऐवजी समोरच्या माणसाला आवडेल का असं विचारणं म्हणजेच चांगल्या संस्काराचे लक्षण. अश्यातऱ्हेने सुधा आणि माझी गट्टी जमली. आमच्या दोघींमध्ये असलेल्या वयाच्या अंतराचा काहीच फरक पडला नाही उलट आम्ही दोघी खूप चांगल्या मैत्रिणी झालो.

माझी सगळी कामे आटपेपर्यंत सुधा रोज यायला लागली. सुरुवातीला काही खायला विचारले तर बुजऱ्या स्वभावामुळे नाहीच म्हणायची. परंतु जशी पाण्यात साखर हळूहळू विरघळत जाते तसतशी तिची भीड हळूहळू चेपून ती मिसळून गेली. तिचा नवरा एका चांगल्या आय टी कंपनीमध्ये ड्रायव्हर म्हणून कामाला होता. त्याचे पदवी पर्यंतचे शिक्षण कौटुंबिक कारणास्तव मागे पडलेले होते. घरची हलाखीची परिस्थिती असल्याने कमावणारे हात दोन आणि खाणारी तोंडे अनेक अश्या अवस्थेमुळे त्याने शिक्षण अर्धवट सोडून मिळतील ती कामे करायला सुरुवात केली होती. परंतु लग्न होण्याआधी सुधाने त्याला अटच घातली होती कि, नोकरी करता करता पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करायचे जेणे करून चांगल्या पदावर काम मिळू शकेल. सुधाचा हा गुण मला खूपच भावला, नवऱ्यामधले चांगले गुण शोधून त्याला प्रोत्साहित करणे आणि मानसिक पाठबळ देणे यामुळे दोघांमध्ये संबंध फक्त प्रेमापुरतेच मर्यादित न राहता विश्वासाच्या उच्च पातळीवर पोहचते. नाहीतर आज कालच्या मुलींना इंजिनिअर,डॉक्टर,आय टी मध्ये उच्च पदावर काम करणारा नवरा हवा असतो म्हणजे लग्नाआधी त्याच्या आई वडिलांनी कष्ट घेवून त्याला त्या पदापर्यंत पोहोचवायचे आणि मग लग्न झाल्यावर त्या मुलींना परिपूर्ण म्हणजे अगदी आयता रेडीमेड नवरा मिळतो. आणि त्यावर कडी म्हणजे आयुष्यभर मानसिक, आर्थिक ताण सहन करीत उच्च पदापर्यंत पोचवणारे नवऱ्याचे आई-वडील, सुनेला कालांतराने व्हिलन वाटू लागतात. पण सुधा नक्कीच याला अपवाद होती, सुधाचा नवरादेखील अभ्यास करून मुक्त विद्यापीठ मधून परीक्षेची तयारी करीत होता. ऑफिसच्या कामानिमित्त त्याला कधी मुंबई, बंगलोर अश्या शहरांमध्ये जावे लागे. मग अश्यावेळी तिला सोबत म्हणून शेजारी राहणाऱ्या मावशी तिच्या घरी येत असत. त्यांचा फारमोठा आधार मिळतो असा अधूनमधून उल्लेख सुधा करायची. सुधाच्या ऑफिसमधील वरिष्ठ देखील नेहमी सुधाच्या नवऱ्यालाच ड्रायवर म्हणून सोबत नेण्याचा आग्रह करायचे. कारण तो पूर्णपणे निर्व्यसनी होता आणि त्याचे इंग्रजीचे ज्ञान देखील खूप चांगले होते. नेहमी अभ्यासाची पुस्तके जवळ बाळगी आणि वेळ मिळेल तिथे अभ्यास करी त्यामुळे त्याच्या वरिष्ठांना नेहमी अप्रूप वाटे. अशातच सुधाच्या डिलिव्हरीची तारीख जवळ आली. सुधा मनाने खूपच खंबीर तिने त्रास होत असताना देखील तिच्या नवऱ्याला अजिबात जाणून दिले नाही. कारण तिला माहित होते कि, तिच्या मदतीला ना माहेरचे लोक येणार ना सासरचे आणि त्यात तिच्या नवऱ्याची होणारी तळमळ.

रोज येणारी सुधा न आल्यामुळे त्यादिवशी मी थोडी बैचेनच झाले होते. अशातच दुपारच्या वेळेस सुधाचा नवरा आला. मला काही समजेना कि नक्की काय झालंय ते कारण सुधाचा नवरा माझ्याकडे एकटा कधीच यायचा नाही. मनात शंकेची पाल चुकचुकली तसा त्याने अख्खा पेढ्याचा बॉक्सच माझ्या समोर धरला आणि आनंदाची बातमी दिली. त्याने सांगितलं कि काल मध्यरात्रीच सुधाला अचानक प्रसुतीच्या कळा येवू लागल्या. घरी दोघेच असल्याने तिच्या नवऱ्याला तर काय करावं नेमकं समजेना. सुधाने कसबसं त्याला मावशीला बोलवा असं सांगितल्यावर त्याने शेजारच्या मावशींना बोलावून आणले. शेजारच्याच एका रिक्षावाल्याला उठवून सुधाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. सुधाला डॉक्टरांनी आतमध्ये नेल्यावर सुधाचा नवरा आणि मावशी बाहेर थांबले. सेकंद देखील तासांप्रमाणे भासत होते सुधाच्या नवऱ्याला, कोठून दुर्बुद्धी सुचली आणि सुधाला या त्रासात अडकवले असं त्याने मावशीला बोलूनही दाखवलं. त्यासरशी अश्या गंभीर परिस्थिती मध्ये देखील मावशी खळखळून हसायला लागल्या. त्यांना असं हसून पाहताना सुधाच्या नवऱ्याला समजलं पण नाही कि तो असं काय वेगळं बोलला. तो मावशीला काही तरी बोलणार इतक्यात बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यासरशी सुधाचा नवरा आतमध्ये जायला लागला तर डॉक्टरच बाहेर आले आणि सुधाच्या नवऱ्याचे अभिनंदन करत ‘मुलगा झाला’ असे सांगितले. सुधाचा नवरा ते ऐकून खुश होईल असे वाटत असतानाच त्याने डॉक्टरांना ‘सुधा कशी आहे’ असं विचारलं. तश्या डॉक्टर हसायला लागल्या आणि ‘सुधा देखील ठीक आहे तिला थोडा त्रास झाला पण बाळंतपण अगदीच सुखरूप झालं.तुम्ही थोड्या वेळाने भेटू शकता’. तरीही हा आतमध्ये गेला आणि लांबून का होईना ती सुखरूप आहे याची खात्री करून घेतली आणि मगच मुलाला पाहिलं. सुधाने भेटल्यावर जेव्हा हे मला सांगितलं तेव्हा मला देखील खूप छान वाटलं या दोघांचं एकमेकांवरचं प्रेम पाहून.                  

