Monday 12 August 2019

#चंद्रा_अन_महापूर (दीर्घ कविता)



गोठ्यात व्यालेल्या चंद्राने
मोठमोठ्यानं हंबरून
गोठाच काय तर आजूबाजूची
आठ दहा घरं डोक्यावर घेतली होती...

आपल्या खरबरीत जिभेनं
तिनं कालवडीला चाटून पुसून
एकदम साफ केलं होतं
अन कालवडीची कोवळी,सोनेरी
कातडी एकदम रेशम सारखी
चमचम चमकत होती
कोवळ्या उन्हात
कालवडीला आपल्या कोवळ्या खुरांवर
धडपडत, सावरत कसंबसं उभं राहताना पाहून
चंद्राच्या डोळ्यात पूर्णत्वाची अन
मायेची वेगळीच चमक दिसत होती...

पोरांनी तर नुसता धुडगूस
घातलेला होता
जो तो कालवडीच्या कोवळ्या
कातडीवरून हात फिरवत होता
पोटूशी असताना
धन्याशिवाय आजूबाजूला
कोणालाही फिरकू न देणारी
चंद्रा आज कौतुकानं पोरांचा
कालवडीशी चाललेला खेळ
निवांत न्हयाळात होती
भरल्या डोळ्यांनी....

आज येरवाळीच
अंधारून आलं
काळ्याकुट्ट ढगांनी
चंद्राच्या कालवडीला
बघायला गर्दी केली काय
असं वाटावं इतकी दाट गर्दी....

विजांनी एकदम तांडवच
सुरू केलं
चंद्राची एकदम गडबड उडाली
खाटंवरून लेकरू
एका कुशीवरून खाली
पडतंय की काय
असं वाटत असताना
ओल्या बाळंतिणीला लेकराच्या
काळजीनं जसं मायेचं भरतं येऊन
बाळाला वाचवायला ताकद येते
तशी चंद्रामध्ये एकदम ताकद आली
आणि ती खुंटी भोवती गोलगोल
फेऱ्या मारायला लागली....

धन्यानं तिच्या पाठीवरून
हात फिरवून आश्वस्त केलं
पण चंद्रा काही शांत होईना
बाहेर पाऊस आणि
आत चंद्रा
दोघांचा जोर वाढलेला होता....

बराच उशिरापर्यंत
ना चंद्राच्या ना धन्याच्या
डोळ्याला डोळा लागला होता
गोठ्यात बाज टाकून
चंद्राच्या जवळ बसलेल्या धन्याला
मध्यरात्री अचानक डोळा लागला
हाताला गार गार लागल्यानं
साप पांघुरणात घुसलं
की असं वाटून धन्यानं
सावध होत
हळुवार डोळं उघडलं तर
समोर गुडघाभर पाणी
डोळे चोळून खात्री केली
पाणीच ते
त्यानं घाबरून चंद्राकडं पाहिलं
चंद्रा अवसान गळून गेल्यासारखी
झाली होती
धन्यानं एकदम पांघरून भिरकावून दिलं
कालवडीच्या उचलून
बाजं वर ठेवायला गेला
तर ते हातपाय झाडायला लागलं
अन त्याची कोवळी खुरं
बाजंमध्ये अडकायला लागली
व्याल्याने चंद्राची
उरलेली निम्मी अधिक
ताकद हंबरून गेलेली
आता ती हताशपणे
नुसतीच धन्याकडं बघत होती
अपेक्षनं....

धन्यानं, घरच्यांना आवाज दिला
मग काय एकच कल्लोळ
जो तो आपापल्या घरातून
जीव वाचवायला
बाहेर पडायला लागला
बघता बघता पाणी
कमरेच्या वर जायला लागलं
धन्यानं कालवडीला
लोखंडी पिंपावर उभं केलं
अन पायांच्या मिठीत
कसंबसं पिंप धरू पाहत होता....

