Saturday 2 February 2019

#बिर्याणीपुराण

शेवटी अप्पा गेलेच.
गेली 4 वर्षे अप्पा अंथरुणाला खिळून होते. उभी हयात घर आणि मुलांना सावरण्यात आणि मोठं करण्यात गेली. जोवर अप्पांचे हात-पाय चालू होते, तोपर्यंत घरात अप्पा एक आदरणीय व्यक्ती होती. पण जशी अप्पांची रिटायरमेंट झाली आणि जवळच्या पैशांचे वाटप झाले. तसतशी अप्पांची आदरणीय प्रतिमा सावलीसारखी लहानलहान होत अदृश्य झाली. एकवेळच्या गोडीगुलाबी बोलण्याला भुलून अप्पा स्वतःला स्वर्गात समजायचे तेच अप्पा आता एकवेळच्या अन्नालाच काय तर एका घासाला पण महाग झाले होते. स्वतःच्याच घराचे वासे फिरले, तर हा पामर तरी काय करणार? या विचाराने अप्पांनी आहे ते, जसे ते, प्राक्तन म्हणून स्वीकारले.

शेवटी, पाचव्या वर्षी अप्पांनी देह ठेवला. एका घासाला महाग झालेल्या अप्पांच्या आत्म्याला शांती लाभावी, म्हणून त्यांचा 10वा मात्र जोरात करण्याचा विचार त्यांच्या घरच्या सदस्यांनी बोलून दाखवला. त्यांना कोणीतरी सांगितले की, अप्पांना इब्राहीमच्या "A-1 दमादम बिर्याणी हाऊस" इथली चिकन बिर्याणी खूपच आवडायची. खरं तर अप्पांनी तिथं बिर्याणी कधी खाल्लेली नव्हतीच. बिर्याणी महाग, एकवेळच्या बिर्याणी मध्ये घरात गरजेच्या किती तरी वाण सामानाच्या वस्तू येतील, या विचाराने अप्पांनी इब्राहीम च्या हॉटेल पासून जाताना, फक्त बिर्याणीचा 'सुगंधावरच' आपली भूक भागवली होती. विचार केलेला की, रिटायरमेंट नंतर हातात वेळ आणि बँकेत पैसा जमा झाल्यावर, खाऊ बिर्याणी हवी तितकी. पण गरज सरो आणि वैद्य मरो, अशी अप्पांची रिटायरमेंट नंतर अवस्था झालेली. घरातच तुकडा मिळेना तिथं हॉटेलात जाऊन खायला पैसा कोण देणार.
पण घरातल्या कर्त्यांना उशीरा का होईना 5व्या वर्षी(अप्पा गेल्यानंतरच्या :) ) जाग आलीच. त्यांनी ठरवलं की, अप्पांच्या 10व्याला, इब्राहीमच्या "A-1 दमादम बिर्याणी हाऊस" मधून चांगली,खूप ,लय, भरपूर अशी 1 किलो चिकन बिर्याणी आणायची आणि अप्पांच्या 10व्याला त्यांना नैवेद्य दाखविताना वाढायची. मग काय अनुपम सोहळाच, हा...हा म्हणता, अप्पांचा 10वा साजरा करायचा दिवस उजाडला. इब्राहिमला आधीच सांगून ठेवल्याने, त्याने खास अप्पांसाठी ताजी, गरम बिर्याणी बनवून 9 वाजताच तयार करून ठेवली. सदस्यांनी ( घरच्या :) ) रस्त्याने जात असताना, अप्पांसाठी चिकन बिर्याणी असं म्हणत, लोकांना भुरटे प्रेम दाखवत, नाचवत बिर्याणी घरी आणली. चांगली 1 किलो बिर्याणी...पण जसे बिर्याणीच्या पिशवीचे तोंड उघडले तसा मसाल्याचा, चिकनचा आणि स्पेशल राईसचा सुरेख संगम होऊन, घरातल्या प्रत्येक सदस्याच्या नाकात घुसला. मग पोटातल्या कावळ्यानी त्या डोम कावळ्यांना (सदस्यांना... घरच्या :) ) साद घातली. सर्व सदस्य, तोंडला सुटलेले पाणी कसेबसे जिभेने आत सरकवत, ओठांनी आतल्या आत रोखत एकमेकांकडे आशाळभूत नजरेने पाहू लागले. कोणत्या पर्स मध्ये किती माल आहे, हे न बोलता, भर रस्त्यावर लुटणाऱ्या चोरांनाच नजरेची भाषा फक्त कळते, हे साफ खोटे ठरवत, सदस्यांनी(घरच्या :) ) ठराव केला की, मेलेला माणूस, खरंच कधी येऊन घास खाल्याचे कोणी पाहिलंय का? आणि जर खात असेल तर त्याचा सीसीटीव्ही पुरावा आहे का? तर मग अप्पाच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून, केवळ श्रद्धा म्हणून, .500 (पॉईंट पाचशे ग्रॅम...हां ) बिर्याणी त्यांच्या फोटोसमोर नैवैद्य म्हणून ठेवावी, अशी 'अर्थ'पूर्ण 'संकल्प'ना मांडली आणि उरलेली.....सुज्ञास सांगणे न लागे (जे की काय असेल ते)

शेवटी काय.... तर, अप्पांच्या वाट्याला बिर्याणी खाणे नाहीच...1 किलो असो वा .500 ग्रॅम...शेवटी त्यांना 'सुगंधावरच' भागवावे लागले.

काय 'अर्थ'य असल्या 'संकल्पां'ना....
असो.

-सुरेश तु. सायकर

No comments:

Post a Comment