आता जबाबदारी आणखीन वाढल्याने सुधाचा नवरा कामात आणि अभ्यासात खूप मेहनत घेवू लागला. असाच एकेदिवशी अचानक रात्री त्याच्या मोबाईलवर वरिष्ठांचा फोन आला. ते अमेरिकेतून भारतात सकाळ पर्यंत पोहोचणार होते आणि त्यांना मुंबई विमानतळावर घेण्यासाठी त्याला बोलावले. त्याच्यासाठी हे नेहमीचे होते त्यामुळे त्याने सुधाला जागे करून मुंबईला चाललो आहे असे सांगितले.तिने उठून त्याच्यासाठी चहा करायचे म्हंटल्यावर त्याने तुला त्रास नको आणि रात्री मनुने देखील खूप उशिरा पर्यंत जागवले म्हणून मी आधीच चहा करून प्यायलो असे सांगितले. त्याच्या दुचाकीवरून त्याला ऑफिसमध्ये जायचे होते आणि मग तिथून ऑफिसची गाडी घेवून मुंबई. तो तसा मुंबईला जायला निघाला देखील, एक्स्प्रेस हायवे वरून जाताना अमृतांजन जवळ आल्यावर अचानक त्याच्या गाडीसमोर एक अवजड ट्रक खूप वेगाने लेन कट करून आला आणि वळणावर अचानक जोरात ब्रेक दाबला आणि....सुधाच्या नवऱ्याची गाडी ट्रकच्या मागील बाजूस जोरात धडकली. धडक इतकी जोरात होती कि त्याची गाडी पूर्णपणे ट्रकच्या मागील भागात अर्ध्यापर्यंत आत गेली. तो अपघात बघून कोणी जिवंत राहिले नसणार याची खात्री पटावी इतका भयानक अपघात झाला होता. सुधासाठी हा खूपच मोठा आघात होतं. त्या दिवशी मी पहिल्यांदा तिच्या घरी गेले होते. छोटंसं घर, पण सुधाने छान सजवलेलं होतं पण आता सुधा सोबत घराची रया देखील गेली होती. मनू १ वर्षाचा होता, त्याला काहीच समजत नव्हतं कि आपली आई का रड्तीये आणि इतकी लोकं आपल्या घरात का जमली आहेत. सुधाकडे अजिबात बघावसं वाटत नव्हतं इतकी कोमजून गेली होती. तिच्या माहेरची आणि सासरची लोकं पण तिथंच होती. अश्या दु:खद प्रसंगीदेखील सासरच्या लोकांमध्ये सुधाच्या नावाने अक्षरशः शिव्यांच्या लाखोल्या वहिल्या जात होत्या. पण सुधा एकदम शून्यात नजर लावून बसली होती. तिच्या कानापर्यंत काहीच पोहचत नव्हते, तिच्या संवेदना तिच्या नवऱ्यासोबत आता कायमच्या निघून गेल्या होत्या. मला पाहिल्यावर देखील तिच्या डोळ्यात पाणी आलं नाही ती एकटक माझ्याकडे पाहत होती. तिची हि अवस्था पाहून माझाच श्वास कोंडू लागला. मी स्वतःला कसबसं सावरत तिथून बाहेर पडले, तडक घर गाठलं आणि बेडरूममध्ये जावून अक्षरशः ओक्साबोक्शी रडले. सुधाची हि अवस्था पाहून तीन ते चार दिवस मला जेवण देखील गेलं नाही. एकसारखा तिचाच विचार माझ्या मनात होता. आता तिचं भविष्य काय असेल, तिला माहेरचे जवळ करतील कि सासरचे. नाही सासरचे तर कधीच नाही, तिला इतक्या लोकांसमोर वाईट बोलणारे कसे काय जवळ करतील. बहुतेक, मनुला पाहून त्यांचे मन बदलेल कि,फक्त मनुला घेवून जातील आणि सुधाला तिच्या माहेरी सोडतील. आपला मुलगा सुधामुळे गमावला म्हणून त्याची भरपाई म्हणून मनू. काहीच समजत नव्हतं आणि सुधाच्या घरी जावून पुन्हा भेटावं तर तिची काळीज चिरणारी नजर, नाही, नकोच जायला. पण शेवटी न राहवून मी गेलेच. मला समोर पाहिल्यावर सुधाच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. तिने मिठीच मारली मला आणि खूप रडली. मला जरा शांत वाटलं कारण न रडता मनातल्या मनात कुढत बसल्याने मानसिक आघात खूप मोठा होतो असं मी अनेकदा पहिले होते. मी तिला थोपटून शांत केलं. घरी फक्त तिची एक लहान बहिण होती आणि शेजारच्या मावशी, बाकीचे कोणीच नव्हते.