चंद्राच्या डोळ्यातून
धारा वाहत होत्या
ती एकवार कालवडीकडं
अन एकवार धन्याकडं बघत होती
आशेनं....

जो तो जीव वाचवायला
धावपळ करत होता अन
श्रीपतीला पण गोठ्यातून
निघायला सांगत होता
पण श्रीपती,
त्याची बायको अन पोरं
चंद्राला अन कालवडीला
वाचवायला बघत होती
कारण एके काळी घरात
खायला काहीही नसताना
चंद्राच्या फक्त दुधानं श्रीपतीचं
घर सावरलं होतं
अन आज चंद्राला असं सोडून !
श्रीपतीनं विचार पुरात सोडून दिला
पण पूर काही केल्या पाठ सोडेना....

दिवस उजाडला पण
पाणी छातीपर्यंत पोहचायला लागलं
तशी श्रीपतीची आशा मावळली
त्यानं कशीबशी आपली नजर
चंद्राच्या नजरेला भिडवली
चंद्राच्या डोळ्यात पाणी नव्हतं
होता तो परिस्थितीचा स्वीकार
एवढ्यात बोट आली
लोकांनी बोट भरून गेलेली
श्रीपतीनं कसंबसं
बायको, पोराला बोटीत बसवलं
परत येऊन कालवडीला सावरलं
अन उचलून बोटीकडं वळणार
तोच मूक हुंकार जाणवून
त्यानं चंद्राकडं पाहिलं
अन तो थबकलाच
पुन्हा एकवार अविश्वासानं चंद्राकडं पाहिलं
ती निश्चल होती
त्याने मानेनं 'नाही' असं खुणावलं
पण चंद्रा ठाम होती
श्रीपतीनं बोटीत
पोराला पोटाशी घट्ट धरून बसलेल्या
बायकोकडं बघितलं
अन पुन्हा चंद्राकडं
चंद्रानं जणू होकाराची मान हलवली
श्रीपतीच्या डोळ्यातून घळाघळा
अश्रू व्हायला लागले
आई विना तान्हं पोर?
अन तान्ह्या पोराबिगर आई?
कोणीच विचारच करू शकत नाही
काळजावर दगड ठेवून
श्रीपतीनं कालवडीला पत्र्याच्या
ड्रमवर कसंबसं उभं केलं
पोहत चंद्राकडं सरसावला
सासरी जाणाऱ्या लेकीच्या
तोंडावरून बाप जसा हात फिरवतो
तसा त्याने हात फिरवला
चंद्रानं आपली मान पुढं करून
जणू आलिंगन दिलं
तशी श्रीपतीनं पाण्यात डुबकी मारली
अन खुंटीची गाठ सोडण्याआधी
चंद्राच्या पायाला हात लावून
आशीर्वाद घेतला
श्रीपतीच्या डोळ्यातील महापूर
आणि नदीचा महापूर एकमेकांत
मिसळून दुःख व्यक्त करीत होते
खुंटीची गाठ सोडून श्रीपती वर आला
पण त्याची हिंमत झाली नाही
मागे वळून पाहण्याची
कालवाडीच्या पाठीवरून हात फिरवून
ती बोटीकडं सरसावला
पण त्याला बोटीपर्यंत पोहचताच येईना
हात पाय एकदम गळून गेले
एवढ्यात एक-दोन जणांनी
वाहत चाललेला ओंडका उचलावा
तसं श्रीपतीला उचलून बोटीत घेतलं....

श्रीपतीची हिंमत होईना
मागे वळून चंद्राला पाहण्याची अन
बायको, पोराकडं पाहण्याची
पण त्याला बायकोच्या डोळ्यात जाणवत होती
आपल्या लेकरा प्रती
एका आईची, दुसऱ्या आईबद्दलची माया
बोट वेगानं पुराचं पाणी कापत निघाली होती
आणि चंद्राची शेवटची नजर, श्रीपतीचं काळीज.....

 
-सुरेश तुळशीराम सायकर

No comments:

Post a Comment