Wednesday 25 April 2018

"ती"....

अनुभवलंय का तू मला,
कि फक्त भोगलंयस,
नजरेनं...


अनुभवणं म्हणजे काय ?
हे तरी माहिती आहे ?  
ग्रीष्मातल्या काहिली करणाऱ्या रानात,
आसुसलेल्या ढेकळांमध्ये,
जेव्हा पाटाचं पाणी वाहत तळपायाला येऊन लागतं,
तेव्हाचं तापलेल्या मातीचं आणि पाण्याचं एकजीव होणं,
कधी अनुभवलंय...


ते अनुभव,
ते अनुभवलंस तरच समजेल,
उपभोगणं आणि अनुभवणं यातला फरक....  
  

एकजीव होणं,
आणि हक्काचं म्हणून कधीही पायदळी तुडवणं,
यातला फरक जेव्हा समजेल,
तेव्हाच समजेल, "ती"....




- सुरेश तुळशीराम सायकर

Saturday 14 April 2018

इमान...

थोडक्या भुरळीला भुलणाऱ्या,
आज इथं तर उद्या तिथं,
अश्या टुणकन उड्या मारणाऱ्या खोट्या माणसा,
इमान....जनावरांकडून शिक....

भुकेला असताना घासातला घास दे,
जीवाला जीव तो देईन,
पण माणूस नावाचा मतलबी प्राणी,
उद्या तोच तुझा घास हिरावून घेईन....

तू भुकेकंगाल होणार नाहीस,
मात्र, गलितगात्र होशील,
अश्या पाठीतल्या वारांनी,
दिसली नाही जरी ती जखम,
भळभळत मात्र राहीन आयुष्यभर....अश्वत्थामासारखी...

एवढं घडून गेल्यावर,
एकच विनंती करीन,
माणसांवरचा विश्वास उडू देऊ नकोस कधीच,
कारण सैतान डोक्यात अन,
निर्मळता हृदयात असते.... कधी कधी....

पण हे मात्र खरं,
माणसातला चांगला, वाईट, 'माणूस' ओळखायला,
'अनुभव' अनुभवायलाच लागतो,
रक्ताच्या ग्रुप सारखा, पॉझिटीव्ह...निगेटिव्ह,
नाहीतर तो बाजारात उघड्यावर विकला गेला असता,
किंवा मागवता आला असता ऑनलाईन...स्पेशल ऑफरमध्ये...

म्हणूनच म्हणतो,
माणसातल्या 'माणुसकीला' विसरणाऱ्या माणसा,
इमान....जनावरांमध्ये शोध...

- सुरेश तुळशीराम सायकर