मी तिला विचारले तर शेजारच्या मावशीने सांगितले कि, सासरच्या लोकांनी दुसऱ्याच दिवशी सगळ्या विधी पार पाडल्या आणि निघून गेले. इतकेच काय तर सुधाच्या माहेरच्या लोकांनी देखील,आमच्या इथे तू परत येवू नकोस असे बजावले. पण तिची धाकटी बहिण, तिच्या आई बाबांसोबत भांडून सुधा जवळच राहिली होती काही दिवसांसाठी. सुधाने मागे सांगितले होते तिच्या बहिणीबद्दल, सुधाने तिला अभ्यासात,खेळात, आणि तिच्या सगळ्या जडणघडण मध्ये खूप साथ दिली होती. त्यामुळे सुधाची अन तीच्या धाकट्या बहिणीची मैत्री खूपच दाट होती. बराच वेळ मी बसून होते, कोणीच काही बोलेना. इतर वेळी बडबडणारया सुधाला अक्षरशः शांत बस थोडी असं सांगावं लागायचं आणि आता मात्र ती एकदमच शांत होती. तिचे असे शांत बसणे खूपच अंगावर येत होते. बराच वेळ आम्ही सगळे काहीही न बोलता शांत बसून होतो. मनू खेळून खेळून चांगलाच दमला होता आणि आता शांत झोपलेला होता. खूपच निरागस दिसत होता, बिचारयाचे नशीब असे कि मोठा झाल्यावर त्याला आपल्या बाबाने आपले कसे लाड केले होते हे देखील आठवणार नाही. शांतता भंग करीत मी सुधाला धीराने रहा आणि घरी येत जा रोजच्या रोज असे सांगितले. तिने फक्त मान डोलावली, बाकीच्यांचा निरोप घेवून मी निघाले. मधले काही दिवस सोडता, सुधा मनूला घेवून माझ्याकडे रोजच्या रोज यायला लागली. तिला हसताना आणि स्वतःला समजावून घेत असताना पाहून मला खूप बरं वाटायला लागलं. तिला माझ्या शब्दांनी खूप धीर यायचा, म्हणायची तुमच्याशी गप्पा मारल्या ना कि असं वाटतं कि दिवस असे निघून जातील आणि मनू मोठा होवून माझ्या सगळ्या चिंता दूर करेल. माझ्या सोबत तिला देखील हे माहित होतं कि दिवस असे जातच नाहीत मुळी, पण जातील या आशेने माणूस तीळ तीळ तरी मरत नाही. सुधाने नर्सिंगचा कोर्से केलेला होतं हे शेजारी राहणाऱ्या मावशीनां माहित होते म्हणून त्यांनी तिला एका हॉस्पिटल मध्ये नर्सचे काम आणले होते. सुधाचा नवरा ज्या आय टी कंपनीत कामाला होता त्यांनी त्याची इन्शुरन्स पोलीसी काढलेली होती. त्यामुळे तिला बरयापैक्की रक्कम मिळाली होती पण ती तरी किती दिवस राहणार आणि मनू देखील इंग्लिश शाळेत नर्सरीला जायला लागला होता. आणि तो शाळेतून आल्यावर शेजारच्या मावशींनी त्याला सांभाळण्याची तयारी दाखवली होती. त्यामुळे तिला म्हणावा असा रिकामा वेळ मिळणार आणि माझ्याकडे गप्पा मारायला येण्याखेरीज दुसरे काही खास काम नव्हतेच. मी देखील तिला कामावर जायला सांगितले जेणेकरून नवीन माणसात वावरल्याने तिच्या डोक्यातला विचारांचा भार थोडा हलका होईल. सुधा कामाला जायला लागली आणि आता जसा वेळ मिळेल तशी ती मनूला घेवून यायची आणि दिवसभर घडलेल्या घटना सांगायची. खूप बरं वाटायला लागलं मला, सुधा हळूहळू नवऱ्याच्या अचानक जाण्याच्या धक्क्यातून बाहेर पडत होती. काही दिवसानंतर सुधाच्या बोलण्यातला सूर वेगळाच वाटू लागला. काही काही वेळेस बोलू कि नको, कि सांगूनच टाकू. अश्या पद्धतीचे बोलणे वाटायचे पण मी विचारल्यावर काहीही नाही, असं बोलून टाळायची. मला समजत होता तिच्या वागण्या बोलण्यातला बदल, पण सरळ सरळ विचारणे देखील मला पटत नव्हते. मनात म्हंटल, जेव्हा तिला स्वतःहून सांगावसं वाटेल तेव्हा ती सांगेलच कि. कारण एखाद्या स्त्रीने भूतकाळातल्या गोड आठवणींच्या ओझ्याचा भार जरी विसर्जित केला असला तरी चालू वर्तमानकाळातील हव्या असणाऱ्या नैसर्गिक भावनांचे काय.

