Saturday 4 May 2019

#स्वप्नांचं गाव

स्वप्नांचं गाव माहिती आहे का?
रस्ता अवघड आहे
सोप्पा करून सांगतो....
 
अपेक्षांचं ओझं
घुसमटीचा उच्चांक
भावनेचा उद्रेक
मेंदूचा ३६० डिग्री शॉट
भरीस भर म्हणून
अपयशाची भली मोठ्ठी रांग
त्या रांगेत फक्त आपणच
दुसरं कोणीच नाही
असं आपल्याला वाटतं
खरं तर
दृश्य भ्रम असतो तो
कारण आपल्याला फक्त
आपलीच स्वप्ने दिसत असतात
दुसऱ्यांची वेगवेगळी असतात
आणि आपल्याला त्यांच्या स्वप्नांशी
काहीच घेणं देणं नसतं
म्हणून
आपल्याला जशी त्यांची दिसत नाही
अगदी तशीच
त्यांना आपली स्वप्ने दिसत नाहीत....

पण हो,
ती फक्त एखाद दुसऱ्याला
दिसू शकतात
जेव्हा त्याची आणि तुमची स्वप्ने
एकसारखीच असतात
मग वाटा दूर असल्या तरी
जवळच्या वाटतात
काटेरी वाटांच्या वाटेत
स्वप्नांचे गुलाब फुलतात....

गप्पांमधून स्वप्नांमध्ये
रंग भरले जातात
हवे तसे पुसता येतात
हवे तसे पुन्हा भरता येतात
सुरुवातीचे रंगीबेरंगी रंग
कालांतराने
मग दोनच रंगात उरतात
पांढरा अन काळा
मग हळूहळू
वाटा बदलतात
फक्त
वाटा बदलतात
पण स्वप्ने तीच असतात....

कट...

- सुरेश तुळशीराम सायकर 

No comments:

Post a Comment