Wednesday 6 February 2019

नाक-पुराण

हा हा हा हा.....म्हणता तो दिवस आला. राज्याच्या स्वर्गवासी महाराणीचा पुनर्जन्म झाल्याची आणि राज्यात कुठल्यातरी घरी जन्मल्याची माहिती,पंचांग बघून पंडितांनी दिली. मग काय धुराळच....सगळे धुरिणी हात-पाय डेटॉलने स्वच्छ धुवून शोध कार्याला लागले. पण महाराणीचा पुनर्जन्म झाल्याची कोणती खूण त्या बालिकेमध्ये शोधायची, हा यक्ष प्रश्न नमक वाल्या कोलगेटने ब्रश करून 'आ' वासून समोर उभा ठाकला. तेव्हा नेहमीप्रमाणे पंडितांनी पुन्हा एकदा पंचांग काढून,विनाकारण २०-२५ पानं मागे-पुढे उलटवून, एका पानाच्या, दहाव्या (अरे बापरे....पुन्हा दहावा) एके ठिकाणी बोट ठेवून सांगितले,"महाराणीच्या आणि नवजात बालिकेमध्ये एक अनन्यसाधारण साधर्म्य आहे आणि ते म्हणजे... महाराणीचं आणि त्यांच्या पुनर्जन्मित  राजकन्येचं नाक.... शेम टू शेम आहे ('शेम' हा प्रचलित भाषेतील उच्चार आहे...प्युअर इंग्रज व्यतिरिक्त इतरजण याचा उच्चार 'सेम' असा करतात) ...euuuuuuuu...."(हे आजकाल सर्रास फेकबुकावर वाचायला आणि पाहायला मिळतं....म्हणजे अत्यंत घाईचा आणि जोरकस आनंद (आनंद...हा फसवा असतो....स्वानुभव) झाला कि, मंडळी आपला आनंद असा व्यक्त करतात. पंडितांनी वर्णन केल्या-केल्या सर्व सरदारांमध्ये उत्साहाचं वाता-वरण(साखर टाकून) निर्माण झालं. सर्व सरदार, "हुर्रर्रार्रार्रा...हुर्रर्रार्रार्रा.....हुर्रर्रार्रार्रा......" (ह्या जयघोषाचे अधिकार फक्त राजघराण्यापुरतेच  मर्यादित आहेत. आपण आपलं साधं.... 'चांगभले' बरं) असं म्हणून एकदाचे कामाला लागले.          
      
साऱ्या राज्यात दवंडी पिटली, "ऐका हो ऐका.....इकडून आलू सोडा, तिकडून सोना काडा...(अय येड्या....युवराजांची नॅशनल स्लो-गन हाये ती) राज्यातल्या सर्व प्रजेला कळविण्यात अत्यंत आनंद (अरे ह्यो फसवा असतोय रं) होत आहे कि, आपल्या स्वर्गवासी महाराणींचा पुनर्जन्म झालेला आहे हो........(ढुम...ढुम....ढुम....ढुम..... आं....कशी काय अय मुजिक.... येक नम्बर ना) महाराणीच्या आणि नुकत्याच जन्माला आलेल्या स्त्री अर्भकामध्ये एक विलक्षण, अद्भुत, जगावेगळे, रम्य हि स्वर्गाहून लंका पेक्षा भारी, साम्य आहे...आणि ते आहे..... नाकाचे..... होय, बरोबर ऐकलान (कोकणी लहेजात...) तर धारदार नाकाचे अर्भक जेव्हा सापडेल, ज्याच्या कडे सापडेल, हुकुमाप्रमाणे त्याला ताब्यात घेऊन राजवाड्यात आणून, भावी महाराणी म्हणून घोषित करण्यात येईल....... हो ......हो ......हो ......(आरं सोड कि मुजिक....एकांकिका संपायला लागलीया) ढुम...ढुम....ढुम....ढुम....."   

राज्यातील प्रजा विचारात, चिंतेत पडले. कारण राज्यात काही दिवसांमध्ये स्त्री अर्भक जन्मालाच आलेले नव्हते (भाऊ...आजकाल समद्यांना...मिशन मदून सोना काडणारा वंशाचा दिवाच पायजे असतो ना.) तरीही संबंधित अधिकारी, राज्यात सगळीकडे शोध घेऊ लागले. पण काही केल्या त्यांना नाकाशी साधर्म्य असणारे, स्त्री अर्भक सापडेना. काहींनी आपलं बाळ, राजवाड्यात जावं, भावी महाराणी म्हणून घोषित व्हावं म्हणून प्लास्टिकचं खोटं नाक लावून पाहिलं... पण सर्दीचा मोसम असल्याने, अर्भकाने तो डाव हाणून पाडला...कसं काय विचारता...कफामुळे आणि सर्दीमुळे एकसारखं गळणाऱ्या नाकावर प्लास्टिकच काय तर चांभारी दोऱ्याने खोटं नाक जरी शिवलं तरी ते फुर्रर्र दिशी उडून जाईल (खात्रीसाठी सर्दी झालेल्या लहान अर्भकासोबत एक दिवस व्यतीत करून पाहावे). आता काय क्रावे ब्रे....असा मोठा यक्ष प्रश्न पडला.                                 

खोदा चुहा अन निकली बिल्ली किंवा काखेत कळसा आणि पळसाला पाने तीन (काहीतरी चुकलंय....नाही...पंचांगामध्ये नाहीये ते) वगैरे वगैरे. तर महाराणीचा पुनर्जन्म हा कोणत्या झोपडीत, कोणत्या वाड्यात, कोणत्या फ्लॅटमध्ये, कोणत्या ब्लॉकमध्ये, कोणत्या बंगलोमध्ये, कोणत्या रो-हाऊसमध्ये, कोणत्या सेकंड होम (फॉर लेट नाईट पार्टी स्पेशल)मध्ये झालेला नव्हता (आणि होत पण नसतो.... काय??? कोण म्हणालं रे...घराणेशाही...बरं पुढे) तर दूरदेशी, साक्षात एका राजवाड्यातच झालेला होता. मग काय म्हणता,त्या नवजात अर्भकाला डायरेक्ट स्पेशल विमानाने राज्यात आणले गेले. रस्त्यावर जनता दुतर्फा, नाक साधर्म्य असणारी भावी महाराणी पाहण्यासाठी दाटीवाटीने उभी राहिलेली होती. नावाचा एकसारखा जयघोष सुरूच होता. विमानाचे दार उघडले गेले आणि सध्याच्या राणीने खुद्द, साक्षात ते अर्भक आपल्या दोन्ही हातात घेऊन, प्रजाजनांना दाखवण्यासाठी आकाशामध्ये उंचावले (भाऊ-बळी स्टाईल). त्या सरशी "हुर्रर्रार्रार्रा...हुर्रर्रार्रार्रा.....हुर्रर्रार्रार्रा......" या जयघोषाने आसमंत दुमदुमला आणि क्षणातच सगळे वातावरण नाकमय झाले.  

क्रमशः 

आं.....काय म्हणालात? नाकात काय आहे? भाऊ, नाकातच तर नथ फसलीये ना.....स्वर्गवासी महाराणीच्या कर्तृत्वाची उंची, एवढी उंच आहे ना....तिथवर पोहचायला आत्ताच्या पिढीला २ काय तर चांगले ३-४ जन्म लागतील. My IRON LADY.

-  सुरेश तु. सायकर 

No comments:

Post a Comment