भूतकाळातल्या आठवणींमधून मी वर्तमानात आले. सुधा मनूला घेवून आत आली. तिच्या चेहर्यावरचा आत्मविश्वास पाहिल्यावर मला जाणवले कि सुधा आज नक्कीच मला तिच्या मनातली गोष्ट सांगणार. इतर अवांतर गप्पा मारल्यावर थेट मुद्द्यावरच आली म्हणाली हॉस्पिटलमध्ये माझ्यासोबत काम करणारे सुपरवाईजर प्रशांत त्यांनी मला लग्नाची मागणी घातली. माझा भूतकाळ माहित असून देखील. त्याचे आधी लग्न झाले होते पण दोनच वर्षानंतर त्यांचे बायको सोबत पटेनासे झाले. आणि ती वरचेवर तिच्या माहेरी जावू लागली. शेवटी त्यांनी घटस्फोट घेतला.तिला वाटलं हे ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसेल वगैरे. मी अगदी सहज तिच्याकडे पाहत म्हणाले चांगलंय, शेवटी मनूला देखील वडिलांच्या मायेची गरज आहेच की”. सुधाला खूप आश्चर्य वाटलं माझ्या सहज व्यक्त होण्याचं. मी तिला समजावलं, बघ या वयात शेवटी तू एकटीने आयुष्य व्यतीत करणे शक्य नाही कारण मनू आत्ता ५ वर्षाचा होईल. आणि तुझे वय देखील फक्त २७ वर्ष आहे. तू कितीही प्रयत्न केला तरी काही भावना उफाळून येणे नैसर्गिकच आहे. तू शक्य तितकं स्वतःवर नियंत्रण ठेवशील पण जर तू दुसरे लग्न करून सुखी राहू शकणार असशील तर काय हरकत आहे. खरं तर तुझ्या वागण्या बोलण्यातला फरक मला खूप आधीपासून जाणवू लागला होता. तसं मी तुला विचारणार देखील होते. पण मनात म्हंटल, योग्य वेळ आल्यावर तूच मला सांगशील आणि बघ तसेच घडले. माझ्या समजावून सांगण्याचा सुधावर खूपच सकारात्मक परिणाम झाला. सुधाने आणि प्रशांतने नोंदणी पद्धतीने विवाह केला. सुधाने ती राहत असलेली भाड्याची खोली देखील सोडून दिली. ती आता तिच्या नवऱ्यासोबत रहायला त्याच्या घरी गेली. तिथे तिचा नवरा आणि सासू दोघेच राहत होते आणि आता सुधा आणि मनू. मी खूपच आनंदात होते, बिचाऱ्या सुधाला इतक्या कमी वयात आलेले वैधव्य आणि तिची होणारी होरपळ आता कुठे तरी जावून थांबणार होती. तिला तिच्या हक्काचा माणूस मिळणार होता आणि मनूला माया करणारा वडील. सुरुवातीचे काही दिवस सुधा जमेल तशी माझ्याकडे येत होती मी देखील समजून घेत होते. कारण तिचे घर आणि तिच्या कामाचे ठिकाण अगदी विरुद्ध दिशेला आणि त्यातला त्यात माझे घर देखील. शेवटी मीच तिला सांगितले कि,एवढी धावपळ करीत जावू नकोस. जसे जमेल तशी येत जा भेटायला. मध्ये बरेच दिवस सुधा आली नाही, मनात म्हंटले कि नव्या संसारात गुरफटून गेली असेल.

साधारण दोन ते अडीच दोन महिन्यानंतर मनूला घेवून सुधा आली होती. जवळ आल्यावर तर मी तिला ओळखलेच नाही. डोळ्याखाली काळी वर्तुळे, गाल आत गेलेले, केसं विस्कटलेली, बोलताना देखील अडखळत बोलायला लागली. मला क्षणभर काही समजेना, थोड्या दिवसांपूर्वी पाहिलेली सुधा आणि आत्ताची सुधा, जमीन अस्मानाचा फरक होता. मी तिला पाणी दिले आणि तिच्या डोक्यावरून जसा प्रेमाने हात फिरवला. तशी सुधा ओक्साबोक्शी रडायला लागली. मनू एकदम शून्यात नजर लावून बसलेला होता. मला तर काहीच समजेना. कसबसं सुधाला शांत केलं. मनूला खायला बिस्किटं दिली तरीही तो प्लेटकडे फक्त पाहतच बसला. एवढा शांत मनू मी कधीच बघितला नव्हता. शेवटी मी सुधाला विचारलं काय झालंय सुधा. सुधाचा बांध तुटला, भरलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत विचारले मीच का? सांगा ना मीच का म्हणून हे सगळं सहन करायचं. माझ्याच नशिबात का हे सगळे भोग. तिचे असे बोलणे, माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. सुधाच्या लग्नाला जेमतेम ७ महिनेच झालेले आणि अचानक तिचे असे बोलणे, मला काहीच मेळ लागेना. तिच्या तब्येतीकडे पाहून मनात पाल चुकचुकलीच होती. नवीन लग्न, घरचे सर्व म्हणजे स्वयंपाक, धुणीभांडी आवरून, मनूची शाळा आणि त्यात नोकरी हा सगळा व्याप सांभाळताना सुरुवातीला तब्येतीवर परिणाम होणे साहजिकच होते. पण यावेळेस माझा अंदाज चुकला होता. मी सुधाला म्हणाले सुधा, काय झालं ते व्यवस्थित सांगशील का? यावर सुधाने जे सांगितले