Saturday 18 May 2019

वर्गवारी

माणसाला,माणसातला 'माणूस' अभिप्रेत असतो. पण अनेकदा तो चंगळवादाचा शिकार बनल्याने जिवंतपणी माणसामधला 'अभि' वजा होऊन 'प्रेत' शिल्लक राहिलंय. जे फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करते. बरं, याला देखील माणूसच कारणीभूत असतो. कारण मनुष्यप्राण्याला एक दुसऱ्याची ईर्षा आणि कॉपी करण्याचा गुण जन्मजातच  मिळालेला असतो. तो 'असा' तर मग मी देखील त्याच्यासोबत 'असंच' वागलं पाहिजे, जर मी 'तसं' वागलं तर तो माझा वापर करून घेईल, अशी समजूत करून घेतल्याने माणसामाणसातले अंतर हे अंतरानेच नव्हे तर मनातल्या अढीने देखील वाढल्याचे दिसते. याला समाजामध्ये असलेले वर्ग देखील तितकेच कारणीभूत, निम्नवर्ग,मध्यमवर्ग,उच्चवर्ग. अश्या वर्गामध्ये समाज मोडल्याचे वरवर जरी दिसून येत असले तरीही त्या प्रत्येक वर्गामध्ये आणखीन उपवर्ग अस्तित्वात आलेले नाहीत तर जन्माला घातले गेले आहेत.

म्हणजेच, 'निम्नवर्गा'मध्ये मोडणारा दुसरा वर्ग म्हणजे उच्च-निम्नवर्ग, ज्याकडे किमान दैनंदीन गरजा पूर्ण करण्याचा आवाका असतो आणि सोबतच चंगळवादाची चव चाखण्यासाठी  प्रसंगी कर्जाच्या फेऱ्यात अडकण्याची देखील तयारी असते . पण असे असूनही ते स्वतःला मात्र निम्नवर्गातले असल्याचे मानायला तयार होत नाहीत आणि त्यांची स्पर्धा ही मध्यमवर्गीयांसोबत असते.

असाच काहीसा प्रकार 'मध्यमवर्गीयां'मध्ये दिसून येतो. यामध्ये देखील उच्च-मध्यमवर्गीय हा उपवर्ग निर्माण झालेला आहे. जो गरजेपेक्षा जास्त आणि ताळमेळा पेक्षा अधिक खर्च करण्याची उसनी ताकद राखून असतो. ज्यांची खरी स्पर्धा ही उच्चवर्गीयांसोबत असते.

तिसरा वर्ग म्हणजे, उच्चवर्गीय. या उच्चवर्गीयांमध्ये देखील अति-उच्चवर्ग हा उपवर्ग निर्माण झालेला नसून सोयीने निर्माण केलेला असतो. आपण उच्चवर्गीयांपेक्षा वेगळे आहोत, हे दाखवण्यासाठी एकमेकात चढाओढ होते. मग आलिशान जीवनाचे अतिरंजित आणि अतिरंगीत प्रदर्शन भरवले जाते. मग या सगळ्याचे अति- झाल्यावर वर्ग चा उलटा शब्द केल्यास गर्व होतो.आणि मग अति गर्व झाल्यास निम्नवर्ग, मध्यमवर्ग, उच्चवर्ग हे आपले सेवक आणि आपणच तारणहार अश्या गैरसमजातून समाजातील दुही वाढण्यास प्रारंभ होतो आणि खऱ्या अर्थाने तीच खरी समाजपरिवर्तनाची नांदी असल्याचे द्योतक आहे.

या सर्वासाठी काही अंशी म्हणण्यापेक्षा खूप जास्त कोणी कारणीभूत असेल तर ती म्हणजे आपली, शिक्षणसंस्था. याचे जिवंत आणि छोटे उदाहरण म्हणजे, इयत्ता पहिली च्या अनेक तुकड्या असतात. अ,ब,क, ड अश्या तुकड्या(वर्ग) निर्माण केल्या जातात. हुशार मुलांची 'अ', कमी हुशार मुलांची 'ब', त्याहून कमी हुशार मुलांची 'क' आणि अजिबात हुशार किंवा उडानटप्पू मुलांची 'ड' (जी चा उल्लेख 'ढ' असा केला जातो.) जर मुलांमध्ये याच वयामध्ये फरक व्हायला लागले आणि प्रत्येक 'अ' वाला 'ब', 'क', 'ड' यांना आपल्यापेक्षा कमी समजायला लागला आणि 'अ' वालेच श्रेष्ठ असं मानून 'अ' वर्गात जाण्यासाठी म्हणजेच उच्चवर्गामध्ये जाण्यासाठी धडपडू लागला, तर माणसाला, माणसातला अभिप्रेत असणारा माणूस, त्यातून 'अभि' वजा होऊन 'प्रेत' होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही.

- सुरेश तुळशीराम सायकर



               

Saturday 4 May 2019

#स्वप्नांचं गाव

स्वप्नांचं गाव माहिती आहे का?
रस्ता अवघड आहे
सोप्पा करून सांगतो....
 
अपेक्षांचं ओझं
घुसमटीचा उच्चांक
भावनेचा उद्रेक
मेंदूचा ३६० डिग्री शॉट
भरीस भर म्हणून
अपयशाची भली मोठ्ठी रांग
त्या रांगेत फक्त आपणच
दुसरं कोणीच नाही
असं आपल्याला वाटतं
खरं तर
दृश्य भ्रम असतो तो
कारण आपल्याला फक्त
आपलीच स्वप्ने दिसत असतात
दुसऱ्यांची वेगवेगळी असतात
आणि आपल्याला त्यांच्या स्वप्नांशी
काहीच घेणं देणं नसतं
म्हणून
आपल्याला जशी त्यांची दिसत नाही
अगदी तशीच
त्यांना आपली स्वप्ने दिसत नाहीत....

पण हो,
ती फक्त एखाद दुसऱ्याला
दिसू शकतात
जेव्हा त्याची आणि तुमची स्वप्ने
एकसारखीच असतात
मग वाटा दूर असल्या तरी
जवळच्या वाटतात
काटेरी वाटांच्या वाटेत
स्वप्नांचे गुलाब फुलतात....

गप्पांमधून स्वप्नांमध्ये
रंग भरले जातात
हवे तसे पुसता येतात
हवे तसे पुन्हा भरता येतात
सुरुवातीचे रंगीबेरंगी रंग
कालांतराने
मग दोनच रंगात उरतात
पांढरा अन काळा
मग हळूहळू
वाटा बदलतात
फक्त
वाटा बदलतात
पण स्वप्ने तीच असतात....

कट...

- सुरेश तुळशीराम सायकर