ते ऐकल्यावर मला काहीच सुचेना. नवीन लग्न झाल्यावर सासरी आल्यावर सुरुवातीला नवऱ्यासोबत सासूने देखील कौतुक केले. मनू सोबत माझा स्वीकार केल्यामुळे मी खूपच आनंदात होते. पण का कुनास ठावूक, मनू तितका खुश नव्हता. मला वाटलं नवीन घरी आल्यामुळे तो थोडा बुजला असेल होईल हळूहळू सवय. मनूला माझ्यासोबत झोपायची सवय, पण मी त्याला त्याच्या आजीपाशी झोपायला सांगायचे. त्याला आवडायचं नाही ते, तो हट्ट करायला बघायचा पण ह्यांना किंवा सासूबाईंना पाहिलं कि दडपणाखाली यायचा. प्रशांत देखील सुरुवातीला त्याचे लाड करायचे पण एके दिवशी काहीतरी कारणावरून प्रशांतने मनूला पहिल्यांदा मारले. मी विचारले तर माझ्यावर देखील खेकसले. म्हणाले, बरोबर आहे, मी जन्म दिला नाही ना. त्यामुळे मला काहीच हक्कच नाही. मला खूपच धक्का बसला अश्या बोलण्याचा पण वाटलं मनूचीच काहीतरी चूक असणार. म्हणून मी देखील मनूलाच दम दिला तर ते पोर उपाशीच झोपलं त्या दिवशी. हळूहळू सासूबाईंचा बोलण्याचा सूर देखील बदलला. एकसारखं मनूबद्दल खोचकपणे बोलू लागल्या. म्हणायच्या ‘जन्माला आल्यावर जन्मदात्या बापाला गिळला आणि आता माझ्या मुलाला देखील गिळणार का मी सासूबाईंना समजावून सांगायला लागले तर माझीच तक्रार प्रशांतकडे केली कि, मी त्यांना उलटे बोलते. मग प्रशांतने खरं काय नी खोटं काय याची साधी विचारणा न करता मला मारहाण करायला सुरुवात केली तर मनू मध्ये पडला. तर त्याला देखील मारलं. मी त्यला पोटाशी धरून खाली पडले होते आणि प्रशांत वरून लाथा मारत होते. इतका मार बसला होता कि, मला जागचं हलता देखील नव्हतं. त्यामुळे मी स्वयंपाक देखील करू नाही शकले. प्रशांतने हॉटेलमधून जेवण आणलं आणि आमच्या समोर सासूबाई आणि प्रशांत दोघे जेवले. पण आम्हा दोघांना जेवायला देखील विचारलं नाही आणि त्यातल्या त्यात उरलेलं अन्न प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून बाहेर कुत्र्यांना टाकतो असं म्हणत प्रशांत गेला देखील. त्यादिवशी मी मनूला छातीशी धरून खूप रडले दोघेही उपाशीच झोपलो. दुसऱ्या दिवशी मला कामाला येवू नकोस असं बजावून प्रशांत गेला. मनूला मार बसल्याने तो लंगडत चालत होता म्हणून त्याला शाळेत नाही पाठवलं. साधारण आठवड्यानंतरची गोष्ट असेल, माझी जेवणावरची इच्छा उडून गेली एकसारखं मळमळायला लागलं आणि छातीत एकदम धस्स झालं. एव्हाना सासूबाईंच्या देखील लक्षात आलं डॉक्टरकडे जावून चेक केलं आणि माझा अंदाज खरा ठरला. मला दिवस गेले होते. आता प्रशांतने निर्वाणीचा इशारा दिला, मनूला या घरात अजिबात ठेवायचे नाही. मला काहीच समजेचना, हा वेगळाच धक्का होता माझ्यासाठी, मनू आणि माझ्यापासून दूर. छे..मी स्वप्नात देखील विचार करू शकत नव्हते. मी त्यांना एकांतात समजावून पहिले, कि बिचारा मनू अगदीच लहान आहे. या सर्व प्रकारात त्याची काय चूक. मला हवं तो त्रास दया मी हू कि चू नाही करणार पण मनूला माझ्यापासून दूर नका करू. तरीही प्रशांत ऐकायला तयार नव्हते त्यांनी मनूला कोणत्यातरी आश्रमात ठेवू असे सांगितले. पण मी जिवंत असताना मनू अनाथासारखा का राहील कोणत्या आश्रमात. मी निक्षून नाही सांगितले तर प्रशांत म्हणाले, कि मला   देखील मग दुसरा विचार करावा लागेल. दुसरा विचार, म्हणजे मी पुन्हा एकटी, परत दुसऱ्यांदा एकटी. मी खूप विनवणी करून पहिले पण त्यांना काहीच फरक पडत नव्हता. अशातच मनूची शाळा बंद करणार असे प्रशांतने सांगितले आणि काही ना काही कारणाने रोजच मनूला मारहाण व्हयाला लागली. मी मध्ये पडायची तर मला देखील मारहाण व्हायची. घरून वेळेत कामावर आणि कामावरून सरळ घरी. मनात असून देखील तुमच्याकडे यायला मुभा नव्हती. पूर्वी शेजारी राहणाऱ्या मावशी माझ्यासोबतच हॉस्पिटल मध्ये कामाला होत्या. न राहवून मी त्यांना हा सगळा प्रकार सांगितला. त्यांनी माझी समजूत काढली, म्हणाल्या, बघ तू आधीच एकदा पोळलेली आहेस आणि परत एकटी राहाण्याचा निर्णय घेशील तर मनू सोबत तुझ्या पोटात वाढत असलेल्या अजून एकाची भर पडेल. तुझा मनूसाठी खरंच जीव तळमळतोय याची मला कल्पना आहे. पण त्याला सोबत घेवून तू तिथे राहायचे जरी म्हणालीस तरी प्रशांत ते होऊ देणार नाही. त्यापेक्षा तू असं कर, मनूला माझ्याकडे रहायला पाठव. घरी फक्त मी आणि गोट्याच  असतो. आता गोट्या काही काम धंदा करीत नाही नुसताच उनाडक्या करत फिरत असतो. त्याचे दहावीचे दोन विषय राहिलेले आहेत ते का एकदा सुटले कि त्याला मी इथेच लावणार कामाला आणि मग मी घरीच राहणार. आणि मग मनूला सांभाळायला मला काहीच प्रोब्लेम नाही आणि तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू येत जा त्याला भेटायला. मावशींनी माझी मोठी अडचण सोडवली होती नाही मनू माझ्यासाठी अडचण वगैरे कधीच नव्हता तर त्याचीच या सगळ्या अडचणींमधून सुटका होणार होती. मी मावशींना आनंदाने होकार दिला आणि दर महिन्याला त्यांना दोन हजार रुपये मनूच्या खर्चासाठी देईल असे सांगितले. मावशीदेखील आनंदाने तयार झाल्या. मी घरी गेल्यावर एकांतात प्रशांतला सर्व सांगितले आणि त्याचबरोबर आठवड्यातून एकदा रविवारी मनूला आपल्याकडे घेवून येणार असं सांगितलं. तर तो काहीच न बोलता झोपी गेला. आता माझी मोठी कसोटी होती आणि ती म्हणजे मनूला समजावून सांगण्याची. खरं तर त्याचं समजण्याचं हे वय नव्हतंच, पण होता तो आनंद आणि सोबतच दुःख. आनंद यासाठी कि या पुढे त्याची मारहाणीमधून सुटका होणार होती आणि दु:ख याचे कि तो माझ्यापासून दुरावणार होता. मला देखील दु:ख होतंच कि पण त्याच्या आनंदासाठी ते सहन करावंच लागणार होतं. सुरुवातीचे काही दिवस ठीक गेले. मावशी मनूची योग्य काळजी घ्यायच्या मी वरचेवर मावशींकडे चौकशी करायचे. घरी जावून मनूची भेट घायायला एकसारखे जमायचे नाही कारण घरी जावून सगळे मलाच करावे लागत होते. पण एक चांगली गोष्ट घडली होती मनूला मावशीच्या इथले वातावरण आवडले होते आणि तसा बदल देखील त्याच्यात व्हायला लागला होता. चांगले जेवण, शाळा आणि मग भरपूर खेळायला मिळायचे त्यामुळे स्वारी खूपच खुश होती. मी शनिवारी कामावरून सुटले कि सरळ मावशींच्या घरी जायचे आणि मग मनूला सोबत घेवून लगेच घरी यायचे. शनिवार रात्र आणि रविवारी पूर्ण दिवस मानू माझ्यासोबत असायचा. रविवारी त्याला जेवू घालून संध्याकाळी उशिरा मावशींकडे सोडवायची.

असेच एके शनिवारी मी मनूला घेवून घरी आले, एव्हाना गरोदर आहे म्हंटल्यावर प्रशांतला माझ्या जवळ येण्याचे काहीच कारण नव्हते. त्यामुळे मी मनूला सोबत घेवून झोपले होते. मनू अगदीच निरागसपणे झोपला होता त्याला बघत आणि डोक्यावरून हात फिरवत माझ्या डोळ्यात टचकन पाणी आले. नियतीने काय काय मांडून ठेवले आहे बिचाऱ्याच्या नशिबात असा विचार करत करत माझा डोळा लागला. झोपेत मी त्याच्या पाठीवरून हात फिरवत होते. अचानक मनू झोपेत काहीतरी बरळू लागला. मला वाटलं खूप खेळला असेल म्हणून पण नाही...तो काहीतरी वेगळच बोलत होता. मी नीट कान देवून ऐकू लागले आणि त्यासरशी माझ्या एकदम अंगावर काटाच आला. मी झोपेत आहे कि काय असं वाटून मी पुन्हा ऐकू लागले. मनू बरळत होता, दादा नको ना रे...खूप दुखतंय...अरे दादा नको ना रे.... माझ्या पायाखालची जमीनच सरकली. असं वाटलं इथेच धरणी फाटावी आणि मला माझ्या मनू सोबत उदरात घेवून गडप व्हावे. मी मनूला हळूहळू थोपटले त्यासरशी तो शांत झाला आणि झोपी गेला. माझी मात्र झोप उडून गेली. काय करायला गेले आणि काय घडलं होतं. मावशींना कधीकधी हॉस्पिटलमध्ये नाईट असायची तेव्हा त्या मनूचे जेवण आटपल्याशिवाय घरून निघायच्या नाही. घरी गोट्या असल्याने त्यांना जास्त काळजी नसायची पण घरी कोणीच नाही म्हंटल्यावर गोट्याने ....शी...मनात सुद्धा कोणाच्या विचार येणार नाही असा. मनू गोट्यालाच दादा म्हणायचा आणि मनू पूर्वीसारखा गोट्याबद्दल जास्त बोलत नव्हता. त्यांच्या वयात जास्त अंतर असल्याने त्याचे मित्र वेगळे आणि याचे मित्र वेगळे असं वाटून मी देखील जास्त खोलात जावून विचारले नव्हते. कारण गोट्या असे काही करेल आणि तेही एका मुलासोबत...याचा साधा विचार देखील मनात आला नव्हता. मी रात्रभर भकासपणे अंधारात पाहत जागीच राहिले. काय नशिबाचा फेरा... अजून काय काय पुढे वाढून ठेवले कोणास ठावूक. आधीच देवावरून विश्वास उडालेला होता आणि आता माणसांवरून देखील. दुसऱ्या दिवशी बाहेर काम आहे असं सांगून मनूला घेवून बाहेर पडले. आम्ही बागेत गेलो. मनूसोबत बोलायचे होते पण कसे आणि काय बोलावे हेच समजत नव्हते. मनूला एका बाकावर बसवून मी त्याची आवडती ओली भेळ घेवून आले. ओली भेळ पाहिल्यावर मनू एकदम खुश होईल असं वाटलं पण त्याने अगदी यंत्रवतपणे हातातली भेळ घेतली आणि खावू लागला. मला जोरजोरात गळा काढून रडावसं वाटलं, का? काय हे माझ्या मनूच्या नशिबात...काय कोणाचं वाईट केलंय त्यानं....का त्याच्या नशिबात या लहान वयात हे असले भोग....कसबसं स्वतःला सावरत मी मनूला विचारलं तर सुरुवातीला काहीच बोलेना. त्याला विश्वासात घेवून सांगितलं कि, आजपासून तुला मावशीकडे अजिबात पाठवणार नाही. त्यासरशी तो बोलला,खरंच नाही पाठवणार ना. माझी मात्रा बरोबर लागू पडली होती. मनूने मग सर्वकाही काही सांगितले. मावशी हॉस्पिटलला नाईटला गेल्या कि, गोट्या उशिरा रात्री घरी यायचा आणि टीवी बघत मनूच्या जवळ जावून झोपायचा. मनूला सुरुवातीला काहीच वाटलं नाही पण मग नंतर नंतर गोट्या बिअर पिऊन यायचा आणि टीवी बघत बघत मनूसोबत घाणेरडे चाळे करायला लागला. सुरुवातीला मनूने त्याला खूप प्रतिकार केला पण गोट्याच्या ताकदीपुढे मनूचे काहीच चालले नाही. कार्यभाग उरकल्यावर गोट्याने मनूला धमकी दिली कि, जर त्याने हा प्रकार मावशीला किंवा तुझ्या आईला सांगितला तर तुला खूप मारेल आणि घरातून हाकलून देईल. बिचारा मनू भीतीने काहीच बोलला नाही. मावशी नाईटला गेल्या कि, मनूला अश्या घाणेरड्या प्रसंगाला सामोरे जायला लागायचे. हे सगळे ऐकल्यावर माझ्या डोळ्यासमोर अंधारीच आली आणि त्याचबरोबर त्या अंधारात एक आशेचा किरण दिसला...तुम्ही. आणि तडक मनूला घेवून मी तुमच्याकडे आले. आता तुम्हीच माझ्या मनूला यातून बाहेर काढा. काहीतरी मार्ग सुचवा. त्यासरशी सुधा ढसाढसा रडायला लागली.      
   
हे सगळे प्रकरण ऐकून माझे शरीर थंड पडत चालले होते माणूस म्हणून जिवंतपणाची कोणतीच लक्षणे मला माझ्यात जाणवत नव्हती. अश्या कोवळ्या वयाच्या मनूवर कोणी कसा काय अत्याचार करू शकतो. त्याच्या बालमनावर एवढा मोठा आघात होवूनही बिचारा शांतपणे सहन करत होता. कारण त्याला इकडे आड अन तिकडे विहीर दिसत होती. इतकं असह्य करून त्याचं निरागसपणे जगणे कसं काय हिरावून घेवू शकतो कोणी. मी नक्की कोणाचे सांत्वन करावे हेच माझे मला समजत नव्हते, मनुचे कि सुधाचे. यातून मार्ग तर काढावाच लागणार होता. कारण प्रशांत काही केल्या मनूला त्याच्या सोबत घरी राहू देणार नव्हता आणि मावशीच्याकडे पाठवायचा विचार देखील मनात येत नव्हता. सुधा अपेक्षेने माझ्याकडे पाहत होती, तिला माहित होते कि,मी नक्कीच यातून मार्ग काढू  शकते. डोकं तर एकदम सुन्न झालेलं होतं आणि एकदम एक नाव समोर आलं, ‘उदय बालकाश्रम’. माझ्या नवऱ्यासोबत एकदा या आश्रमात कार्यक्रमा निमित्त गेले होते. त्याच्या ऑफिसमधील एक सहकारी जो उच्च पदावर काम करीत होता. तो याच आश्रमात शिकलेला आणि आता आय.टी. कंपनीत माझ्या नवऱ्यासोबत काम करीत होता. मी जाण्यास इतकी उत्सुक नव्हतेच कारण तिथे गेल्यावर त्या अनाथ मुलांची केविलवाणी आणि समोरच्या प्रत्येक स्त्रीमध्ये आई शोधणारी नजर पहिली कि, अगदी उचंबळून येतं. आणि मग पुढचे काही दिवस अन्न देखील गोड लागत नाही. आपण फक्त जायचे, थोडे पैसे, धान्य आणि त्यांच्या बद्दल कळकळ व्यक्त करायची माझ्या दृष्टीने हा एकप्रकारे देखावाच होता. कारण त्या मुलांना या सगळ्यापेक्षा आई बाबा हवे असतात. अन नेमकं आपण तेच त्यांना देवू शकत नसेल तर मग तिथे जाण्यात काय अर्थ आहे. पण त्या आश्रमात गेल्यावर माझा सगळा भ्रम दूर झाला. आतापर्यंत पाहिलेल्या आश्रमांपेक्षा हा नक्कीच खूप वेगळा आश्रम होता. इथे कोणीही तुमच्याकडे, मला तुमच्या घरी घेवून जा अश्या केविलवाण्या नजरेने पाहत नाहीत. सगळीच मुले आनंदाने तिथे राहतात, त्यांना मिळणारे शिक्षण देखील उच्च दर्जाचे होते आणि तीच गोष्ट जेवणाबाबत देखील. हि सगळी मुलं स्वतःची सगळी कामे स्वतःच करतात आणि याच स्वयंसिद्धतेमुळे चांगले शिक्षण घेवून इथली मुलं इंजिनिअर,डॉक्टर, पोलीस खात्यात उच्च पदावर पोहोचली होती. इतके भारावलेलं वातावरण मी कधीच पहिले नव्हते. मी सुधाला हि सगळी माहिती दिली आणि मनूला तिथे पाठवायला सांगितले. रविवार असल्याने आमचे हे क्लब मध्ये गेलेले होते. त्यांना लगोलग फोन करून त्याच्या सहकाऱ्याला मनूसाठी शिफारस देण्यास सांगितले. तो सहकारी यांच्या सोबत असल्याने त्याने लगेच तसे केलेही. मी सुधा सोबत बोलतच होते इतक्यात यांचा फोन आला आणि मनूला दुसऱ्या दिवशी आश्रमातल्या ऑफिसमध्ये घेवून जायला सांगितले. सुधाला प्रचंड आनंद झाला, तिच्या डोळ्यात पाणी तराळलं. दोन्ही हात जोडून ती माझ्याकडे फक्त पाहत होती. मी तिचे दोन्ही हात हातात घट्ट धरून ठेवले. तो आश्वासक उबदार स्पर्श तिला खूप काही सांगून गेला. दुसऱ्या दिवशी मी तिच्यासोबत आश्रमात गेले. मनू थोडा भांबावलेला होता, बिचाऱ्याला काहीच समजत नव्हते. ऑफिसमध्ये मी ओळख सांगितल्याबरोबर सगळे सोपस्कर लवकरच पार पडले. मनू अजूनही भीतीच्या छायेखाली होता. त्याने सुधाचा हात घट्ट धरून ठेवलेला होता. सुधाने सगळ्या कागदपत्रांवर सह्या केल्या आणि माझ्याकडे पहिले. मी तिला खुणेनेच मनूला बाहेरच्या बागेत घेवून जायला सांगितले. सुधा मनूला घेवून बाहेर गेली. मी खिडकीतून बाहेर पाहत होते. एका बेंचवर दोघे बराचवेळ काहीतरी बोलत बसले होते. थोड्यावेळाने सुधा मनूला घेवून आली. आता मनूने सुधाचा मघाशी घट्ट धरून ठेवलेला हात सोडला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच स्मित दिसत होते...आत्मविश्वासाचे आणि निरागसपणाचे. सुधाने कसेबसे स्वतःला सावरले आणि मनूला पुन्हा भेटायला येत जावू असे सांगून आम्ही बाहेर पडलो. पुढे जात असताना देखील सुधा एकसारखी मागे वळून मनूला पाहत होती. शेवटी मनू नजरे आड झाला तसं मी सुधाला विचारले कि तू मनूला असं काय सांगितलं कि, तो एकदम तयार झाला इथे रहायला. सुधाच्या डोळ्यात मला पाणी दिसत नव्हते तर दिसत होता एक वेगळाच आत्मविश्वास. सुधा म्हणाली, आधी मनू तयारच होत नव्हता. मी मनूला फक्त इतकेच सांगितले कि, इथे  रजिस्टरमध्ये मी तुझे संपूर्ण नाव लिहिताना लिहिलंय....मनीष विनायक पाटील. त्यासरशी मनूने माझायाकडे चमकून पहिले. बऱ्याच वर्षानंतर माझ्या तोंडून त्याच्या बाबाचे नाव ऐकल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी आले. इतके दिवस फक्त प्रशांतचा मार खाणाऱ्या, आपल्या शरीरावर होणारे अत्याचार सहन करणाऱ्या माझ्या मनूच्या डोळ्यात अश्रू यायचे पण ते असाहयतेचे. आज मी त्याच्या डोळ्यात जे अश्रू पहिले ते आनंदाचे होते. इतका वेळ घट्ट धरून ठेवलेला माझा हात त्याने सोडला. त्याचे अश्रू पुसत मी त्याला फक्त एवढंच म्हणाले, मनू खूप खूप शिक आणि माझ्या विनायकचे, तुझ्या बाबाचे नाव मोठे करहे सांगत असताना फक्त सुधाच नाही तर माझा देखील बांध फुटला. आम्ही दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून रडलो. मनूच्या जगण्याला एक नवी उमेद दिल्याने सुधा पुन्हा पुन्हा माझे आभार मानत होती आणि मी....अश्रूंनी भरलेले डोळे रुमालाने टिपत होते. .

डोळ्यावरचा चष्मा काढला, अश्रू पुसले अन एकवार चष्मा डोळ्यांवर चढवून पुन्हा ती बातमी वाचू लागले. ‘उदय बालकश्रमातील, मनीष विनायक पाटील आय.ए.एस. परीक्षेमध्ये देशात अव्वल’. पुन्हा डोळ्यात पाणी जमा झाले. अन इतक्यात गेटचा आवाज आला. कशीबशी उठून खिडकीपाशी गेले तर सुधा...हो सुधाच ती...आणि तो....मनीष विनायक पाटील, आय.ए.एस. ऑफिसर.


-सुरेश सायकर